रात्र
***
आज पुन्हा चांदण्यांनी
बहरून रात्र गेली
रातराणीच्या फुलांनी
उमलून रात्र गेली
सरल्या शंका कुशंका
मूक व्यर्थ रुष्ठताही
विरहात अंध दीप
पेटवून रात्र गेली
कळले कुणास आज
जीव प्राण वाहीलेला
भरुनी डोळ्यात कुणाच्या
पाझरून रात्र आली
नियती सदैव देई
डाव अर्धा हरलेला
तव हाती बदलून
उजळून रात्र गेली
मन शुभ्र अंगणात
कोजगरी ही नटली
रित्या जगण्यास माझ्या
सजवून रात्र गेली
पुन्हा त्याच गावात आलो
- स्वच्छंदी/महेश मोरे
तुझी भेट घ्याया लिलावात आलो
कळालेच नाही न् प्रेमात आलो
जणू काय जादूच स्वप्नात झाली
दिला हात हाती न् ह्रदयात आलो
जुना फाटका कोपरा पेपराचा
तुला भेटलो चारचौघात आलो
भ्रमंती जगाची जरी खूप केली
फिरूनी पुन्हा त्याच गावात आलो
असा जिंदगीचा लळा लागला की
पुन्हा श्वास घेऊन देहात आलो
गझल..............
गुलाम शिल्लक आहे
- स्वच्छंदी / महेश मोरे
तुला जिंदगी करावयाचा सलाम शिल्लक आहे
कधी हारलो नाही ,माझे इनाम शिल्लक आहे
तुझी नि माझी बदामातली पुसून गेली नावे
तरी वाळल्या खोडावरला बदाम शिल्लक आहे
लोकशाहीच हसत बोलली स्वप्नामध्ये मजला
म्हणे माणसामध्ये अजूनी निजाम शिल्लक आहे
दगडापुढती नाही झुकली मान कधीही ज्याची
मला वाटते त्याच्यामधला कलाम शिल्लक आहे
नकोस समजू आयुष्या की डाव संपला माझा
राजा गेला,राणी गेली,गुलाम शिल्लक आहे
अजुनही मनामधे पोर एक नांदते
बंधमुक्त व्हायचे रोज स्वप्न पाहते
लग्न हा जुगार पण खेळतो हरेकजण
दान चांगले तुला .. बघ पडेल वाटते
कोंडले किती जरी दुःख वाट काढते
दाह जीवनातला भेग भेग सांगते
दैन्य झोपड्यांतले बघुन लाज वाटते
त्यामुळेच लांब मग शहर त्यांस ठेवते
प्राण फुंकलेस तू मर्त्य जीवनामधे
त्यामुळेच मी अशी अमृतात नाहते
आजकाल मूड तर सारखाच बदलतो
काव्यही सखे तुझे त्यानुसार वागते
कविता क्षीरसागर
सावल्या ...
साथ तर देतात ना सावल्या आपापल्या
सोसुनी सारी उन्हे ना कधी तक्रारल्या
दाह होतो आजही आठवांनी त्या जुन्या
भस्म केल्या त्या स्मृती ज्या नकोशा वाटल्या
हात केला उंच तर टेकते आभाळही
ठेवता विश्वास तू मनगटावर आपल्या
पात्र हे विस्तीर्णसे डोंगराने अडवले
डोलतिल तेथे पिके ..शक्यता ह्या वाढल्या
कोरड्या रेतीपरी शुष्क झाले अंतरी
शोध चाले रोज हा ..भावना का आटल्या !!
कविता क्षीरसागर
अजुनही मनामधे पोर एक नांदते
बंधमुक्त व्हायचे रोज स्वप्न पाहते
लग्न हा जुगार पण खेळतो हरेकजण
दान चांगले तुला .. बघ पडेल वाटते
कोंडले किती जरी दुःख वाट काढते
दाह जीवनातला भेग भेग सांगते
दैन्य झोपड्यांतले बघुन लाज वाटते
त्यामुळेच लांब मग शहर त्यांस ठेवते
प्राण फुंकलेस तू मर्त्य जीवनामधे
त्यामुळेच मी अशी अमृतात नाहते
आजकाल मूड तर सारखाच बदलतो
काव्यही सखे तुझे त्यानुसार वागते
कविता क्षीरसागर
प्रार्थना नाकारली जेव्हा घनांनी
भिजवले मग शेत त्यांनी .. आसवांनी
का असे झाकोळले आहे अचानक
छेडला मल्हार बहुधा आठवांनी
कोरडे नक्षत्र गेले .. चिंब डोळे
गर्जना नुसतीच केली ह्या ढगांनी
पावसाळी रात्र होती एक छत्री
जवळ आलो.. अर्धओलेत्या क्षणांनी
ही तुझ्या त्या पावसाची छेडखानी
पकडली चोरी पुन्हा ओल्या खुणांनी
वीज पडल्यासारखे झाले मनावर
तोडला जेव्हा भरोसा प्रियजनांनी
श्रावणाचा भासही देई तजेला
सोसले चटके उन्हाचे त्या घरांनी
कविता क्षीरसागर
शिंपल्या बागा मनाच्या तूच साऱ्या
लावल्या आशा क्षणाच्या तूच साऱ्या
**
आयुष्याला दान केले मैफिलीला
छेडल्या तारा सुखाच्या तूच साऱ्या
**
आदिमाया तू जगाची सर्वसाक्षी
पेटवीले या नभाला तूच साऱ्या
**
मी सुखाने पाहता हे शेत माझे
गारपीटे झोपवीले तूचसाऱ्या
**
चालताना आडवाटा आयुष्याच्या
सोड चींता तू मनाच्या तूच साऱ्या
**
जो मुलीचा बाप होतो भाग्यवाना
भ्रूणहत्या थांबवा रे तूच साऱ्या
**
शोभली ती माय राजा शिवबाची
शोभली ती मॉं जनाची तूच साऱ्या
**
प्रकाश साळवी
आता बोथट झालो आहे
पुरता मी नट झालो आहे !
फिरतो माझ्या मागे मागे
मी मी-लंपट झालो आहे.
मारुन डोळा खरे बोलतो
इतका चावट झालो आहे.
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्
थोडा उद्धट झालो आहे
मार्ग तुझा अनुसरला, आता
मीही अनवट झालो आहे
प्रत्येकाच्या मनाजोगता
हसरा शेवट झालो आहे
~चैतन्य दीक्षित
जो ताठ मानेने जगाशी वागला होता
तो वृद्ध कमरेतून आता वाकला होता
मी नाईलाजाने उभ्या केल्यात या भिंती
तू एवढा मजबूत पाया बांधला होता
आत्ताच का केलीस तू सुटका तुरुंगातुन !
आत्ता कुठे कैदी रमाया लागला होता
मी ओढली चादर तरी तो हालला नाही
तो पांघरूनी सोंग तेव्हां झोपला होता
रस्ते तुझे, गल्ल्या तुझ्या, शहरे तुझी सारी
तू कोणत्या कारागृहातुन हरवला होता ?
-भालचंद्र