पिकलेली आळवं

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 06:26

सुट्टी दिवशी, अंगणातच मी उभा असे.
डोंगरावरून पलीकडच्या अनवाणी ती येत असे.
ती येत पाटी आवळ्याची डोक्यावर सावरत
खड्यांच्या नागमोडी वाटेवर, अशक्त पाय थरथरत.
मी नसलो की उंबर्‍यातच मुक होऊन बसायची.
असलो तर सुरकुत्यांच्या जाळ्यातून कधीतरी हसायची.
फ़ाटका धडपा पाटीवरून बाजूला मग करायची.
अन मुठभर आवळे हातात माझ्या ठेवायची.
मी विचारत: ’झाडावर ही चढतेस तू?’
ती खेकसत: ’मेल्या,उगाच का मग खातोस तू!’
आवळ्यांसाठी ती हिंडत असे रानभर,
करवंदीच्या काट्यांचे ओरखडे घेत अंगभर.
गाठी मारून सांधलेलं फ़ाटकं होतं लुगडं
वणवण हिंडून फ़ुटलेलं पाय होतं उघडं.
पाहून वाटे खुप,आपणही तिला द्यावं काही,
चप्पल आणि लुगडं द्यायला राजी झाली आई.
पण अलिकडे आता ती, कशी येतच नाही?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users