गंध हळवे भावनांमध्ये
वीज नाचावी ढगांमध्ये
तीच शांतता दोघांमध्ये
हसणे माझे कर्ज तुझेच
नको वसुलू आसवांमध्ये
‘मीच नाही का हाक दिली?’
सल ही कित्येक मनांमध्ये
आले मनी तर घे नाचुनि
वजन कसले पावलांमध्ये?
टाळलीस तू मैफिल जरी
वावर तुझाच गीतांमध्ये
अश्रू होते ओले जरी
भिजले न ते यातनांमध्ये
घाव तिचे जगाच्या ओठी
मजला रस ना अफवांमध्ये
जगलो तर हासतच होतो
दुःख कसले आठवांमध्ये?
नभ बरसता कुणी मिसळले
गंध हळवे भावनांमध्ये