......डाव.....
घरात आरसा जसा असायलाच पाहिजे !
मनी तसा मलाच मी बघायलाच पाहिजे !
कुणी म्हणे "तिशीत" तो हवेमध्ये तरंगतो ,
नभात जायचे मला गं प्यायलाच पाहिजे !
जसे तसे करून ते कसे पुढ्यात पोचले ,
अता मलाच चाटुटा शिकायलाच पाहिजे !
तुझ्या गं रुप चांदण्यात मी स्वतःस आवरू?
अशात पेटता दिवा विझायलाच पाहिजे !
सरीसरींमधून ही गझल अताच बरसली ,
तिला मिठीत घ्यायला भिजायलाच पाहिजे !
सुखास मात द्यायला समोर दुःख मांडले ,
बरोबरीत डाव हा सुटायलाच पाहिजे !
वृत्त - कलिंदनंदिनी (लगालगा ×4)
(काही सूचना असल्यास नक्की कळवा)
जुन्या सावकारी ऋणासारखा
कसा जीवना तू उणा सारखा
विसरलाच जाणार मीही उद्या
शकासारखा वा हुणासारखा
जरी सत्य आले पुरासारखे
उभा ठाकलो मी तृणासारखा
अशी कागदा नाळ तोडू नको
इथे शब्द माझा भ्रुणासारखा
मला तूच शोधीत ये ना कधी
तुझ्या शोधतो मी खुणा सारखा
-- अभिजीत
घराकडे पोचवतो आहे का
बघ रस्ता आठवतो आहे का
दु:खी आहे बहुधा हा जोकर
थोडा जास्त हसवतो आहे का
तास मिनिट सेकंदाचा चाबुक
काळ मला राबवतो आहे का
भेटीवेळी आला हा पाउस
भेट बघू लांबवतो आहे का
भूक तिला गाते अंगाई अन्
नाईलाज निजवतो आहे का
वाट पाहते एक रात्र हल्ली
एक दिवा मालवतो आहे का
मनात जळते आहे एक शहर
मीच फिडल वाजवतो आहे का
-- अभिजीत दाते
मी काल आणखी एक प्रयत्न केला गझल लिहीण्याचा, माझा माबो वरचा गझलमित्र निलेश ती वाचल्यावर म्हणाला
"वृत्त्त जमलय तुला फक्त मेंटेन करावं लागेल"
ती आता सादर करतो 
आर्तता (नाव द्यायच म्हणून .. पण बहुतेक अस वाटतय गझलेला नाव हे त्याच गझलेतील एखाद्या पंक्तिचं देतात )
जमवून घेतल, सोबती तुज लाभला
ठरवायचा बघ आपला जन्म आपला
पटवून ठेवल भावली मज आर्तता
भरवायचे मन भेटता सय भेटता
मी अजुन सगळे लेख वाचलेले नाहीत 'बेफिकीर' यान्चे. गझल कशी लिहावी याबद्दल चे. तरिही ही एक गझल पेश करतो. मोह अनावर होतो म्हणून... नक्की कळावा ही गझल होऊ शकते का ते!!
होऊनी पिपासू चातक
वाट तिची बघतो
गर्द मेघांसरशी
गृहित तिलाही धरतो
हळव्या नाजूक हृदयी
ऊब तिला देतो
असेल तिला ठाव
मनाला सारखे सांगतो
रोजचं निळं आकाश
रितसर तिला देतो
अन मीच आमच्यामध्ये
‘तिर्हाईत’ म्हणवून घेतो
मिळतात सल्ले हल्ली
त्रास इतुकाच होतो
बोलणार्यांच्या तोंडी
मी 'बोलघेवडा' ठरतो
रुप जरी तुझे गोजिरवाणे
त्याला गंध कुठे आहे
पाठमोरीच एकदा वळ मागे
आरश्यात सोबती कोण आहे?
सोबती आज इथे
कोण मागतो आहे
आयुष्य तर फक्त
दोन क्षणांचे आहे
जग तूही दोन क्षण
काय गैर आहे
विसरु नकोस, त्यांत
एक क्षण माझाही आहे
ऋण एका क्षणाचे
तुझ्यावर ही आहे
फेडण्या ते ऋण
सख्या! जन्म पुढचा आहे
सरला वसंत कधीचा
बघ उमलणे राहून गेले
स्पर्शिले तुला हजारदा
जवळ घेणे राहून गेले
वाचीले जे डोळ्यांमधे
ते टीपणे राहून गेले
आठवणी खुडल्या एकाच रात्री
पानांचे दुमडणे राहून गेले
निरखले अनेकदा मला
ओळखणे पुरते राहून गेले
जसे अत्तर फासले मनगटी
त्याला हुंगणे राहून गेले
जतन केल्या शेकडो खुणा
जपणे तुला राहून गेले
जुन्या त्या खुणांचे
कोलाज करणे राहून गेले
कोण गुंतले कोणामधे
'गाठ' बांधणे राहून गेले
बघितले उशीराच वळूनी
मिळविणे तुला राहून गेले