मराठी गझल
*** उखाणा
*
घातला दुःखास गमतीने उखाणा
नाव माझे घेउनी केला ठणाणा
सत्य आळोखे पिळोखे घेत राही
मात्र खोटे,पोचते आधी ठिकाणा
शब्द कवितेचे उसळती या जिभेवर
फक्त गुणगुणतो जरासा मी तराणा
वावगा ना शब्द जावो याचसाठी,
मी मुका आहे असा केला बहाणा
प्रेम असते मूक आणिक आंधळेही
जाणतो हे फक्त प्रेमाचा दिवाणा
ठेच नाही लागली पायांस माझ्या
का तरीही मागचा झाला शहाणा ?
----- अरविंद
स्वप्नांची तुडवीत जंगले, युगे युगे मी चालत आहे!
गझल
स्वप्नांची तुडवीत जंगले, युगे युगे मी चालत आहे!
सत्याचा एखादा रस्ता, अजूनही मी शोधत आहे!!
हर यात्रा होवो हजयात्रा! हीच कामना हृदयी माझ्या;
अशाचसाठी मी पापाचा विचार सुद्धा टाळत आहे!
या गर्दीला कुठे माहिती, एकाकीपण कशास म्हणती?
विरहव्यथेचा वणवा मजला, क्षणाक्षणाला जाळत आहे!
वठलेल्या झाडास विचारा, पानगळीचे दु:ख काय ते;
पूर्वी पाने ढाळत होते, आता अश्रू ढाळत आहे!
कितीक दु:खे आली गेली, नुरली त्यांची कुठे निशाणी;
दु:ख तुझे, पण; अहोरात्र मी हृदयाशी कवटाळत आहे!
हसू चेह-यावर ठेवोनी वाट आसवांना केली मी,
कळू दिले ना कोणालाही, काय काय मी सोसत आहे!
कसा देश होता..
कसा देश होता..
कसा देश होता, कसा देश झाला ;
मतांचा भिकारीच राजेश झाला ..
तुला दान मतदार देतो म्हणोनी ;
मतांचा तुला हा धनादेश झाला ..
जयाने कधी दान स्वर्गास द्यावे ;
कसा कर्ण तो आज दरवेश झाला ..
दिशा आकरावी ;तिथे त्यास शोधा -
गुरूंचा मला यार आदेश झाला ..
किती छान डोळ्यातुनी बोलते तू ;
तुझे मौनही छान संदेश झाला ..
जिण्याचे खरे भान दु:खात आले ;
सुखारे तुझ्याने मला क्लेश झाला ..
घडीबंद स्वप्नांनाही लागते कसर!
गझल
घडीबंद स्वप्नांनाही लागते कसर!
कुणाची कळेना त्यांना लागते नजर!!
अडाणी जगाला कुठली समज एवढी?
स्वप्न असो कोणाचेही, करावी कदर!
काळजात न्यायालयही एक चालते;
पुकारण्याआधी तेथे रहावे हजर!
गुन्हेगार स्वत:च! न्यायाधीशही स्वत:!
आपलीच आपण घ्यावी चांगली खबर!!
गोडवा उगा ना येई शायरीमधे;
एक एक जगतो आम्ही चवीने प्रहर!
कधी फक्त मतला लिहुनी चक्क थंबतो;
कधी कधी मतला येतो, घेवुनी बहर!
रथी महारथी आहेत, इथे मोजके;
कैक लोक ज्यांचा करती दिनरात गजर!
एकाकी किती जगावे लागले मला!
मी उगाच झालो इतके, उत्तुंग शिखर!!
मी इथे जन्मलो, शिकलो, मोठा झालो!
उत्तरायण, दक्षिनायण............रामायण!
तुझे असणे वाटते मज उत्तरायण
तुझे नसणे वाटते मज दक्षिनायण.
रोज दिसतो घोकता तुझा अध्याय
रोज करतो तेच ते मी पारायण.
काय तुझ्या नजरेत जादु वाल्मिकी
क्षणात सारे घडले हे रामायण.
उगा रुसणे अन उगाचच ते हसणे
तुझे कळले मला ना गुढ प्रेमायण.
गेला निघूनी.. येतो म्हणुनी चंद्र
अन दारी आला अदित्य नारायण.
मुंगूस
पावसा रे वाग की पाऊस असल्यासारखा
काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा
केवढा कल्लोळ माझ्या अंतरंगी नांदतो
वाटतो एकांतही धुडगूस असल्यासारखा
गच्च होतो आसवांनी, पेटतो अन शेवटी
देहसुद्धा वागतो कापूस असल्यासारखा
आज का इतका स्वतःला ओळखीचा वाटलो
आरसाही चेहऱ्याची फूस असल्यासारखा
पायरी पाहून होती लावली बोली जरी
भाव त्याला लागला हापूस असल्यासारखा
टाकली जेव्हा नव्याने जीवनाची कात मी
भेटला तो काळही मुंगूस असल्यासारखा
-- अभिजीत दाते
ती संपली कहाणी
ती संपली कहाणी
शोधू नको निशाणी
घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी
माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी
मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?
राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!
-------जयन्ता५२
पाऊल तुझे पडले अन् धरणीचे सोने झाले!
गझल
पाऊल तुझे पडले अन् धरणीचे सोने झाले!
माती न राहिली माती, मातीचे सोने झाले!!
तू हात दिला अन् फुलली, बहरली जिंदगी माझी!
आधार मिळाल्यावरती, वेलीचे सोने झाले!!
तू दिलीस जेव्हा जेव्हा लेखणीस माझ्या वाणी;
लिहिलेल्या एका एका ओळीचे सोने झाले!
टाकलीस तू माझ्याही पदरात कृपेची भिक्षा;
फाटक्याच आयुष्याच्या झोळीचे सोने झाले!
हलकेच दार नशिबाने वाजवले आयुष्याचे!
अन् मीही जागा होतो, संधीचे सोने झाले!!
मंडई ...........
किती केल्या उलाढाली
मनाची मंडई झाली
धरेचे लग्न सूर्याशी
नभाच्या मांडवाखाली
पदोपदि मरण दाखवते
म्हणवते जिंदगी साली
कसा देशास ह्या माझ्या
नसावा एकही वाली
नव्या गझला कश्या पाडू
खयालांचीच कंगाली
मनाची मंडई झाली..............मनाची मंडई झाली!!