विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्‍या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.

श्री. नितीन चव्हाण हे मुंबईच्या वडाळ्यातील झोपडवस्तीतले कार्यकर्ते. त्यांच्या आईच्या अंगात यायचं, तसंच वयाच्या वीस-एकविसाव्या वर्षापासून त्यांच्याही अंगात वारं संचारू लागलं. पुढे मानसोपचारतज्ज्ञांनी ‘अंगात येणं’ हा मानसिक आजार कसा आहे, हे त्यांना समजावलं. य. दि. फडके, कुमार केतकर, डॉ. दाभोलकर यांच्या व्याख्यानांतून, पुस्तकांच्या वाचनातून ‘वारं’ बंद करण्यापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला, हे त्यांच्याच शब्दांत.

***

साल १९९१. डिसेंबरची मरणाची थंडी. सोबत जवळपास आमचा पन्नासजणांचा जथ्था. थंडीच्या कडाक्यात पहाटे पाच वाजता कर्‍हा नदीच्या पात्रात उतरलो. पहाटे नदीचं पाणी उबदार असतं. त्यामुळे पाण्यात असेपर्यंत थंडी जाणवली नाही. नदीतून बाहेर आल्यावर मात्र शरीराचं अक्षरशः मुटकुळं झालं. या मुटकुळ्या अंगानंच जेजुरी गडाच्या दिशेनं निघालो. पहाटे साडेसहाच्या सुमारास बोचणारा गार वारा सोबत घेऊन गडावर पोहोचलो. भाविकांकडून केला जाणारा ‘येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाचा येळकोट...’ गजर कानात घुमत होता. गडाच्या उघड्या पठारावर वारा आणखी बेभान झाला होता. पठाराचं सारं प्रांगण हळदीनं माखलं होतं. भवतालाला सोन्याची झिलई आली होती.

गाभार्‍यात जाऊन खंडोबाचं दर्शन घेऊन प्रांगणातल्या पितळी कासवापाशी आलो. आईनं मंदिराच्या कळसाकडे एकवार नजर फिरवली आणि मोठ्या आवाजात ‘येळकोट येळकोट जय मल्हार...’ ललकारी दिली. त्या आवाजानं गडाचा आसमंत थरारून गेला. वार्‍याच्या लयीसोबत आईचं शरीर हिंदकळत होतं. माझ्यासाठी हे नवीन नव्हतं. मागची अनेक वर्षं तुळजापूर, कोल्हापूर, जेजुरी इथे आईच्या अंगात येणं हे चित्र मनावर कोरलं गेलं होतं. यंदा त्यात नावीन्य इतकंच होतं, की तुळजापूरला, कोल्हापूरला देवीसमोर केस मोकळे सोडून घुमणारी, घरी बायांचं - सात आसरांचं वारं आलं की प्रासादिक, सात्त्विक गळ्यानं गाणी म्हणणारी माझी आई जेजुरीत चक्क खड्या पुरुषी आवाजात बोलत होती. तिच्या शारीरिक हालचालीत कुठेच स्त्रीमार्दव दिसत नव्हतं. उभं राहण्याची पद्धतसुद्धा स्त्रीसुलभ नव्हती.

गडावरील बेफाम गारठ्याचा यत्किंचितही परिणाम तिच्यावर जाणवत नव्हता. अंगात घुमणार्‍या वार्‍यानं तिच्या शरीराला जोरदार हिसडे द्यायला सुरूवात केली. वडील पुढे सरसावले आणि त्यांनी तिच्या कपाळाला हळदीचा भंडारा लावला. ‘बोला देवा कसं येणं झालं,’ म्हणत ते आईच्या पाया पडले. वडिलांनी गाव आणि भावकी यांसंबंधातील काही प्रश्न विचारल्यानंतर ‘यंदा हे पुरुषी आवाजाचं नवीन रूप काय?’ असा सवाल केला. त्यावर वार्‍यानं कोणतंही भाष्य न करता ‘हे वारं आता तुझ्या पुढच्या पिढीकडे सोपवतोय’ असं सांगत माझ्या डोक्यावर हात ठेवला. वार्‍याच्या त्या स्पर्शानं काही क्षण माझं अंग शहारलं. मात्र, झाला प्रकार काय होता हे मला आणि वडिलांना कितीसा आकळला, ते मलाही आता सांगता येणार नाही. माझं वय त्यावेळेस २०-२१च्या घरात असेल.

