Submitted by गणक on 22 May, 2021 - 14:27
अस्त
खंगलो उध्वस्त नाही !
झिंगलो मदमस्त नाही !
मीच भेटे ना मलाही ,
एवढा मी व्यस्त नाही !
विकत घ्यावे मज् कुणीही ,
एवढाही स्वस्त नाही !
बघ अवेळी येत आहे ,
आठवांना शिस्त नाही !
गाल देऊ मार खाण्या ?
मी तसा "नेमस्त" नाही !
रक्षका कर तूच चोरी ,
जर इमानी गस्त नाही !
तो कधी ना भेटला जो ,
आपल्यांनी त्रस्त नाही !
मी रवी आहे उद्याचा ,
कोंबड्यावर भिस्त नाही !
ओळ सुचली वाटले मग ,
आज माझा अस्त नाही !
वृत्त - मनोरमा (गालगागा गालगागा)
( सूचनांचे स्वागत )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा