ओढ.. अव्यक्त प्रेमातली

Submitted by प्रथमेश काटे on 25 January, 2025 - 02:48

ओढ.. अव्यक्त प्रेमातली

सुयश मांडीवर लॅपटॉप घेऊन बसला होता. पण त्यात त्याचं लक्ष नव्हतं. निशा बेड शेजारील ड्रेसरच्या आरशासमोर उभी राहून मेकअप करत होती. सुयश बेडच्या पायथ्याशी ( मुद्दामच) बसला होता, त्यामुळे त्याला निशाला आरशातून निरखता येत होतं. तिकडेच त्याचं एकसारखं लक्ष जात होत. निशा मुळातच खूप सुंदर.तिचे काळेभोर केस, टपोरे, बोलके डोळे, गोबरे गोबरे गुलाबी गाल, सरळ नाक, लालचुटुक ओठ, सगळंच मोहवणारं‌. त्यात ती थोड्याच वेळापूर्वी बाथ घेऊन आली असल्यामुळे केसांचा, पुसूनही थोडासा राहिलेला ओलावा तिच्या मोहकतेत अजूनच भर घालत होता.
अधूनमधून तो तिच्यावर चोरटा कटाक्ष टाकत होता. खरंतर निशालाही ते कळत होतं. आणि त्याची प्रत्येक चोरटी नजर तिच्या मनाला सुखावत होती. संपूर्ण शरीरावर गोड रोमांच उभे करत होती.
सुयशने पुन्हा मा़न वर करून हळूच निशा कडे पाहिलं. त्याचवेळी तिनेही त्याच्याकडे बघितलं. तिच्याशी नजरानजर होताच दचकून सुयशने लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. निशा हळूच खुदकन हसल्यासारखा त्याला भास झाला.
सुयश आणि निशा. दोघे एकाच वयाचे. अगदी लहानपणापासून एकत्रच शिक्षण झालेलं. एकच शाळा, एकच कॉलेज. त्यांचे वडील चांगले मित्र, त्यामुळे वरचेवर एकमेकांच्या घरी येणं जाणं व्हायचं. त्यामुळे बालपणापासून त्यांच्यात खूप छान ट्यूनिंग होत.
कॉलेजमध्ये हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात झालं. मग एकमेकांकडे चोरट्या नजरेने बघणं, कधी चुकून स्पर्श झाल्यास चटकन् दूर होणं, मनात लाजणं सुरू झाल. त्यांच्या वागण्यातला बदल सुयशच्या बहिणीच्या, आणि निशाच्या भावाच्या लक्षात आला. निशा व सुयशचं शिक्षण पूर्ण होताच त्यांच्या नकळत यांनी त्याबद्दल आपल्या घरी कळवलं. मग दोघांच्या आई-वडिलांनी निशा आणि सुयशमध्ये लहानपणापासूनच असलेल्या मैत्रीच कारण पुढे करून त्यांच्या समोर एकमेकांशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रेम असूनही निशा व सुयशला कधीच आपल्या भावना एकमेकांसमोर उघड करण्याची हिंमत झाली नाही. आई-वडिलांना सांगण तर खूपच दूरची गोष्ट. पण आपल्या मनातली सुप्त इच्छा इतक्या सहज पूर्ण होत असलेली बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दोघांनी अर्थात होकार दिला. यथावकाश निशा - सुयशच लग्न पार पडलं. आता ते हनिमून साठी आले होते.
मनातून दोघांनाही वाटायचं, आपल्या जोडीदाराची खोड काढावी, त्याने लटकच रूसावं, मग समजूत काढण्याच्या बहाण्याने त्याला आपण मिठीत घ्यावं, संध्याकाळी जोडीदाराचा हात हातात घेऊन मस्त आजूबाजूला भटकून यावं, हा एकांत छान एन्जॉय करावा. पण त्यासाठी मनातलं प्रेम व्यक्त होण गरजेच होतं, जे करण दोघांनाही जमत नव्हतं. एकमेकांबद्दल ओढ तर होतीच, जी लग्नानंतरच्या सहवासात अजूनच वाढू लागलेली ; पण संकोच व भीती आडवी येत होती.

आवरून झाल्यावर निशाने मागे वळून सुयश कडे पाहिलं. त्याच्या मनातली चलबिचल, अस्वस्थता चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. निशा जाऊन पलंगावर त्याच्या शेजारी बसली, आणि त्याच्या हातावर हात ठेवला. सुयशने हळूच मान वर करून पाहिलं. निशा अतिशय भावनाविवश नजरेने त्याच्याकडे बघितलं. त्याचा हात अजूनच घट्ट दाबत निशा बोलू लागली -
" यश, मागच्या दोन वर्षांपासून मी हे मनात दाबून ठेवल होत. तुला सांगून टाकावं, असं खूपदा वाटायचं, पण हिंमतच होत नव्हती रे. पण आता मला आपल्यातला हा संकोच, हा दुरावा संपवायचाय. सुयश.." बोलता बोलता निशा थांबली. मग खाली मान घालून, लाजत हलक्या आवाजात म्हणाली
" आय लव यू सुजय."
बोलून निशाने मान वर करून सुयश कडे पाहिलं. तो तिच्या अचानक, थेट बोलण्याने जरासा बावरला होता.
" लव यु टू निशा." थरथरत्या आवाजात सुयश म्हणाला
निशाच्या ओठांवर हलकसं हसू फुटलं. थोडावेळ दोघेही भारावल्यासारखे एकमेकांच्या डोळ्यांत पाहत राहिले. मग क्षणात एकमेकांच्या घट्ट मिठीत सामावले.

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे कथा , आवडली .
नवविवाहितांच्या मनातली हुरहूर छान मांडली आहे .
लिहीत राहा .

@माबो वाचक :- थॅंक्यू सर. आणि तुमची कथा नीट समजून न घेताच मी टिप्पणी केली,‌ त्यासाठी माफी मागतो. छान भयकथा लिहीली होती Bw

लाजत हलक्या आवाजात म्हणाली
" आय लव यू सुजय."
बोलून निशाने मान वर करून सुयश कडे पाहिलं. >> नाव बरोबर लिहाल का? सुजय / सुयश अशी गडबड झाली आहे.