आज सागर 'गोड' जाहले
***
फेर धरला वार्याने दाटुनी आले आभाळं
मळभ साचला वातावरणी, धावुनी आली शितलहर
सोसाट्याच्या वार्याने उडाले छत बावरुन
धुळ्-केराने घेतल्या गिरक्या
झाडे-झुडुपे.. नतमस्तक...
पाहुनी नभी अवाढव्य काळे हत्ती
प्राणी मात्रांत पसरली एक भिती
अकस्मात हे आज घडले
सुर्याने ही तोंड लपविले
भरदुपारी अंधारुन आले
होते नव्हते सगळे धावपळीला लागले..
विद्युलता ती कसली भिती तिज
काळ्यामधुनी ती 'शुभ्र' चमकली
मेघांच्या गर्भातुनी, अवकाशाच्या कवेतुनी
माणिक-मोत्यांची क्षणांत तिने सुटका केली...
पाहताक्षणी 'धरे'ला त्यांनी घर आपले ओळखिले
स्वःअस्तित्त्व त्या मोत्यांनी या मातीला समर्पिले