पुढचं वर्ष १९९२. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा. त्या वर्षी आई-वडिलांसोबत उत्तरेच्या तीर्थयात्रेला गेलो होतो. आई तिच्या गुरूमहाराजांच्या उत्सवानिमित्त दरवर्षी वडाळ्यातून पन्नास भाविकांची एक लक्झरी बस घेऊन तीर्थक्षेत्रांची यात्रा करत असे. यात्रेत भाविकांच्या सेवेला, त्यांच्या बॅगा उचलण्यासाठी, वयोवृद्ध भाविकांना सांभाळण्यासाठी, जेवणासाठी लागणारं पाणी, लाकडं आणून देण्यासाठी मला आणि माझा मित्र संतोषला सोबत नेत असे. पोरसवदा वयं होतं. शाळेला दांड्या मारून बाहेर भटकायला जाम आवडायचं. तब्बल तेवीस दिवसांच्या या उत्तरेतल्या तीर्थयात्रेदरम्यान विंध्याचल पर्वत भागातून जात असताना दुपार झाली होती. वाटेत एक नदी दिसली. प्रवासानं आंबलेल्या शरीरधर्माच्या अंघोळीसाठी आम्ही नदीत उतरलो. अंघोळी सुरू असतानाच एक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नदीकाठी आणण्यात आला होता. आमच्यातल्या जाणत्या लोकांनी सांगितलं, आपण नदीच्या स्मशानाजवळच्या पात्रात आलो आहोत. सगळ्यांनीच कशाबशा आंघोळ्या आटोपत्या घेतल्या आणि तिथून काढता पाय घेतला. वाराणसीच्या जवळपास येत असतानाच ६ डिसेंबर उजाडला.

तिकडे अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली होती. संपूर्ण उत्तर प्रदेशात दंगलीचा वणवा भडकला होता. तीर्थयात्रा अर्ध्यातच आटोपून आम्ही मुंबईच्या दिशेनं निघालो. वाटेत अनुभवलेला दंगलीचा दाहक अनुभव स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

चार-पाच दिवसांच्या अथक प्रवासानंतर मुंबईला पोहोचलो. त्यानंतर अनेक दिवस माझं डोकं वारंवार गरगरायला लागलं होतं. अठरा ते वीस दिवसांच्या बसच्या अथक प्रवासानंतर आलेला हा शिणवटा असावा असं वाटायचं. तसंच स्मशानात केलेल्या अंघोळीदरम्यान भुताच्या झपाट्यात आला असेल असा अंदाज आसपासच्या शेजार्‍यांनी केला. कशातच मन लागत नव्हतं. आतून खूप अस्वस्थं वाटायचं. एके दिवशी संध्याकाळी घरी आईसोबत देवाच्या आरतीला उभा राहिलो असताना एखाद्याच्या अंगात वारं येत तस माझं शरीर डोलायला लागलं. हा काय प्रकार आहे ते आईला बरोबर समजलं. आईनं माझ्या अंगात आलेल्या वार्‍याला “अखेर आलास तर...’’ अशा सूचक शब्दांत विचारलं. अर्धग्लानीत असलेल्या मला माझ्या शरीरात काही तरी बदल घडतोय याची जाणीव व्हायला लागली होती. सुरुवातीचे काही दिवस फक्त मूकपणे शरीर डोलायचं. कुणाशी काहीच बोलायचो नाही. देव्हार्‍यातल्या भवानीच्या मूर्तीकडे खूप वेळ टक लावून पाहण्याचा प्रकार सुरू झाला. एके दिवशी रविवारी घरी बकर्‍याचं मटण खाल्लं आणि सार्‍या शरीराचा भडका उडाला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा गजर करत खूप वेगाने शरीरानं गिरक्या घ्यायला सुरुवात केली. खंडोबाचा जयघोष करत सारं घर डोक्यावर घेतलं. घराच्या भिंती पत्र्याच्या होत्या. कधी या पत्र्याला तर कधी त्या, अशा धडका देत बेभानपणे वारं घुमत होतं. अंगात प्रचंड ताकद आली होती. वडिलांनाही मला रोखता येणं कठीण होऊन बसलं होतं. आईनं देव्हार्‍यातल्या हळदी-कुंकवाच्या करंड्यातली हळद काढली आणि माझ्या कपाळाला लावली. वार्‍यानं जागेवर उंच उंच उड्या घेत ‘येळकोट येळकोट’चा घोष आणखी तीव्र आवाजात सुरू केला.

