#कविता
आषाढ
आधी आषाढीचा दिन
त्यात चंचल हे मन
लई घालीते गोंधळ
आवरता आवरे न
ढग काळे नभामधी
थेंब-थेंब पाणी बांधी
थेंब पडता धरणी
कशी सुगंधाने गंधी
गंध मनी दरवळे
मन पळ-पळ पळे
आता इथं आता तिथं
काय ते न मज कळे
ढग घालती सावली
किरणे सूर्याची ही आली
ऊन पावसाचा मेळ
असा पहा इथे चाली
कधी सूर्याचा ही पारा
अन पावसाच्या धारा
आषाढ मना भुलवते
खेळ ऋतूचा हा सारा
मनाचे खेळ..
कधी कधी वाटते आभाळ असावे
भरून आले तर कोसळुन जावे...
कधी कधी वाटते झाडाचे पान व्हावे शिशिर ऋतूत
गळून जावे..
कधी कधी वाटते पावसाचा थेंब व्हावे आणि
मातीत मिसळून जावे...
वाटते कधी कधी असतील का त्यांनाही भावना...
करत असतील का ते ही कल्पना...
असेल का त्यांनाही मन
की,
भावना,संवेदना,कल्पना ह्या फक्त आपल्याला देवाचे दान..
पण कधी कधी वाटते मन असणे हे अभिशाप की वरदान...
छोटेसे घरों में सपने...
पहिल्यांदा हिंदीत कविता लिहिली आहे.
व्याकरणात काही चुका असल्यास नक्की सांगा.
छोटेसे घरों में सपने ...
छोटेसे घरों में सपने अक्सर ही बडे होते है !
कुछ करके ही मानेंगे इस जिद पे अडे होते है !
आजादी के दिन झंडे हम उँचे तो रखते है ,
क्यों अगले दिन देखो तो रस्ते पे पडे होते है !
जल्दी में खरीद ना लेना ये दिल भी फलों के जैसा ,
जो उपरसे चमकिले अंदरसे सडे होते है !
अब झूठ के दर पर ही है भीड दिखाई पडती ,
सब सच के रस्ते पर क्यों मुश्किल से खडे होते है !
वाली
वाली...
का?आपल्यांनी चालल्या चाली पुन्हा !
पाठीस मीही बांधल्या ढाली पुन्हा !
दिसले तुला ते काल माझे हासणे,
सुकणार माझी आसवे गाली पुन्हा !
ठोठावते सुख आज माझे दार पण,
माझ्याच चुकचुकल्या बघा पाली पुन्हा !
माथी उन्हे पण झाड मी हिरवे जरी
झडणार मग त्या आतल्या साली पुन्हा !
जातो अता घेवून माझी वेदना,
शोधाल मग जखमेस त्या वाली पुन्हा !
सोहळा...
सोहळा
तो आरसा सांगे मला तू एकटा नाही अता !
नसते कधी जग आपले तू ये तुझ्या कामी अता !
ते वारही झाले जुने पाठीत मी जे सोसले ,
जखमांतही नाविन्य दे दे वेदना ताजी अता !
फसवायचे जर का मला नुसतेच तू कर एवढे ,
ढाळून खोटी आसवे हासून घे गाली अता !
ते आपले होते कुठे ? सोडून जे गेले पुढे ,
माझा मला मी सोबती चालावया राजी अता !
चोरी, दरोडे, खंडणी खोटेच त्याचे बोलणे ,
साधासुधा ना राहिला नेताच तो भावी अता !
ही आठ चाकी पालखी ही राजगादी पांढरी ,
भोगायचा आहे मला हा "सोहळा" शाही अता !
कैफ माझा
कैफ माझा
ठरविले होते तसा जगलोच नाही !
जीवनाला मी कधी पटलोच नाही !
ऐकली जी हाक मी होती सुखाची ,
मी अभागी, ऐकूनी वळलोच नाही !
भूतकाळाचीच दुःखे गात होतो ,
मी उद्याचे गीत गुनगुनलोच नाही !
वेदना होत्याच माझ्या सोबती अन् ,
आसवांना मी कधी मुकलोच नाही !
त्या किनाऱ्याचेच सारे क्षार अंगी ,
ज्या किनारी मी कधी भिजलोच नाही !
काल होतो मी जसा आहे अताही ,
साज खोटे चढवूनी सजलोच नाही !
मांडला त्याने जरासा "सार" माझा ,
तेवढाही त्यास मी कळलोच नाही !
अस्त
अस्त
खंगलो उध्वस्त नाही !
झिंगलो मदमस्त नाही !
मीच भेटे ना मलाही ,
एवढा मी व्यस्त नाही !
विकत घ्यावे मज् कुणीही ,
एवढाही स्वस्त नाही !
बघ अवेळी येत आहे ,
आठवांना शिस्त नाही !
गाल देऊ मार खाण्या ?
मी तसा "नेमस्त" नाही !
रक्षका कर तूच चोरी ,
जर इमानी गस्त नाही !
तो कधी ना भेटला जो ,
आपल्यांनी त्रस्त नाही !
मी रवी आहे उद्याचा ,
कोंबड्यावर भिस्त नाही !
ओळ सुचली वाटले मग ,
आज माझा अस्त नाही !
वृत्त - मनोरमा (गालगागा गालगागा)
( सूचनांचे स्वागत )
ठसे..( मजुघोषा )
ठसे....
हुंदके दाटून येता भावनांचे !
केवढे उपकार झाले आसवांचे !
फेडण्या कर्जात विकली माय ज्यांची ,
काय झाले हो पुढे त्या वासरांचे !
दगड असतो तर कदाचित देव असतो ,
घाव इतके सोसले मी आपल्यांचे !
त्या निसर्गाच्या छटा दिपलेत डोळे ,
घातकी ते रंग सारे माणसांचे !
सूर्य गिळले , आगसागर पार केले ,
हाय चटके सोसले मी गारव्यांचे !
घेतले आधीच तुम्ही सर्व तारे ,
छाटले का पंख माझ्या काजव्यांचे ?
ज्या किनाऱ्यावर बुडाली नाव माझी ,
गाव कुठले...बेट होते वादळांचे !
तो ही माणूस निघाला ! (विधाता)
तो ही माणूस निघाला !
"चव" घेता तेव्हा कळले "तो" कडवट ऊस निघाला !
मी माणव समजत होतो तो ही "माणूस" निघाला !
शब्दांच्या बाजारी ना मन माझे विकले गेले
किंमत मोठी होती की ग्राहक कंजूस निघाला !
लोकांना दिसली माझी झोळी मोठीच सुखाची
उचलून जरा ती घेता हलका कापूस निघाला !
क्षण आनंदाचा कुठला चिरकाल कधी ना टिकला
श्रावण माझा हा सरला अन् तो ताऊस निघाला !
"संत्रीची" घेत जराशी बोलून खरे ते निजले
मी जागा, हाती माझ्या संत्रीचा ज्यूस निघाला !
लावून मुखोटे मजला नुसतेच लुबाडत होते
वर दिसण्या तांबुस पिवळा खोटा हापूस निघाला !