तथास्तू
“अगं किती वेळ व्हरांड्यात होतीस? तुझ्यासाठी आलोय ना मी?” मी आई वर चिडलो.
“अरे नाही रे. ती खूप वर्षांनी आली म्हणून,” आईने चक्क स्पष्टीकरण कसे दिले हा प्रश्न पडला.
“काय गं एवढी खूश दिसतेस, कोण आलं होतं?”
“अरे ती भिकारीण.”
“काय? एवढा वेळ भिकारणीशी बोलत होतीस? असं कोणाबरोबर ही काय गप्पा मारतेस? थोडं ‘स्टॅंडर्ड’ वागत जा,”
मी तिच्यावर डाफरत असतानाच ती चिडली, “ए तुझे तोंड बंद कर आधी. तू मला शिकवायचे नाही. आवाज खाली!”
“अगं पण ही लोकं खोटं बोलतात. आपण कष्ट करून खातो मग ह्यांना कामं करायला काय होतं?”