पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
आपण कितीही कोरडे असलो
तरी पाण्यासारख वहाव
वाहून न्याव्यात कधी कागदाच्या बोटी
बरसण्यासाठी मिळतात नाणीही खोटी
कधी असच छोट्या सुखासाठी झगडावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
अंगणी चिखल होतो कधी कधी
पण त्यामुळेच बहरतात पेरलेली दाणी
कधी येतो पूर, कधी वाहून जातात गायी
पण समतोलासाठी कधी अस पण करावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
ती खिडकीतुन बघता पाऊस
पाऊस काचेवर रेंगाळला
नभ गुरगुरता त्याचे वरती
पाऊस किती बरं ओशाळला
नभास दिसते नुसती खिडकी
अन दिसते ना काही
स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी
पाऊस रेंगाळत राही
कोपे नभ ओढी पाठीवर
लकलकता आसूड
लखलखली ती विजेहून
पाऊस वेडा अल्लड हूड
नभास आले कळोनी सारे
तिरक्या केल्या धारा
काचेवरुनी थेंब झटकण्या
घोंगावत ये वारा
फरफटले ते काचे वरती
तरी न सोडला धीर
वादळात त्या उभे ठाकले
ईवलेसे प्रेम वीर
काचेवरती आर्त थाप
पण तिला कसे कळावे?
थेंबांचे न दिसती अश्रू
मग कोणी कसे पुसावे?
काय भासले तिला कळे ना
ठेवले अधर काचेवरती
गहिवरला कोसळला पाऊस
पुलकित झाली धरती
माझ्या कोकणची माती
जशी अत्तराची खाण
नभरस कोसळता
देते सुगंधाचं वाण
आला मेघराज नभी
धरा कुंकवाची डबी
हिरवं सोनं लेउनिया
दिसे नववधू छबी
गोड लागतो खायला
ऐन उन्हाचा व्यायला
बाळंतपण लेकीचं
लागे काळजी आयेला
आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड
हरवता पायवाटा
गावे तेरडा टाकळा
नाही कुणाचंच भय
रवळनाथाचा हा मळा
घेता पागोळ्या ओच्यात
त्यात मिळे पारिजात
मळा मेंदीभरले हात
त्यात तरारेल भात
नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू
तिला छेडते आबोली
किती किती गं मायाळू
बघ सरेल श्रावण
मग येईल भादवा
माहेरवाशी गौवरया
बाळा गातील जोजवा
आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल
कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय
पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप
आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस
खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर !
-सत्यजित