गेल्या वर्षी आणि या वर्षी कोविड -१९ च्या उद्रेकादरम्यान एक नाव टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमामध्ये सातत्याने घेतले जात होते, आणि तेही भारताच्या अगदीच नगण्य अल्पसंख्याक समुदायातील असलेल्या व्यक्तीचे. ते म्हणजे पारसी समाजातील अदार पूनावाला यांचे.
मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात.