आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.
प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.
मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात.
'शिक्षण' ही समाजाची गरज आहे हे खरे आहे! पण 'शिक्षण' कशाला म्हणावे हे मात्र समाजाला अजून कळले नाही असं कधी-कधी वाटतं. चार पुस्तकं वाचण्याला समाज शिक्षण म्हणत आला आहे. परंतु हे पुस्तकांचे 'शिक्षण' किती फसवे असते असे आज-कालच्या....नव्हे आजच्या शिक्षकांकडे बघून प्रकर्षाने जाणवते. आम्ही ज्या पिल्लै कॉलेज मध्ये शिकलो त्यात अश्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व काही लोकांनी स्वखुशीने केले होते! त्याच 'हिटलरशाही' मध्ये आम्ही काही गोष्टी शिकायचा प्रयत्न केला पण थोड्या दिवसांनी तो नाद सोडून दिला! पण आम्ही पडलो विद्यार्थी! त्यामुळे आम्ही ३ वर्षांनी आनंदाने ह्या कारभाराला राम राम ठोकला!