घडीबंद स्वप्नांनाही लागते कसर!

Submitted by सतीश देवपूरकर on 15 July, 2012 - 09:33

गझल
घडीबंद स्वप्नांनाही लागते कसर!
कुणाची कळेना त्यांना लागते नजर!!

अडाणी जगाला कुठली समज एवढी?
स्वप्न असो कोणाचेही, करावी कदर!

काळजात न्यायालयही एक चालते;
पुकारण्याआधी तेथे रहावे हजर!

गुन्हेगार स्वत:च! न्यायाधीशही स्वत:!
आपलीच आपण घ्यावी चांगली खबर!!

गोडवा उगा ना येई शायरीमधे;
एक एक जगतो आम्ही चवीने प्रहर!

कधी फक्त मतला लिहुनी चक्क थंबतो;
कधी कधी मतला येतो, घेवुनी बहर!

रथी महारथी आहेत, इथे मोजके;
कैक लोक ज्यांचा करती दिनरात गजर!

एकाकी किती जगावे लागले मला!
मी उगाच झालो इतके, उत्तुंग शिखर!!

मी इथे जन्मलो, शिकलो, मोठा झालो!
का मला समजते परके, हे आज शहर?

टाळले खुबीने त्यांनी आजन्म मला;
लागली वाटेत येवू माझीच कबर!

घे परिक्षा पाहिजे ती, म्हणताच तिला......
दिले जिंदगीने मजला प्यायला जहर!

न्यायदेवताही असते किती आंधळी?
एक चूक झाली! शिक्षा, केवढी जबर!

शोभेची वस्तू त्यांना मीच वाटलो......
मज कातरले अन् केले, शेवटी मखर!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

बर्‍याच ठि़काणी लय बिघडते आहे
थोडे अक्षरगणवृत्तात थोडे मात्रावृत्तात असे केले आहे काय ?.....की मलाच नीट वाचता येत नाही आहे ?
काही असो प्रयत्न छान आहे हा .....

विजयराव! वैभवराव!
ही गझल मात्रावृत्तातील आहे.
तिची लय आहे..............
१४+८=२२ मात्रा.
प्रत्येक मिस-यातला पहिला अर्धा भाग १४ मात्रांवर संपतो व उर्वरीत अर्धा भाग ८ मात्रांवर संपतो.
अक्षरगणवृत्ताप्रमाणे अशा वृत्तात लगावली व अक्षरसंख्या सारखी नसते, पण मात्रांचा हिशोब मात्र सारखाच असतो.

अक्षरगणवृत्तात जशी, काही अपवादात्मक व अपरिहार्य ठिकाणी यती न पाळण्याची सूट आपण घेतो, तशी सूट येथे फक्त एका शेरात घेण्यात आली आहे, आणि तो शेर ४ नंबरचा.
इथे उला मिस-यात यतिभंग आहे.
तो शेर असा.............

गुन्हेगार स्वत:च! न्यायाधीशही स्वत:!
आपलीच आपण घ्यावी चांगली खबर!!

इथे ठळक अर्ध्या मिस-यांची मात्रा संख्या आहे १४ व ठळक नसलेल्या अर्ध्या मिस-यांची मात्रा संख्या आहे ८. १४+८=२२मात्रा. न्याया वर यतिभंग आहे.

बाकीचे सर्व १२ शेर म्हणजे १ ते ३ व ५ ते १३ हे पूर्णपणे लयीतच आहेत.
१४+८ अशा तुकड्यात म्हणून पहा, आपल्याला लय गवसेल!

टीप: एकदा मतल्यात मात्रांचा हिशोब १४+८=२२ असे कळले की, त्या साच्यातच सर्व मिसरे गुणगुणावे, म्हणजे लय आपोआप जाणवेल.

काही ओळीत जरी अक्षरगणवृत्ताचा भास झाला तरी, मूळ वृत्त मात्रावृत्त असल्याने गुणगुणण्याची लय ही तशीच ठेवता यते. पहा गुणगुणून!
अक्षरांची संख्या प्रत्येक मिस-यात वेगळी येवू शकते, हे कृपया आवर्जून लक्षात ठेवावे!

अवांतर:

सहसा अर्ध्या वा पूर्ण मिस-याचे शेवटचे अक्षर लघू न ठेवण्याचा माझा तरी कल असतो. पण असा काही नियम नाही.
या गझलेतला काफियाच असा आहे की, शेवटचे अक्षर लघु आहे.
तरीही पहिल्या अर्ध्या मिस-याचे अन्त्य अक्षर गुरूच घेण्याचा माझ्या सवयीनुसार मी कटाक्ष पाळला आहे.

फक्त शेर नंबर ७ मधे उला मिस-यात पहिला अर्धा भाग लघु अक्षरावर संपतो. तो शेर असा आहे..........
रथी महारथी आहे इथे मोजके;
कैकलोक ज्यांचा करती दिनरात गजर!

लघु अन्त्य अक्षराचा जर अर्धा वा पूर्ण मिसरा असेल तर गाताना वा गुणगुणताना जरासे कानाला कमी गोड लागत असावे(वैयक्तिक मत).

मला स्वत:ला लघु अन्त्य अक्षराचे मिसरे वा अर्धे मिसरे आवडत नाहीत.
पण केवळ एक असाही प्रयत्न करायचा, म्हणून मी माझ्या आतापर्यंतच्या गझलप्रवासात फक्त २च अशा गझला लिहिल्या आहेत.
कारण केवळ काफियांवर/शब्दांवर असलेले माझे वेडे प्रेम! (कसर, नजर,कदर वगैरे)

दुसरी अशी गझल मी पूर्वीच पोस्ट केली आहे, जिचा मतला होता...........

स्वप्नास वास्तवाची लागू नये नजर!
झाला कळ्याफुलांचा बहरायचा प्रहर!!

पण ही गझल अक्षरगणवृत्तातील होती.
पण सदर गझल (जिच्यावर मी हा प्रतिसाद देत आहे ती) ही मात्रावृत्तात व लघु अन्त्य अक्षर असलेल्या काफियाची (गैरमुरद्दफ) आहे.
थांबतो.
असाच लोभ असावा!
..........प्रा.सतीश देवपूरकर
..................................................................................

'साधारण' अशी लय आहे

काळजात न्यायालयही एक चालते;
पुकारण्याआधी तेथे रहावे हजर!<<< शेर आवडला, खयाल आवडला

शिखर आणि शहरही चांगले शेर