“अगं किती वेळ व्हरांड्यात होतीस? तुझ्यासाठी आलोय ना मी?” मी आई वर चिडलो.
“अरे नाही रे. ती खूप वर्षांनी आली म्हणून,” आईने चक्क स्पष्टीकरण कसे दिले हा प्रश्न पडला.
“काय गं एवढी खूश दिसतेस, कोण आलं होतं?”
“अरे ती भिकारीण.”
“काय? एवढा वेळ भिकारणीशी बोलत होतीस? असं कोणाबरोबर ही काय गप्पा मारतेस? थोडं ‘स्टॅंडर्ड’ वागत जा,”
मी तिच्यावर डाफरत असतानाच ती चिडली, “ए तुझे तोंड बंद कर आधी. तू मला शिकवायचे नाही. आवाज खाली!”
“अगं पण ही लोकं खोटं बोलतात. आपण कष्ट करून खातो मग ह्यांना कामं करायला काय होतं?”
“अरे नाईलाज असतो रे लोकांचा, आवडत नाही कोणाला हे करायला.”
“उगाच नखरे करतात, काहीच अडचण नसते त्यांची. तुझ्या सारख्या लोकांना मूर्ख बनवून पैसे काढून घेतात.”
“हो असतील अशीही लोकं पण आपण सदहेतूने मदत केली तर पुंण्य मिळते.”
“अगं कसलं आलंय पुंण्य वगैरे? फालतू सवय लावता म्हणून ते कामं करत नाहीत. उगाच लोकांना आळशी बनवता.”
“आत्ताचाच किस्सा सांगते तो ऐक आणि मग माझ्यावर चीड.”
आणि तिने मी आजारी अस्तानाचा एक किस्सा सांगितला.
एक दिवस अचानक मी आजारी पडलो. फारंच अस्वस्थ झालो, सादे उभे राहता ही येत नव्हते. पप्पाने मला उचलून डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांच्या तपासणीअंती मला मधुमेह झाल्याचे निदान झाले. माझ्या शरीरातील साखरेची पातळी एवढी जास्त होती की डॉक्टरांना ग्लुकोमीटर वर आकडे दिसू शकले नाहीत. मला त्वरित आयसीयू मध्ये दाखल केले. २ आठवडे उपचार केल्यानंतर, गोळ्या आणि इन्सुलिन सुरु करून, पथ्य समजावून मला डॉक्टरांनी घरी पाठवले.
पुढच्या शिक्षणासाठी मला मुंबईला जायचे होते. आईवडलांना दोघांनाही मधुमेह नसताना मला अवघ्या सतराव्या वयातंच झाल्यामुळे घरी सगळे त्रस्त होते. आपण निरोगी असताना आपल्या लहान मुलाला होत असेलेला त्रास बघवत नसे. आपला एकुलता एक लाडका मुलगा दिवसातून ४ वेळा इन्सुलिन आणि २ वेळा गोळ्या घेत नवीन शहरात एकटा कसा राहणार? तिथे नीट खायला मिळेल का? वेळेवर गोळ्या इन्सुलिन घेईल का? काही चुकले तर पुन्हा तशी अवस्था नाही होणार ना? आम्हाला आमच्या मुलाला पुन्हा हॉस्पिटलच्या बेड वर बघावे नाही लागणार ना? अश्या बऱ्याच प्रश्नांनी त्यांना झोप लागत नसे.
त्या दोघांच्या नोकऱ्यांमुळे ते माझ्याबरोबर मुंबईत राहू शकत नव्हते. मला एकट्याला हॉस्टेलमध्ये ठेवायला आई घाबरत होती. पप्पा तिला समजवायचे, “त्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, त्याच्यावर पडलं की त्याचं तो नीट बघून घेणार, आपल्या काळजीपोटी त्याचे पंख छाटणे योग्य नाही.” त्यांनी मला पाठिंबा देत तिला धीर दिला. मग तिने कसेतरी मनावर दगड ठेऊन मला तिथे पाठवण्यासाठी परवानगी देण्याचे धाडस दाखविले.