आईच्या अंगात आमच्या कुलदेवतेचं - तुळजाभवानीचं वारं यायचं. त्या वार्‍याला एके दिवशी वडिलांना विचारलं, “मुलाच्या अंगात येण्याचा हा नवीन प्रकार काय आहे?’’
देवानं सांगितलं, “खंडोबाच्या वार्‍यानं तुला जेजुरीत काय सांगितलं होतं... हे वारं पुढच्या पिढीकडे सोपवतोय म्हणून, ते विसरलास?’’
वडिलांना तो जेजुरीतला प्रकार आठवला.
पुढच्याच क्षणी त्यांनी, “मुलगा अजून लहान आहे. या वयात हे असलं वारंबिरं काही नको,’’ म्हणत आईच्या वार्‍याला “हे थांबव’’ अशी विनंती केली.
वार्‍यानं, “आता हे मला थांबवता येणार नाही,’’ म्हणत विषय झटकून टाकला.

त्यानंतर प्रत्येक मंगळवार, रविवारी संध्याकाळच्या वेळेत हे वारं माझ्या अंगात येणं नित्याचं होऊ लागलं होतं. खंडोबाला मांसाहार चालत नाही म्हणत आईनं माझं चिकन, मटण, मासे खाणं बंद करून टाकलं. प्रत्येक रविवारी उपवास सक्तीचा झाला. दुपारी बारा वाजता हळद-खोबर्‍याची तळी भरायची देव्हार्‍यातल्या खंडोबाच्या मूर्तीवर आणि घरात सर्वत्र भंडारा उधळायचा. आरती करायची. अधूनमधून वारं यायचं, घुमायचं आणि शांत व्हायचं. पुढच्या वर्षी आई-वडिलांसोबत पुन्हा तीर्थयात्रेला गेलो. वारं अंगात यायला लागल्यानंतर जेजुरीला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. जेजुरी जवळ येऊ लागली होती. बसमधून गडाच्या कमानी आणि जय मल्हार ही इलेक्ट्रॉनिक अक्षरं दिसू लागली तशी माझ्या मनात अस्वस्थता वाढू लागली. गडाच्या पायथ्याला पहिल्या पायरीजवळ जाऊन पोहोचलो आणि शरीराचा बेफाम भडका उडाला. हातातल्या पिशवीतला हळद-खोबर्‍याचा भंडारा पायरीवर उधळला आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ करत विजेच्या गतीनं वार्‍यानं मला अक्षरश: गडावर खेचत नेलं. वाटेत कुठंही न थांबता अवघ्या पाच ते दहा मिनिटांत मी गडाच्या मोकळ्या प्रांगणात पोहोचलोदेखील. सर्वसाधारणपणे चालत गडावर पोहोचण्यासाठी हेच अंतर कापायला पूर्वी किमान अर्धा तास सहज लागायचा. पहिल्याच पायरीवर सुरू झालेला प्रकार पाहून आईनं मला सांभाळण्यासाठी बसमधल्या तीन-चार माणसांना पाठवलं. माझ्या पापाठोपाठ तेही धावत सुटले होते. मात्र, त्यांच्या आणि माझ्या धावण्यात खूप अंतर पडलं होत. त्यांनी मला गाठायच्या आधीच मी गडावर पोहोचलो होतो. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर कितीतरी वेळ एकटाच घुमत होतो. काही वेळानं आई-वडील पोहोचले. मला घेऊन ते गाभार्‍यात खंडोबाच्या मूर्तीसमोर घेऊन गेले. हातातला भंडारा खंडोबावर उधळला. आई मंदिरातल्या पुजार्‍याला या वार्‍याबाबत काहीतरी सांगू पाहत होती. त्यानं आईचं काहीही न ऐकता माझ्या हाताला धरून सरळ मला ढकलून दिलं. मी बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळलो. आईचा पारा चढला. “स्वत:ला समजता काय?’’ म्हणत ती पुजार्‍यावर डाफरली. “अरे, याला ओळखतोस काय? खंडोबाचं वारं येत याच्यावर!’’ असं पुजार्‍याला सुनावलं. पुजार्‍यानं, 'अशी अनेक वारी पाहिली' म्हणत मला दोन-चार सणसणीत शिव्या हासडल्या. तसाच घुमत-घुमत मंदिराच्या प्रांगणात पितळी कासवापाशी आलो. वार्‍यानं पुन्हा शरीराला वेगवान फेर धरला. या वेगातच मंदिराला प्रदक्षिणा घातली. पुन्हा कासवापाशी येऊन थबकलो. यावेळची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक वेळेस जेजुरीत आईच्या अंगात येणार्‍या वार्‍याचा मात्र कोणताच मागमूस नव्हता. आई अत्यंत शांत होती. माझ्या अंगात आलेल्या वार्‍याला ‘कुडीचे हाल करू नकोस’ म्हणून ती बजावत होती. वार्‍याचा वेग हळूहळू मंदावत गेला. ते सहजपणे आईशी संवाद साधू लागलं. आमचा सध्याच्या, म्हणजे कणकवली आणि कुडाळजवळच्या मूळ गावासंबंधी, गावात असलेल्या कुलदैवताच्या आद्यस्थानाविषयी तिनं काही गोष्टी विचारून घेतल्या. “माझा या वार्‍यावर विश्वास असला, तरी माझी भावकी हे काही मानणार नाही,’’ असं आईनं वार्‍याला सांगितलं. वार्‍यानं, “तू तुझ्या कुटुंबापुरता विचार कर’’ म्हणत या वार्‍यासंबंधी काय काळजी घ्यायची वगैरे माहिती आईला दिली. गडावरून उतरतानाही विजेच्या चपळाईनं वार्‍यानं मला खाली खेचत नेलं. अवघ्या दहा मिनिटांत मी पहिल्या पायरीजवळ पोहोचलो होतो.

