वळीव
वळीव-१
आज सुट्टी असल्याने मला फारशी घाई नव्हती. फक्त पोळ्या केल्या तरी पार्थचे आणि गार्गीचे काम भागणार होते. बाप लेकी दुध पोळी आवडीने खातात. दुपारी काहीतरी घाट घातला की झाले. पार्थ सकाळीच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता, दोन पोळ्या होईतोवर तो आला असता. मी एका बाजुला थोडी वेलची पुड टाकुन दुध गरम करायला ठेवले होते व दुसरीकडे पोळ्या करत होते. मागे फ्रिज उघडल्याचा आवाज आला. मला जरा आश्चर्य वाटले. पार्थ कसा काय इतक्यात आला? त्याला काही विचारावे म्हणून मी मागे पाहीले तर गार्गी फ्रिजमधुन काहीतरी काढत होती.
उन्हाळा संपताना...
उन्हाळा संपता संपता पावसाची लागलेली चाहूल मनाला सुखावणारी असते आणि भिजवणारीही. ढग मोठ्या धिटाईने आकाशभर संचार करू लागलेले असतात. अवचित सुर्यालाही झाकण्याचं धाडस करू धजावतात ते. उन्हाची धग कमी होते आणि चाहूल लागते पावसाच्या पहिल्या सरीची. पावसाची वाट पाहण्याचा हा काळ, उन्हाळा संपतानाचा.
वळीव...
आज काहीतरी कुरबुर
तो तसाच गेला ओफिसला
नेहमी कवेत घेऊन चुंबन
आज मागे वळुनही न पाहीलेला
.
ती आता एकटीच घरी
सारे आसमंत उन्हाने पेटलेले
रिकामे रिकामे तिचे घर
एकटीला खायला उठलेले
.
दुपारी अवचित बेल वाजली
मेघांचा गडगडाट सुरू झालेला
हुरहुरत्या नजरेने तिने पाहीले
बाहेर अनपेक्षित पणे तो आलेला
.
दरवाजा उघडला वीज कडाडली
नेत्र कटाक्षांचा खेळ सुरू झालेला
सुटले बंधन आवेगाने आलिंगन
बाहेर वळीव तूफान गर्जत आलेला
.
बाहेर वळीव तूफान गर्जत आलेला
.
-अतुल