कारणे (तरही गझल)
काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
प्रसवली होती जणू पस्तावण्याची कारणे
वेस आली आडवी अन् गाव तेथे थांबला
हेरली तेव्हाच मी ओलांडण्याची कारणे
वाचले सारे खुलासे लाजर्या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे
मी फुलांचा गंध होतो अन् ऋतूंचा लाडका
ही अशी स्वप्नेच होती झोपण्याची कारणे
एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!
वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे
स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे
कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे