'श्रम ही है श्रीराम हमारा' असं कायम म्हणणारे मुरलीधर देविदास आमटे, म्हणजे बाबा आमटे अनेकांना माहीत आहेत ते 'महारोगी सेवा समिती'चे संस्थापक म्हणून. कुष्ठरोगी-अंध-अपंग-आदिवासी यांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभं करणारी ही संस्था गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. बाबांचं कुष्ठरोग-निर्मूलनाचं, अंध-अपंग-आदिवासी यांच्या पुनर्वसनाचं, त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचं काम खूप मोठं असलं, तरी बाबांची तत्त्वं, त्यांची मतं ही त्यांच्या संस्थेच्या परिघात अडकून राहिली नाहीत.
समाजात अद्वितीय काम करणार्या समाजपुरुषांना, संतांना, कलाकारांना आपल्याला आवडणार्या-पटणार्या-मानवणार्या विचारचौकटीतच बसवणं, हा आपला आवडता उद्योग आहे. त्यामुळे सामाजिक-धार्मिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना दैवत्वही चटकन प्राप्त होतं. या समाजदैवतांच्या नावे मग आपले विचारही काहीजण खपवतात. इतरांना नव्यानं विचार करण्याची गरज वाटत नाही.
'एक नेता, एक मैदान' ही शिवसैनिकांची अनेक दशकांपासून श्रद्धा. बाळासाहेब ठाकरे गेले, आणि या श्रद्धेला तडा गेला. महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणंही त्यांच्या निधनामुळे बदलली.
बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार! बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.
भीती ही मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंही कधीकधी आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी, साहसाशी असतो. गूढ, रहस्यमय असं काही अनुभवणं ही मानवी मनाची गरजच असते, आणि चित्रपटांमधून, पुस्तकांमधून काही अंशी ती पूर्णही होते. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी गेली काही दशकं खिळवून ठेवलं आहे. आता हृषिकेश गुप्ते या तरुण लेखकानं आपल्या गूढकथांद्वारे हा वारसा पुढे नेला आहे.
जागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त.
आपल्याला हवं तसं जगणं फारसं सोपं नसतं. सर्वसामान्यांनी एक चाकोरी स्वीकारलेली असते. अमुक इतकं शिक्षण, मग नोकरी, लग्न, दोन मुलं. सामाजिक भान असेल तर थोडंफार घरानोकरीव्यतिरिक्त सामाजिक कार्य. ही चाकोरी मोडून आपल्या आनंदाला प्राधान्य देणारे फार कमी. श्री. चंद्रकांत वानखडे मूळचे विदर्भातले. कॉलेजात असताना जयप्रकाश नारायणांच्या 'तरुण शांती सेने'च्या संपर्कात आले, आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा सापडली. नागपूरला भरलेल्या शांती सेनेच्या शिबिरात आर्थिक क्रांती, संघर्ष, अहिंसा, श्रमदान अशा सर्वस्वी अनोळखी शब्दांनी त्यांना भुरळ घातली.