कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते -साती

Submitted by साती on 10 January, 2011 - 01:20

अताशा भावनांचे पाट सारे आटले होते
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते ||

कशाला का कुठे कोणी कधी कैसे कुणासाठी
तुझ्या नजरेत सारे प्रश्न माझे दाटले होते ||

हवा तो अर्थ लावावा हरेकाने पहाताना
असे मी चित्र सारे पांढरे रेखाटले होते ||

हवे मजला असे काही तुझ्यापाशी मुळी नाही
जरी देहास तुझिया तू दुकानी थाटले होते ||

कुणाची चूक ना झाली असे सहभाग दोघांचा
तरी नजरांत सार्‍या मी तनाने बाटले होते ||

भरोसा काळसर्पाचा कसा केला असावा मी
मधासाठी विषाचे ओठ त्याचे चाटले होते ||

मिळवली अर्जुनाने ती नसे भिक्षा असे कांता
तरी कृष्णेस का तू पांडवांना वाटले होते ||

कसे "साती"स फुट्ले कोंब नी कुठले धुमारे हे
तिला त्यांनी मुळाशी छाटण्याचे घाटले होते ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हवा तो अर्थ लावावा हरेकाने पहाताना
असे मी चित्र सारे पांढरे रेखाटले होते>>>> व्व्वा !

(मतला नाही, गझल होण्यासाठी मतला आवश्यक!)

(बाटले हा शेरही छान!)

पांढरे चित्र फारच आवडला.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

व्वा! सर्व शेर आवडले.

<<<अताशा आठवांनाही तुझ्या नाही मनी थारा
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते ||

कशाला का कुठे कोणी कधी कैसे कुणासाठी
तुझ्या नजरेत सारे प्रश्न माझे दाटले होते ||

हवा तो अर्थ लावावा हरेकाने पहाताना
असे मी चित्र सारे पांढरे रेखाटले होते ||

भरोसा काळसर्पाचा कसा केला असावा मी
मधासाठी विषाचे ओठ त्याचे चाटले होते ||

मिळवली अर्जुनाने ती नसे भिक्षा असे कांता
तरी कृष्णेस का तू पांडवांना वाटले होते ||>>>

हे विशेष आवडले!!

<<कशाला का कुठे कोणी कधी कैसे कुणासाठी>> प्रत्येक शब्दानंतर प्रश्नचिन्ह घातल्यास अर्थ जास्त स्पष्ट होईल.

मथळ्याविषयी बेफिकीरशी सहमत! Happy

फार छान.... Happy

प्रत्येक शेर अर्थगर्भ आहे......

मतला लिहून टाका साती.... म्हणजे परिपूर्ण अन निर्दोष गझल होईल.... Happy

पुलेशु,.. Happy

स्वागत गझलेच्या प्रांगणात...

पांढरे चित्र हा शेर खूपच आवडला...अभिनंदन

<<हवा तो अर्थ लावावा हरेकाने पहाताना
असे मी चित्र सारे पांढरे रेखाटले होते ||>> मस्त !
मतला विशेष आवडला.