या मनींं चे त्या मनाला..
३. गझल - या मनींचे त्या मनाला...
अक्षरगण वृत्तिय गझल :-
(गालगागा गालगागा गालगागा गालगा )
या मनींचे त्या मनाला गे कळावे ते कसे।
अंतरीचे भाव माझे गे दिसावे ते कसे।।१।।
मोगऱ्याचा गंध माझ्या अंतरा वेडावितो।
गंधवेड्या या मनाला आवरावे ते कसे।।२।।
पूनवेची रात आहे तारकांचा साज हा।
आसवेड्या या मनाला तोषवावे ते कसे।।३।।
चातकाची जाणली मी वेदना ती आज गे।
मीलनाचे गीत सखये आळवावे ते कसे।।४।।
संगती ती तूचि नाही या "विकासा" चैन ना।
भाववेड्या या मनाला थोपवावे ते कसे।।५।।
रचना :- डॉ. विकास सोहोनी.