वागाया अवखळ होता, तोंडाचा फटकळ होता!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 July, 2012 - 10:13

गझल
वागाया अवखळ होता, तोंडाचा फटकळ होता!
वस्तीत तोच एकुलता हृदयाचा निर्मळ होता!!

यश निघून गेले, त्याच्या, देवून तुरी हातावर;
दुर्दैव आडवे आले, पण, प्रयत्न प्रांजळ होता!

तो ओबडधोबड होता, तो कुटिल मनाचा होता;
पण दिसावयाला वरुनी टोकाचा सोज्वळ होता!

कोणाला नकार देणे, डिक्श्नरीत नव्हते त्याच्या;
तो भिडस्त नव्हता नुसता, माणूसच प्रेमळ होता!

अंदाज कुणाला त्याचा बांधताच आला नाही;
पाचोळा वाटत होता, वास्तवात वादळ होता!

पायाच खोदण्यामध्ये वय तारुण्याचे गेले!
बहुमजली आयुष्याच्या पायथ्यात कातळ होता!!

जन्मास दिव्याच्या आला, अन् काजळला इतका की,
दुनियेच्या लेखी अंती तो केवळ काजळ होता!

सोडला प्राणही त्याने, आसवे न सरली त्याची!
गालावर अजून त्याच्या अश्रूंचा ओघळ होता!!

जे म्हणावयाचे होते, त्यांनाही पटले नव्हते!
आवेशपूर्ण केलेला युक्तिवाद ओंगळ होता!!

तो जगावेगळा होता....तो एकलकोंडा होता!
एकाकीपणात त्याच्या, तो स्वत:च वर्दळ होता!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

जे म्हणावयाचे होते, त्यालाही पटले नव्हते!
आवेशपूर्ण केलेला युक्तिवाद ओंगळ होता!!...............

असे वाचले मी ; ...तुम्हाला चपखल लागू होते असे उगाचच वाटले :)..........(वै म. राग नसावा !!)

बाकी गझलही अप्रतिमच आहे सर खूप आवडली

देवसर,
अनेक शेर छान आहेत. परंतू पुर्ण गझलेत एकच कथा शेवटपर्यंत येते. व असे असताना अनेक शेरांमध्ये (अर्थासहीत) विरोधाभास स्पष्ट जाणवतो. उदा:-

यश निघून गेले, त्याच्या, देवून तुरी हातावर;
दुर्दैव आडवे आले, पण, प्रयत्न प्रांजळ होता!

तो ओबडधोबड होता, तो कुटिल मनाचा होता;
पण दिसावयाला वरुनी टोकाचा सोज्वळ होता!

............तो कुटिल मनाचा होता. आणि ... प्रयत्न प्रांजळ होते. Happy

इथे तुम्ही उधृत केलेला 'यश' हा शब्द त्या ओबडधोबड आणि कुटिल माणसाच्या आयुष्यालाच लागू होतो.
मग कुटिल मनाचा माणुस आयुष्यभर प्रांजळ प्रयत्न करतो का?

देवसर माप करा पण मला वैयक्तीक प्रांजळ मत मांडण्याची सवय आहे.

तो कुटिल मनाचा होता. आणि ... प्रयत्न प्रांजळ होते
>>>>>>>>>>>>>>>>>

ऑर्फी एकदम सही रे ......................... तुझ्याबद्दल लिहिलय्स ना??:)

मला माहीत होतं हे ज्याच्याबद्दल लिहीले आहे त्याला नक्कीच शंका आल्याशिवाय रहाणार नाही. Lol

ऑर्फिअसजी! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
काही मूलभूत गोष्टींचा खुलासा करतो..........
१)गझलेतील प्रत्येक शेर/द्विपदी म्हणजे दोन ओळींची स्वयंपूर्ण कविता असते.

२)एका गझलेत जर दहा शेर असतील तर त्या दहा वेगवेगळ्या स्वयंपूर्ण कविता असतात, ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. एका कवीच्या दहा वेगवेगळ्या कवितांचा आपण असा संबंध कधी जोडतो का?

३)या गझलेत कुठलेही फरफटत जाणारे कथानक नाही.

४)वेगवेगळ्या माणसांचे स्वभावविशेष वेगवेगळ्या शेरांत आले आहेत.

५)केवळ “तो’ “त्याचे” असे आल्याने संदर्भ एकाच व्यक्तीचा होत नाही.

६)फक्त मुसलसल गझलेत कवितेप्रमाणे एकाच विषयावर शेर लिहिलेले असतात, जिथे आपण विविध शेर एकमेकांशी जोडू शकतो. अन्यथा नव्हे.

टीप: गैरमुसलसल गझला जास्त लिहिल्या जातात. चित्रपटातील ब-याच गझला या मुसलसल असतात. गैरमुसलसल गझलेत देखिल काही मुसलसल शेर कुणी कुणी लिहितात. पण गझल पेश करताना शायर आधी सांगतो की, आता पुढील २ वा ३ शेर हे मुसलसल आहेत. अशा वेळी श्रोते देखिल मग ते शेर एकमेकांना जोडून पहातात. अन्यथा नाही.
...........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................

हंम्म..! बरोबर तो,त्याने, त्याचा हेच शब्द एक संघतेने एकच कथा आहे असे दर्शवतात.
पण तरी प्रत्यक शेराचा वेगळा असा अर्थ काढला तर त्याच्यातील मला तुमच्या इतर गझलेतील शेरांमध्ये
असतो तितका भरीव आशय दिसत नाही....अपवादः----

तो जगावेगळा होता....तो एकलकोंडा होता!
एकाकीपणात त्याच्या, तो स्वत:च वर्दळ होता!!

पायाच खोदण्यामध्ये वय तारुण्याचे गेले!
बहुमजली आयुष्याच्या पायथ्यात कातळ होता!! ......... हे अतिशय छान Happy

ऑर्फी : देवसर काय सान्गत आहेत ते नीट लक्षात ठेव ........... अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्यान्नी .

देवसर :धन्यवाद
काही बाबी प्रत्यक्ष अनुभव नसल्याने मलाही माहीत नव्हत्या ;जसे की.........

<<<<<<<<<<गझल पेश करताना शायर आधी सांगतो की, आता पुढील २ वा ३ शेर हे मुसलसल आहेत. अशा वेळी श्रोते देखिल मग ते शेर एकमेकांना जोडून पहातात. अन्यथा नाही.>>>>>>>>>>

धन्यवाद सर !!

पायाच खोदण्यामध्ये वय तारुण्याचे गेले
बहुमजली आयुष्याच्या पायथ्यात कातळ होता!!

मस्त विचार.