उत्साही आणि खेळकर स्वभावाची आई हल्ली दुःखी असायची. फार कोणाशी बोलण्यात वगैरे रमत नसे. दिवसभर माझाच विचार करायची. तिला सगळे म्हणायचे तू डिप्रेशन मध्ये दिसतेस, एवढं कसलं टेन्शन घेतेस, कोणी आजारी पडत नाही का, एवढं काय घेऊन बसायचं, ड्रॅमा नुसता, वगैरे वगैरे. मधुमेह कधीच जात नाही असे काही म्हणायचे आणि ती आणखीनच घाबरायची.
एकदा ती स्वयंपाकघरात असताना भिकारीण आली.
तिला पैसे देताच ती म्हणाली, “आपा नाराज दिख रहे हो, क्या बात है? कुछ परेशानी है क्या?”
आई अतिशय ‘स्ट्रेटफॉरवर्ड’ असून फार प्रेमळ आणि मानाने हळवी होती. ही भिकारीण आमच्याकडे नेहमी येत असे. आई अश्या लोकांना जास्त नाही पण जमेल तसे थोडेफार पैसे किंवा खाऊ देत असे. ह्या भिकारणीच्या मुलांच्या शिक्षणासाठीही ती मदत करीत असे.
“नाही, काही नाही. जेवण वगैरे काही पाहिजे का?”
“नही पर मेरे बेटे को कुछ कपडे होंगे तो दे देना.”
आईने माझ्या वापरलेल्या २ जोड्या दिल्या.
“अल्लाह आप को खुश रखे आपा, आप हमेशा इतने अच्छे कपडे देते हो मेरे बेटे को, मुझे कभी खाली हात नाही लौटाते, आपको और आपके बेटे को मेरी बोहोत दुआएं लागेंगी, अल्लाह उसको हमेशा खुश रखे.”
हे ऐकताच आईला अश्रू अनावर झाले. त्या भिकारणी समोरंच ती ढसा ढसा रडू लागली.
“क्या हुआ आपा क्यू इतने परेशान हो?”
आईने तिला माझी परिस्थिती सांगितली. ती अजून रडतंच होती.
“आप परेशान मत हो. वो बिलकुल ठीक हो जायेगा हम दुआ करेंगे उसके लिये.”
तिथेच ती माझ्यासाठी प्रार्थना करून निघून गेली.
ह्या गोष्टीला पाच एक वर्षे उलटून गेली होती. आता मी नोकरीसाठी दुसऱ्या शहरात असतो आणि मला आता मधुमेह ही नाही. काही दिवसांची सुट्टी घेऊन मी घरी आलो होतो. कोणीतरी बेल वाजवली म्हणून आई दरवाजा उघडायला गेली. साडी न्हेसलेली एक बाई दरवाज्यात उभी होती.
“आपा कैसे हो?”
ही बाई कोण ह्याचा अंदाज लावत तिने उत्तर दिले, “बारी आहे”
“आपके बेटे की तबियत ठीक है अब?”
तिला ओळखले नाही हे सांगायच्या आधीच ते कळून ती म्हणाली, “ओ आपा मे वो मांगने आती थी ना पेहले. आप एक बार रोई थी आपके बेटे को मधुमेह हुआ था.”
हे ऐकताच आईला ती बाई आठवली. “हो हो ओळखली. बऱ्याच वर्षांनी आलीस.”
“हा आपा मेरा बेटा कमाने लगा तो मैने मांगना छोड दिया. अब हम सब उसके साथ बाहार रेहते है. अभी बोहोत सालो बाद आयी हू तो सोचा २-४ लोगो से मिल आऊ और शुक्रिया करू आप लोगोका, आपकी बोहोत मदत हुई है हमको.”