मुंबईला परतल्यानंतर माझे मोठे चुलते, ज्यांना आम्ही बाबा म्हणत असू, त्यांना, तसंच इतर चुलत भावांना आईनं या वार्‍यासंबंधी माहिती दिली. चुलत्यांना आणि भावांना माझ्या आणि आईच्या अंगात येणारं वारं बिलकूल पटत नव्हतं. त्यांच्या मते हा भुतानं झपाटल्याचा प्रकार होता. आमच्या घराण्यात फक्त आमच्या कुडाळजवळच्या मूळगावात असलेल्या भावकीच्या घरात परंपरेने पिढीजात एका कुटुंबात भवानीचं वारं येतं. ते वगळता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात गावांमध्ये विभागलेल्या आमच्या भावकीत दुसरं कुणावरही भवानीचं वारं येऊच शकत नाही, असा आमच्या भावकीचा दावा होता.

खंडोबाच्या वार्‍याविषयीची आख्यायिका थोडी वेगळी आहे. मूळगावात आमच्या भावकीचा भवानीचा गोंधळ होतो. या गोंधळाच्या ठिकाणी एक मजबूत लोखंडी साखळदंड बांधला जातो. ही साखळं मालवणला राहणार्‍या एका ठाकर कुटुंबाच्या घरातील ज्या व्यक्तीच्या अंगात खंडोबाचं वारं येते ती तोडते. अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. भवानी आणि खंडोबा ही आपली जोड कुलदैवतं असली तरी खंडोबांच वारं आपल्या भावकीत नाही. त्यामुळे माझ्या आणि आईच्या अंगी येणारं वारं हे सगळं थोतांड असल्याचं आमच्या भावकीचं कायमच मत राहिलं आहे. तरीही माझ्या वडिलाचं मन राखण्यासाठी, माझ्या अंगात येणार्‍या वार्‍याची शहानिशा करण्यासाठी माझे चुलते एके दिवशी आमच्या घरी आले. संध्याकाळी साडेसातची वेळ होती. देवीच्या मूर्तीसमोर उभा राहिलो. पाच मिनिटांतच वार्‍यानं शरीराचा ताबा घेतला. घरभर हळदीचा भंडारा उधळला. चुलत्यांच्या आणि वडिलांच्या कपाळाला लावला. माझ्या शरीराची सुरू असलेली ओढाताण वाहून चुलते वैतागले. त्यांनी वार्‍याला, “आधी कुडीक (म्हणजे मला) सोड’’ अशी विनंती केली. “माझो झिल अजून ल्हान हा. त्याचा लगीन होवचा हा. आमच्या घराण्यात असो देवबिवं कुणावर येवक् नाय,’’ असं सांगून पाहिलं. वारं काही ऐकेना. त्याला विचारलं, “तू कोण आसंस?’’ त्यानं उत्तर दिलं, “तुझ्या घरचा आकार.’’ आता मात्र चुलत्यांचं टाळकं चांगलचं सणकलं. “अंगात येताना येळकोट... येळकोट... करता आणि आता आकार म्हणून सांगता? हो काय प्रकार हा?’’ अशा शब्दांत त्यांनी आईला व वार्‍याला सुनावलं. (कोकणात आकार म्हणजे घराचा राखणार असे समजलं जातं.) आकाराच्या पलीकडे वारं काहीच उत्तरं देईना. चुलते वैतागले आणि ‘आंग सोड’ म्हणतं वार्‍यावर खेकसले. वार्‍यानं अंग सोडलं. चुलते जायला निघाले तेव्हा मला म्हणाले, “जरा माका बाहेर सोडूक चल रे.’’ त्यांच्यासोबत थोडं अंतर चालल्यानंतर त्यांनी वार्‍याबाबत काही नोंदविलेली निरीक्षण मला सांगू लागले. मला म्हणाले, “झिला तुझ्या अंगात येता तेव्हा तुका हलका हलका वाटता की जड जड?’’ मी म्हणालो, “जड.’’ “वारा निघून गेल्यावर तुझ्या पाठीत, मणक्यात दुखता काय रे?’’ मी म्हणालो, “होय. अंग दुखतं माझं.’’ त्यांनी जागच्या जागी तात्काळ निकाल लावून टाकला - “ह्या काय देवाचा वारा नाय. ह्या काय तरी भायलाभुतुला (बाहेरचं) असात.’’

मी एका ऑटोमोबाइल इंजिनीअरकडे नोकरी करत होतो तेव्हाची गोष्ट. संध्याकाळी सहा वाजता माझी शिफ्ट संपायची. त्या दिवशी थोडसं काम वाढल्यानं अर्धा तास जास्त वेळ ऑफिसात थांबलो होतो. या वेळेस न जाणो माझ्या मनाची चलबिचल सुरू झाली होती. घरी कुणी तरी माझी वाटं पाहतयं असं वाटायला लागलं.ऑफिसमधून घाईघाईनं निघालो. घरी पोहोचलो तेव्हा पाहिलं, तर माझा एक चुलत भाऊ घरी आला होता. मोरीत गेलो, हात-पाय धुतले आणि देव्हार्‍यासमोर उभा राहिलो. हळदीचा भंडारा हाती घेऊन भावाला माखून टाकलं. भवानीच्या मूर्तीकडे वळलो. मूर्तीकडे टक लावून पाहू लागलो. हळूहळू मूर्तीशी काही तरी हातवारे व्हायला लागले. एखादा माणूस दुसर्‍याशी भांडतो तसा मानेला झटके देत भवानीच्या मूर्तीशी भांडू लागलो. मधेच दात-ओठ चावणं वगैरे विचित्र प्रकार सुरू व्हायला लागले. हा भाऊ खूप साधाभोळा होता. मी मूर्तीशी भांडतोय हे पाहून खरंच हा देवाशी संवाद चाललाय, असा काहीसा त्याचा समज झाला होता.

