आयुषात कधी कधी अचानक आपल्याला अनोळखी असे कोणीतरी सहप्रवासी म्हणुन भेटते.आणि हा सहप्रवास चालू होतो तशी ओळख देखिल वाढत जाते. व ध्यनी मनी नसताना अत्तापर्यंत वेगवेगळे असलेल्या दोन जीवनगाण्याचे सूर जुळू लागतात. कालांतराने या ओळखीचे रुपांतर दृढ स्नेहाच्या मैत्रीत होते. मग रोजच्या व्यवाहारात आपण एकमेकांची सुख दु:खे वाटून घेऊ लागतो. अडीअडचणीत एकमेकाला मदतीचा हात देऊ करतो. आणि हळुहळू या क्षणमात्र प्रवासाची अविट गोडी वाढत जाते. ओळखीच्या झालेल्या त्या अनोळखीचा प्रवास अता नेहमीच हवा हवासा वाटू लागतो. दोघांतील कुणाच्यातरी अंधारलेल्या आयुष्यात कधी न्हवे ते टिपूर चांदणे उगवून येते.
शब्द शब्द टिपत गेलो
फ़ूले घेतली हुंगून.
अनावृत्त चालता चालता
आभाळ आलं वाकून.
कसं कधी अवचित
मुकं झालं झाड.
खोल खोल जाताना
मुळा लागली वाढ.
वळणवेड्या झर्यातून
गीत आले वाहून.
मातीसवे नातं गोवून
उन्हे घेतली न्हाऊन.
आयुष्याच्या वादळात
फ़ाटली सारी शिडं.
सैरभैर फ़िरतं आता
मन-पाखरू हे वेडं
बहर वसंताचा येण्या आधी,
फ़ूले माळण्याची हौस तू लावून घे.
फ़ुलेल मोगरा एक दिवस तुझ्याही अंगणात.
वार्याचे वादळ होण्या आधी,
स्वत:ला सावरणं तू शिकून घे
आसरा देणारी झाडच होतील कधी असाह्य प्रवासात.
मुठीतले दाणें तुझ्या संपण्या आधी,
गाणे एक आळवून ठेव
वाट चुकलेली पाखरं येतील तुझ्याही दारात.
रात्र मोहरण्या आधी,
ओढाळ मन तू जपून ठेव.
शिंपेल आभाळ चांदणं कधी तुझ्याही घरात.
आभाळ भरून येण्या आधी,
कविता एक आठवून ठेव..
स्वरांचा फ़ुटेल झरा कधी तुझ्याही अंतरात.
आज आठवे मजला
बकुळीच्या त्या सावलीला
मातीची घेऊन भांडी
तू संसार इवला मांडी.
वेणी बाहुलीची घालताना,
कितीक लागे तुजला चिंता.
कुंतल्यातला तरी सुटेना
तो लाल रेशमी गुंता.
बाहुलीशी जिव जडे
रमुन खेळशी तू वेडे
मध्येच काही मी बडबडे
करावेस तू भात-वडे
तरी साधले तुला गडे
बाहुलीचे गीत बोबडे.
निजू घातलेस बाहुलीला
बोट लावूनी ओठाला मग
अबोलाची ती शपथ मला.
निर्मळ होती बाळपणी
भातुकलीची प्रीत आगळी
तरी आज का काळीजवेळी
तुझी नि माझी वाट वेगळी?
सुट्टी दिवशी, अंगणातच मी उभा असे.
डोंगरावरून पलीकडच्या अनवाणी ती येत असे.
ती येत पाटी आवळ्याची डोक्यावर सावरत
खड्यांच्या नागमोडी वाटेवर, अशक्त पाय थरथरत.
मी नसलो की उंबर्यातच मुक होऊन बसायची.
असलो तर सुरकुत्यांच्या जाळ्यातून कधीतरी हसायची.
फ़ाटका धडपा पाटीवरून बाजूला मग करायची.
अन मुठभर आवळे हातात माझ्या ठेवायची.
मी विचारत: ’झाडावर ही चढतेस तू?’