“अरे वाह छान छान!”
“आपका बेटा कैसा है अभी?”
आई हसत हसत म्हणाली, “एक्दम मस्त! आता त्याचा मधुमेह ही गेला आणि तो ही कमवायला लागलाय नुकताच.”
“वाह बडिया. आप रोई थी मेरे सामने तब बोहोत बुरा लगा था और आज आप ही देखो कितने ख़ुशी से बता रहे हो उसके बारे में.”
आई हसली.
ती बाई पुढे म्हणाली, “मेरा लडका आप ने दिये हुए कपडे पेहेनता था तब आपका वो दुखी चेहरा याद आता था और मै आपके लडके को बोहोत दुआएं देती थी और अब भी देती हू क्यूकी आप मेरी हमेशा बोहोत मदत करती थी.”
आईचा हा किस्सा ऐकून बरे वाटले. आपली आई एवढी मायाळू आहे की ओळख नसलेली लोकं ही आपल्यासाठी ईश्वराकडे काहीतरी मागतात हे ऐकून माझे मन भरून आले होते. आता आई मला सांगत होती की असे नाही की ह्या बाईला काही दिल्यामुळे तू बरा झालास. तुझ्या जिद्दीने, कष्टाने, मनावरच्या ताब्याने आणि मुख्य म्हणजे तुला मिळालेल्या चांगल्या डॉक्टरांमुळे तू तो मधुमेह घालवला. पण आजच्या गोष्टीतून धडा घे की कुठल्याही माणसाचे मन दुखवायचे नाही, कोणालाही कधीही कमी लेखायचे नाही, चांगले वाईट दिवस येतात जातात पण आपले शब्द नेहमीच लक्षात राहतात, म्हणून सगळ्यांना समजून घ्यायचे. हा कोणी आपला उपयोग करून घेत असेल, आपल्याशी उगाचंच वाईट वागत असेल तर ते सहन करायचे नाही पण आपण स्वतःहून उगाच कोणाशी वाईट वागायचे नाही. आणि आपल्या सगळ्या गरजा भागवून आपल्याला जमेल तेवढे थोडे फार कोणासाठी काही केले तर ते चांगलेच असते. हे सर्व आई समजावत असतानाच कोणीतरी दरवाजा वाजवला आणि बाहेरून आवाज आला, “कुछ मदत करो आपा. ओ भैया, अल्लाह के नाम पे देदो भैया.” मी उठलो आणि तिला पैसे द्यायला बाहेर गेलो.
सालम दलवाई
मिरजोळी, चिपळूण
स्वागत! कथा आवडली. लिहिते
स्वागत! कथा आवडली. लिहिते रहो. पुलेशु!
छान कथा!
छान कथा!
सुंदर, फक्त ते ग्लुकोमीटर वर
सुंदर, फक्त ते ग्लुकोमीटर वर रिडींग येत नाही जरा अतिशयोक्ती वाटलं
छान कथा..
छान कथा..
छान आहे कथा.
छान आहे कथा.
आवडली गोष्ट.
आवडली गोष्ट.
मायबोलीवर स्वागत.
कथा आवडली. लिहिण्याची शैली
कथा आवडली. लिहिण्याची शैली आवडली.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
मधुमेह रिव्हर्स होतो का ?
मधुमेह रिव्हर्स होतो का ?
आणि जरी होत असेल तर तो नियमित उपचार/औषधे आणि पथ्यपाणी करूनच ठीक झाला असेल ना !
माबोवरती स्वागत. कथाशैली
माबोवरती स्वागत. कथाशैली आवडली.
छान कथा..!
छान कथा..!
आवडली गोष्ट....
आवडली गोष्ट....
मायबोलीवर स्वागत...
मस्त कथा!! मायबोलीवर स्वागत.
मस्त कथा!!
मायबोलीवर स्वागत.
छान कथा
छान कथा