एके दिवशी चुलत बहीण घरी आली होती. पुन्हा तोच एपिसोड. मूर्तीशी भांडण वगैरे... थोडा वेळ गेला आणि वार्‍यानं नूर बदलला. बहिणीकडे पाहून बोलू लागलं, “काय गो, तू माका वळखूक नाय?’’ वारं असं काही तरी बोलेलं याचा अंदाज नसल्याने ती गोंधळली. काय बोलावं तिला कळेना. ते कोडं वार्‍यानंच सोडवलं. “अगो, मी तुझो चुलतो. माझ्या दाजीचा चेडू ना तू?’’ खंडोबा म्हणवणार्‍या वार्‍याकडून आलेल्या या उत्तरानं आईदेखील चक्रावली. तिनं विचारलं, “हे काय मधेच? हा कुठला देव आला?’’ वार्‍यानं त्यावेळेस चक्क ‘मी नागोजी’ (म्हणजे माझे आजोबा. माझे वडील पाच-सात वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा नागोजींचा मृत्यू झाला होता.) असल्याचं सांगितलं. जवळच असलेल्या सोफ्यात जाऊन हे वारं उकीडवं बसलं आणि “माका आता इडी फुकू ची हा’’ म्हणत त्यानं विडी मागितली. कुणी तरी झटकन टपरीवरून विड्या आणून दिल्या. वार्‍यानं मस्त झुरके मारत विडी ओढली. आयुष्यात विडी-सिगरेटच्या वासानेही दूर पळणारा मी; माझ्या या विडी ओढण्याच्या दृश्यानं वडील आणिक माझ्या बहिणीही अचंबित झाल्या.

वार्‍याची शहानिशा लावण्यासाठी आई एके वर्षी मला आमच्या मूळगावी घेऊन गेली. तिथं कुलदेवतेसमोर मोठ्या जोशानं वारं घुमू लागलं.आमच्या भावकीत ज्यांच्या अंगात भवानीचं वारं यायचं त्यानं माझ्या अंगात येणारं वारं म्हणजे भुताटकीचा तसंच आईच्या अंगात येणारं वारं म्हणजे भवानीच्या इतर बहिणींचा (देवीच्या इतर अवतारांपैकी) संचार असल्याचं सांगत आपलं कुलदैवत फक्त मूळगावातच वाढत असल्याचा निष्कर्ष काढला. आमच्या घरी अनेक वर्षांपासून नवरात्रीत घटस्थापना होते. अजूनही ही परंपरा सुरू आहे. यावेळी भवानीचा अष्टमीचा होम होतो. या होमाला आईसोबत माझ्या अंगी वारं यायचं. आईच्या वार्‍यासोबत हातात दिवटी घेऊन होमाभोवती नाचायचो.

जवळपास १९९३ ते २००५ अशी आयुष्यातील एकूण दहा ते बारा वर्षं या वार्‍याच्या फेर्‍यात अडकलो होतो. २००२पर्यंत आम्ही वडाळ्यात झोपडपट्टीतील घरात राहत होतो. झोपडपट्टीतील घरं म्हणजे सगळाच आव-जाव कारभार. घराची दारं सताडं उघडी. अंगात वारं आलं की आजूबाजूच्या बघ्यांची गर्दी व्हायची हा तमाशा बघायला. काही लोकांना हे देवाचं वारं असल्याचा विश्वास वाटायचा, तर काही लोक टिंगलटवाळी करायचे. या वार्‍याचा माझ्या खासगी जीवनात कोणताच त्रास होत नव्हता. नोकरी व्यवस्थित करत होतो. वारं अंगात येऊ लागल्यानंतर चार वर्षांनी १९९७मध्ये माझं लग्न झालं. वार्‍याचा वैवाहिक आयुष्यावरही कोणताच परिणाम झाला नाही. माझ्या पत्नीचीही काहीच तक्रार नव्हती. तिनं तिच्या माहेरच्या नातेवाइकांत असा अंगात येण्याचा प्रकार पाहिला नव्हता. त्यामुळे लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ तिच्यासाठी आश्चर्याचा होता. नंतर तिला हे वारं प्रकरण अंगवळणी पडलं होतं. दरम्यानच्या काळात काही काळ बंद केलेला मांसाहार पुन्हा सुरू झाला होता. अधूनमधून बिअर वगैरे प्यायला सुरुवात झाली होती. त्याचा वार्‍याला काहीच त्रास होत नसल्याने मला थोडा धक्काच बसला होता. देवाला मांसाहार आणि दारू कशी काय चालते हे कोडं काही सुटत नव्हतं. बरं, देवाविषयी म्हणायचं तर मी काही खंडोबाचा भक्त वगैरे कधीच नव्हतो. कुलदैवत भवानीवर मात्र अढळ श्रद्धा होती. वारं येण्याच्या सुरूवातीच्या दिवसांत मांसाहार केला की कधी उलट्या व्हायच्या, कधी अस्वस्थ असल्यासारखं तर कधी आजारी पडल्यासारखं वाटण्याचे प्रकार सुरू होते. हे सर्व अचानक थांबल्यानं माझ्यासाठी हा बदल आश्चर्यकारक होता.

