दिगंबरी मन
ठेविले वाढून
मी पण काढून
बाईयांनो ॥
घडले भजन
नाही वा कीर्तन
दिला पेटवून
प्राण फक्त॥
जप तप नच
घडले यजन
व्याकूळ होवून
शब्द दिले ॥
जरी जगतोय
संसारी वाहून
अंतरी स्मरून
सदा तया ॥
काळवेळ काही
ठाव मला नाही
येता याद देई
गळा मिठी ॥
सखा गिरणारी
भरला अंतरी
जगणे उधारी
आता मला ॥
॥ गुरुदेव दत्त ॥
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
आलो गिरनारी देवा
हाक ऐकून आतली
धाव धावून प्रेमाने
जिवलग म्या पाहिली
आधी भेटलो शिवाला
भवनाथांच्या रूपाला
धूळ संतांच्या वाटेची
मग लावली भाळाला
असे पायथ्याला बळी
बाहू उभारून प्रेमे
उभ्या उभ्याने हसत
भेटे मारुती सुखाने
गात अलख अलख
गेलो गुहेमध्ये खोल
गोपीचंद भृतहरी
देती जीवास या ओल
आई नमिली अंबाजी
शक्ति पीठ ते थोरले
तिचे शक्ती कृपेमुळे
बळ पावुलात आले
जैन सिद्धनाथ थोर
भेटे अरिष्टनेमी ही
तया संनिधी लागली
ज्योत शांतीची ह्रदयी
अथांग अधीर
पसरले पर |
आनंद कवेत
बासरीचे सुर ||
अनाहत स्वर
विचारांच्या पार |
द्वैत नि अद्वैत
बासरीचे सुर ||
खोल अंतर्मनी
प्रगाढ चिंतनी |
शांतीचे आगर
बासरीचे सुर ||
सकल सुजन
सृजन सुमन |
गुंफतात हार
बासरीचे सुर ||
मथुरा नंदन
करीता वंदन |
भाव अनावर
बासरीचे सुर ||
संदीप मोघे
08989160981
sandeep.moghe@yahoo.com
भोपाळ