रोज एकेक स्वप्न
विसावतय मनाच्या कोपर्यात
म्हटलं, सवडीनं हाताळेन एकेक
पण तसं कधी घडलंच नाही
वाटतं, देवून टाकावीत सारी स्वप्न
जश्शीच्या तश्शी दुसर्याला
पण नकोच, मी हल्ली
एकेक स्वप्न निळ्याशार आभाळात सोडते
जसं,
खूप आवडीने धरलेल्या फुलपाखराला
मुक्त श्वास घेण्यासाठी सोडतो
तसं!
तुझं पहिल्यापासून असंच!
स्वप्नांची पेरणी करत करत
वाट चालायचा तुझा स्वभाव!
पण स्वप्नं रुजून वर आली की
ती खुडून ओंजळीत घ्यायला तू
तिथे नसणारच!
तू पुढच्या वळणाच्याही पुढे पसार!
आणि यांचा उपभोग घेणारे नेहमी वेगळेच असणार!
बरं, याला तुझा नि:स्वार्थीपणा म्हणावं तर तसंही नाही!
तुझा हेतू फक्त पेरणीचाच - फळाची आशा तुला नाहीच!
उमलून आलेली तुझीच स्वप्नं
ऋतुभर तुझी वाट बघत डोलायची...
आणि एक दिवस पुन्हा मातीमोल होऊन जायची..
तुला असा स्वप्नांचा फक्त प्रवासच करायचा होता,
हे उशीरा कळलं..
आता वाटतं, मी तुझं स्वप्न झालो नसतो,
तर फार फार बरं होतं!
'हे स्वप्न फार वेगळं आहे,
हे स्वप्न
माझं की तुझं
कुणास ठाऊक कुणाचं?
आपण मात्र काम करायचं
स्वप्नामध्ये रंग भरायचं
ह्याच कामात मी रमले होते
पुढे पुढे जात होते
तुझ्या पाऊलखुणांचा मागोवा घेत होते
शेजारीच तर माझ्या पावलांच्या
खुणा होत्या
आणि तू मात्र प्रारंभालाच उभा होतास
स्वप्नासारखा!
तू
तू स्वप्नांच्या स्वप्नी
तू गीत स्वरांच्या ओठी
रेघ तुझ्या सौंदर्याची
आहे नजरेहून मोठी
तू
तू मौनांचा सांगावा
तू खिन्नतेचा सल
तुझ्या रूपेरी डोळ्यांत
तेज तमाचे तरल
तू
तू आस आसवांची
तू आभासांचा भास
सावलीस हवाहवासा
तुझा धुंद सहवास
तू
तू ध्यास अशाश्वताचा
तू श्वासांचा जीव
नसानसांत भिणली माझ्या
तुझी तप्त जाणीव
कल्पनेतली तुझी आठवण कशी साठवू नयनी
स्वप्नातून ओसंडून आली अशी कुशाशी शयनी
विझलेल्या रातीच्या प्रहरी
गुडूप गाढ झोपली सारी
अशी जाहली गम्मत न्यारी
वाऱ्यावर उडवून बटाना टाकून कटाक्ष जुलमी
आली सुंदर नार सामोरी निखळ रम्य हासुनी
डोळ्यावर विश्वास बसेना
हृदयाचा ठोकाच पडेना
झाले मजला काय कळेना
हात धरुनी माझा हाती मंजुळ आवाजात म्हणाली
तुला भेटण्या आले इथवर सर्व बंध तोडूनी
काय मी वर्णू रूप तिचे
चंद्राला लाजवेल असे
नक्षत्राचे तेज दिसे
आकाशातून शोधून कोणी तिला जशी आणली
तिच्या अभावी जणू तारका व्यथित जाहल्या गगनी
हातामध्ये हात घालूनी
डोळ्यांनी डोळ्यांशी बोलुनी
अनुरागाचे गीत गाउनी