मराठी गझल

आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

Submitted by मयुरेश साने on 13 July, 2012 - 15:49

आठवांचा गाव आल्यावर असे चालायचे
आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आपले नाते जणू की पान गळतीचा बहर
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे

तान मुरक्या शब्द सारे चांगले असले तरी
फक्त आलापात असते जे खरे सांगायचे

लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी
पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे

साद होती बोलकी पडसाद होता बोलका
पण तरी हातात नव्हते हात हाती घ्यायचे

.... मयुरेश साने

गुलमोहर: 

फ़सवूण आज गेले, सारेच पावसाळे !

Submitted by सुधाकर.. on 13 July, 2012 - 12:34

फ़सवूण आज गेले, सारेच पावसाळे
भोगावयास आले, नुसतेच हे उन्हाळे.

मेल्यावरीच येतो पाऊस आसवांचा
जगण्यात सांग कोठे लपतात हे जिव्हाळे?

वाकून चाल तू ही, लढण्यास जिंदगीशी
पाण्याखाली विनम्र झुकती जसे लव्हाळे.

नेकीने चालतो ही, सत्याची वाट अवघी
माझाच जीव मजला तरी पुन्हा न्यहाळे

जाता बुडूनी सांज पोटात सागराच्या
माझे अबोल गाणे पाण्यावरी खळाळे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तू म्हणतेस मज, की, चित्तचोर मी

Submitted by सुधाकर.. on 13 July, 2012 - 08:30

तू म्हणतेस मज, की, चित्तचोर मी
लोक म्हणती मज, असे बंडखोर मी.

दिसलो जरी असा, निर्विकार मी
असतो खोल आत, भावविभोर मी.

नाही दिप येथे, तुझ्या स्वागताला
काळजास केले, ही चंद्रकोर मी.

हास दु:खा उगाच, हास तुही आता
तुजसवे लावतो, पुन्हा एक जोर मी.

नको उगा बोलू, काही ही भलते
झाडाहून कसा, होईन थोर मी?

जरी तुझ्यासाठी, झालो मी बुजुर्ग
मनात एक उनाड, दडविले पोर मी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तसबीर जशी धुरळावी, मी तसे मळवतो कपडे!

Submitted by सतीश देवपूरकर on 13 July, 2012 - 07:43

गझल
तसबीर जशी धुरळावी, मी तसे मळवतो कपडे!
बदलतो हार फोटोचा, मी तसे बदलतो कपडे!!

उडतेच धूळ शब्दांची, माखतोच मी निंदेने;
बाहेर पडायापूर्वी, मी रोज झटकतो कपडे!

पायघोळ होती तेव्हा, दुमडतो मनाची वस्त्रे!
जखडल्यासारखे होते, तेव्हाच उसवतो कपडे!!

एरव्ही कसाही असतो पेहराव अंगावरती;
करकरीत कोरे जेव्हा असतात......मिरवतो कपडे!

ऎपतीप्रमाणे घेतो, निगुतीने अन् वापरतो;
का जगास वाटत आहे?....मी किती गुधडतो कपडे!

काळजी घेवुनी सुद्धा, पडतात डाग पानांचे;
चुकवून नजर पत्नीची, मी रोज भिजवतो कपडे!

मापेच बदलती माझी! करणार काय तो शिंपी?
परवडत नसोनी देखिल, दरवर्षी शिवतो कपडे!

गुलमोहर: 

... चुकून झाले!

Submitted by आनंदयात्री on 13 July, 2012 - 04:44

अनेकदा जे जगून झाले!
फक्त एकदा लिहून झाले

मला म्हणे ती - विसर मला तू!
बरेच मग आठवून झाले

करून झाल्यानंतर सुचले -
जे झाले ते चुकून झाले!

कागद भिजले, कागद सुकले
जगणे सारे टिपून झाले!

कसे सारखे रडावयाचे?
बदल म्हणुन मग हसून झाले

पसार्‍यातुनी कविता उरली
जेव्हा मन आवरून झाले!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/07/blog-post.html)

गुलमोहर: 

म्हणूया फ़क्त तो सहवास आहे..

Submitted by प्राजु on 12 July, 2012 - 13:17

तुझ्या शब्दांत जादू खास आहे
उभारी वाटते हृदयास आहे

तुझ्यासंगे खुळा एकांत माझा
किती नटतो पहा सर्रास आहे

नको नात्यास बांधू बंधनी तू
म्हणूया फ़क्त तो सहवास आहे..

'मिळाले जे हवेसे जीवनी या!'
न खात्री, फ़क्त हा अदमास आहे

तुला पाहून 'आलेला' सरीतुन
धरेने टाकला निश्वास आहे

पुढे मृत्यूस पाहुन धस्स झाले
समजले फ़क्त तो आभास आहे

-प्राजु

गुलमोहर: 

मने करुन फूलांची......!

Submitted by सुधाकर.. on 12 July, 2012 - 10:18

लहानांसाठी कधी मने, करुन फ़ूलांची लहान व्हावे
उपकाराचे हात देऊन, मरणा अंती महान व्हावे.

सुख दु:खाची करुन वारी, गाणे येईल तुमच्या दारी
मंतरलेल्या शब्दांसाठी, कधी गाण्याची तहान व्हावे.

झाडाला कधी नसते दु:ख, काळजाला सांगून द्यावे
अन्यायात कधी दुर्बलांच्या तलवारीची सहाण व्हावे.

सांग कथा ती प्रत्यकाला, जय नावाच्या पराजयाची
लढणार्‍यास ही मौनाची भाषा त्यांची आव्हान व्हावे.

ना देता आले सुख कधी, तरी द्यावे असे दिलासे की,
आनंदाच्या अश्रूमध्ये सवंगड्याचे नहाण व्हावे.

--------------------------------------------------
कठिण शब्द येता :-----
..........................

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वागाया अवखळ होता, तोंडाचा फटकळ होता!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 July, 2012 - 10:13

गझल
वागाया अवखळ होता, तोंडाचा फटकळ होता!
वस्तीत तोच एकुलता हृदयाचा निर्मळ होता!!

यश निघून गेले, त्याच्या, देवून तुरी हातावर;
दुर्दैव आडवे आले, पण, प्रयत्न प्रांजळ होता!

तो ओबडधोबड होता, तो कुटिल मनाचा होता;
पण दिसावयाला वरुनी टोकाचा सोज्वळ होता!

कोणाला नकार देणे, डिक्श्नरीत नव्हते त्याच्या;
तो भिडस्त नव्हता नुसता, माणूसच प्रेमळ होता!

अंदाज कुणाला त्याचा बांधताच आला नाही;
पाचोळा वाटत होता, वास्तवात वादळ होता!

पायाच खोदण्यामध्ये वय तारुण्याचे गेले!
बहुमजली आयुष्याच्या पायथ्यात कातळ होता!!

जन्मास दिव्याच्या आला, अन् काजळला इतका की,

गुलमोहर: 

होता होता झाले नाही

Submitted by वैवकु on 12 July, 2012 - 10:05

होता होता झाले नाही
नशीब कामी आले नाही

मी होता खोलला पिंजरा
पाखरू तरी उडाले नाही

मी म्हटले "...मग एक गझल दे!"
जीवन पुन्हा म्हणाले..."नाही!"

रडल्यावर मी चाचपलेही
काळिज कुठे मिळाले नाही

झाले गेले विसरू म्हणता
झाले हेच कळाले नाही

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल