वळीव-१
आज सुट्टी असल्याने मला फारशी घाई नव्हती. फक्त पोळ्या केल्या तरी पार्थचे आणि गार्गीचे काम भागणार होते. बाप लेकी दुध पोळी आवडीने खातात. दुपारी काहीतरी घाट घातला की झाले. पार्थ सकाळीच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता, दोन पोळ्या होईतोवर तो आला असता. मी एका बाजुला थोडी वेलची पुड टाकुन दुध गरम करायला ठेवले होते व दुसरीकडे पोळ्या करत होते. मागे फ्रिज उघडल्याचा आवाज आला. मला जरा आश्चर्य वाटले. पार्थ कसा काय इतक्यात आला? त्याला काही विचारावे म्हणून मी मागे पाहीले तर गार्गी फ्रिजमधुन काहीतरी काढत होती.