वारं येण्याच्या एक-दोन वर्षं आधी, १९९०पासून, मी नियमित वृत्तपत्रवाचनास सुरुवात केली होती. वाचल्यानंतर एखाद्या बातमीबाबत, लेखाबद्दल माझ्या मनात विचार घोळायचे. त्यासंबंधीची माझी प्रतिक्रिया संबंधित वृत्तपत्र, साप्तहिकाकडे पाठवायचो. वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र स्वरूपात ते प्रसिद्ध व्हायला लागलं. आपण काही तरी बरं लिहितोय, त्यामुळे हे छापलं जातंय, असा एक आत्मविश्वास त्यातून येत गेला.

हे तोडकंमोडकं लेखन सुरू असतानाही अंगात येण्याचा प्रकार सुरूच होता. या लेखनादरम्यान दादरच्या शिंदेवाडीत मराठी वृत्तपत्रलेखक संघात रवींद्र मालुसरे याच्याशी माझं मैत्र जुळलं. रवीमुळे पुस्तकांचा आणि व्याख्यानांचा छंद लागला. मुंबईत जिथं कुठं व्याख्यानमाला सुरू असेल, तिथं तो मला घेऊन जायचा. त्यामुळे साहित्य आणि आध्यात्मिक विषयावरच्या व्याख्यानाची गोडी लागली. श्याम मानव, नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धेवरची तर धुंडामहाराज देगलुरकर, यशवंत पाठक, राम शेवाळकर, भा. पं. बहिरट, शंकर अभ्यंकर, जगन्नाथ महाराज पवार, विवेक घळसासी, सु. ग. शेवडे यांची आध्यात्मावरची अनेक व्याख्यानं यादरम्यान ऐकली. अंधश्रद्धा आणि शुद्ध अध्यात्म यांतला फरक कळू लागला. एके वर्षी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं स्वामी विवेकानंदांवर रुपारेल कॉलेजमध्ये व्याख्यान ऐकलं. विवेकानंद नावाची ताकद समजून घ्यायला हे व्याख्यान खूप महत्त्वाचं ठरलं. या व्याख्यानानंतर माहीमच्या कर्नाटक संघ हॉलच्या गल्लीतील एका सोसायटीत स्वामी रामकृष्ण परमहंस, शारदादेवी, विवेकानंद, भगिनी निवेदिता या विषयावर शिवाजीराव भोसले यांची तब्बल तीन दिवस व्याख्यानं ऐकली.

