फार झाले (साती)

Submitted by साती on 31 January, 2011 - 01:05

भोग सारे पार झाले
दु:ख आता फार झाले ||

भाषणाच्या सांगतेला
कोरडे आभार झाले ||

तू कसा ल्यावा मुलामा
चोरटे सोनार झाले ||

एकही ना यार झाला
शेकडोंनी जार झाले ||

रक्त कैसे थोपवावे
वार वारंवार झाले ||

जाणत्यांचे काय सांगू
कोवळेही ठार झाले ||

ओघळावे आज अश्रू
पापण्यांना भार झाले ||

पाल मी ठोकू कुठे हे
मोकळे बाजार झाले ||

भाव माझा ऐकताना
थक्क बघ व्यापार झाले ||

कोन माझे तासुनी मी
आज गोलाकार झाले ||

देत ''साती'' हुंदके जे
ते कथेचे सार झाले ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरेरे,यातले काही मिसरे अगोदरच लिहिले गेलेत.
संबंधितांनी माफ करावे.
किंवा 'ग्रेट पिपल थिंक अलाईक" म्हणून सोडून द्यावे Happy

छान