ही जगाची रीत नाही[तरही]
दग्ध बी रुजवीत नाही
ही जगाची रीत नाही
शोधसी जेथे प्रकाशा
स्नेह त्या समईत नाही
कोरड्या वातीस ज्योती
मंदशी जळवीत नाही
वाळल्या पुष्पास भ्रमरा
प्रीत खिजगणतीत नाही
राग नाही सूर नाही
हे तुझे संगीत नाही
मोहवी जो तनमनाला
गंध तो मातीत नाही
सूर्यही झेलून छाया
रात्रिला उजळीत नाही