नदी आणि विकास
नदी आणि विकास
~ शिरीष कोठावळे
नको ग! नको ग!
आक्रंदे नदी ही
पायाशी लोळत
नमून विनवी
काँक्रीट ओतशी
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले मरून!
फोडीशी खडक
चोरिशी वाळू ही
कशाचा विचार
नाही तो जराही!
नको ग! नको ग!
आक्रंदे नदी ही
बेभान होऊन
कापिशी झाडे ही
तोंडचा तोबरा
नदीत टाकून
उर्मट माणूस
गर्जला माजून
दुर्बळ! अशीच
ओरड खुशाल
पहात रहा तू
माझी ही कमाल!