ती खेकसत: ’मेल्या,उगाच का मग खातोस तू!’
आवळ्यांसाठी ती हिंडत असे रानभर,
करवंदीच्या काट्यांचे ओरखडे घेत अंगभर.
गाठी मारून सांधलेलं फ़ाटकं होतं लुगडं
वणवण हिंडून फ़ुटलेलं पाय होतं उघडं.
पाहून वाटे खुप,आपणही तिला द्यावं काही,
ओंठांत गंजल्या माझ्या
मी मंत्र बांधले होते.
दोघात नदीच्या काठी
आधी कोण बोलले होते?
ते गीत सांज उन्हांचे
या देहात मुरले होते.
दोघांच्या अबोलपणी ते
सांग कुणी गायले होते?
पाण्यात उतरता शेजा
मी स्वप्न सांधले होते.
सोडून हात तू जाता,
का परतून पाहीले होते?
तू चंद्र व्हावेस माझा म्हणूनी,
मी सुर्य लोटले होते.
’वेड्या!’ गौर केतकी माझे,
मी हात पोळले होते.
कधीतरी उगाच भटकत फ़िरावं,
अन मध्येच वळून वाट उगाच दूर पळावी.
उगाच ऊन तापावं खिरावं,
अन वेडी पावलं उगाच चूर जळावी.
कधीतरी उगाच रान हिडावं,
अन तळ्याकाठी उगाच उभं रहावं.
उगाच पाण्यात खडा टाकावा,
अन बुडबूडा ही उगाच यावा.
कधीतरी उगाच हसावं फ़ूलांशी,
अन खोटंच रूसावं कळ्यांशी.
उगाच बोलावं झाडांशी,
अन स्तब्ध व्हावं उगाच पहाडांशी.
कधीतरी उगाच यावी सांज निसूर
अन रानभर पसरावी उगाच हुरहूर.
उगाच शोधावा नदी झर्यातून आपला सूर
अन मध्येच फ़ुटून आसवांचा खरेच यावा पूर
कुणी विरुप घेऊनी आले
कुणी आरोप लावून गेले.
एका पेक्षा एक भेटले
सारे एकाच गुरूचे चेले.
स्वत:साठी मी टाकलेले
कुंपण कोणी मोडून गेले.
झाड नाही कुणी लावले,
तरी बाग सारी मोडून गेले.
चालताना हे काय झाले
मागच्यानेच पाय ओढले.
फ़क्त एका असुयेपोटी अन,
तोंडघशी मज पाडून गेले.
सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर.
कुण्याकाळचा फ़िरुनी येतो,जुन्या स्मृतींचा पूर.
सागराची लाट जणू रुद्र त्सूनामी वादळाची
किती आवरू किती सावरू सये फ़ुटून जातो उर.
दिलीस जेंव्हा हसूनी मजला खोटी वचने तेंव्हा
स्वप्नभूलीत घोड्यानेही चौखूर उधळले खूर.
नेहमीच असतो तसाच आहे आजही येथे मी
तरी आरसा कशास दावी हा जगावेगळा नूर
भूत-भविष्या मध्ये अडकला,क्षणभराचा वर्तमान
किती चाललो तरी रिकामा वाट जाते दूर दूर.
मुक्या जिवाचा मुक्या मनाशी मुकेपणी रोज तंटा
कधी यायचा तुझ्या नि माझ्या गाण्याला एक सूर.
किती चाललो जपून होतो तरीही लागली ठेच
नशीब मेले असेच जाते देऊन हतावर तूर
जीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.
प्रीती म्हणजे चौपाटीची भेळ नाही.
एकच आमुचे आकाश आहे.. एक जमीन.
तरी कसा मग तुझा नि माझा मेळ नाही?
सुख दु:खाचे देणे घेणे राहोच पण,
अंत्ययात्रेस कुणाकडेही वेळ नाही.
आत्मपीडाच दाव म्हणतो कोण शहाणा,
आत्मा म्हणजे सोलायाचे केळ नाही.
ओळख माझी सुधाकरीला चाखून घ्या
देवदार मी रानामधला हेळ नाही.