लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध)
...सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या माथ्यावरून असंख्य डोंगरवळया, घळी, ओढे, झुडपं, कारवीचे टप्पे अश्या मार्गावरून खडतर भटकंती चालू होती. ६-७ तासांच्या सलग चालीनं, चढ-उतारानं पाय कुरकुरताहेत, पाठीवरच्या हॅवरसॅकचं वजन चांगलंच जाणवतंय आणि आजच्या मुक्कामाच्या जवळपासही पोहोचलो नाहीये. अश्यावेळी पुढच्याच वळणाआड दडलेला एक ओहोळ खळाळत सामोरा येतो. थंड पाण्यानं, दाट झाडो-यानं आणि सगळा आसमंत प्रसन्न करणा-या रंगीबेरंगी फुलपाखरांनी आम्ही सुखावतो. जुन्या ट्रेक्सच्या आठवणी निघतात, हास्यकल्लोळात स्थळ-काळ-वेळेचं फारसं भान राहत नाही अन भटकंतीची रंगत वाढतच जाते...