पुण्याला किसनमहाराज साखरे यांच्या घरी रवीसोबत गेलो होतो. महाराजांनी ‘मन’ या विषयावर तब्बल दीड तास निरूपण करून आमची मनं तृप्त केली. एमआयटीला विश्वनाथ कर्‍हाड यांनी ज्ञानेश्वरांवर रसाळ निरूपण केलं. त्यानंतर एक-दोन वर्षांतच डोंबिवलीत संत साहित्य संमेलन भरलं होतं. त्यालाही हजेरी लावली होती. या प्रत्येक व्याख्यानादरम्यान संत साहित्यावरची पुस्तकं खरेदी करत होतो. बहिरट, पाठक, देगुलरकर, ल. रा. पांगारकर यांची पुस्तकं वाचत होतो. त्यातला शुद्ध अध्यात्मचा संस्कार मनात रुजला जात होता. दादरला वनमाळी हॉलमध्ये, अमरहिंद मंडळाच्या व्याख्यानमालेत मानव व दाभोलकरांची ऐकलेली व्याख्यानं, त्यांतले विचार मनात खळबळ माजवू लागले. अंगात येणं कसं थोतांड आहे, यासंबंधी छबिलदास हायस्कूलमध्ये श्याम मानवांचे अनेक प्रयोग पाहिले. याच दरम्यान मुंबईतील जवळपास सगळ्या साहित्य कार्यक्रमांना आणि चर्चांना जाऊ लागलो होतो. या कार्यक्रमांत य. दि. फडके, कुमार केतकर आणि विजय तेंडुलकर यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या भाषणांतला आधुनिक विचार मनावर खोलवर प्रभाव पाडू लागला. त्यांच्या विचारांची शास्त्रशुद्ध मांडणी मेंदूला विचार करण्यास भाग पाडत होती. विशेषत: तेंडुलकर व फडके मेंदू कुरतडत असतं. या निमित्तानं नव्या विचारांच्या पेरणीस सुरुवात झाली होती. मी आणि आई घरात देवाच्या नावानं जे काही करतो आहोत हा श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला निव्वळ बाजार आहे, हे मनात ठसायला लागलं. व्याख्यानं ऐकली, पुस्तकं वाचली की काही काळ हा प्रभाव टिकून राहायचा. आईनं देव आणि वार्‍यासंबंधी काही माहिती सांगितली की हा प्रभाव ओसरायचा. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या या पाठशिवणीच्या खेळातून अखेर बाहेर पडायचं, ही मानसिक प्रक्रिया मनात सुरू झाली होती.

वृत्तपत्रांतून, व्याख्यानांतून ‘अंगात येणं’ हा मानसिक आजार असून त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार घ्यावे लागत असल्याचं वाचलं होतं. एके दिवशी दादरला प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांना त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन भेटलो. माझी केस त्यांना सांगितली. त्यांनी मेंदूत घडणारे रासायनिक बदल, सब-कॉन्शन्समध्ये मूळ धरून असलेल्या काही जुन्या आठवणी यांतून हे अंगात येणं किंवा हिस्टेरियासारखे प्रकार घडत असल्याचं सांगून, यावर ट्रिटमेंटची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. हे उपचार आथिर्कदृष्ट्या मला परवडणारे नव्हते. त्यामुळे घरी आलो आणि कोणत्याही डॉक्टरची मदत न घेता स्वत:च यातून बाहेर पडायचं ठरवलं. अंगात वारं येतयं असू वाटू लागलं, की त्याला कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही, असा निश्चय केला. त्यानंतर मंगळवारी, रविवारी वारं येण्याचा प्रकार हळूहळू कमी होत गेला. एके वर्षी सर्व कुटुंबासह जेजुरी आणि तुळजापूरला गेलो होतो.

जेजुरीचा गड चढण्याआधीच मनाशी पक्कं केलं होतं. पत्नीला म्हणालोदेखील, “माझ्या अंगात आता येणार नाही. आलं तरी ते धुडकावून देईन.’’ ही मात्रा चांगलीच लागू पडली. गडावरून खाली उतरेपर्यंत माझं अंग जरासंही थरारलं नाही. जेजुरीत येऊनही वारं आलं नाही, म्हटल्यावर माझा आत्मविश्वास चांगलाच दुणावला. त्यानंतर अनेकदा जेजुरीला गेलो, पण पुन्हा कधीच अंगात आलं नाही. माझ्यापुरतं तरी हे खंडोबा प्रकरण कायमच संपलं. अनेक वर्षांनंतर या वार्‍यासंबंधी आठवणींना उजाळा देतो तेव्हा जाणवतं, कसल्या भयंकर आजारातून आपण बाहेर आलोय. नशीब बलवत्तर म्हणून यातून अनेकदा जीवानिशी वाचलो आहे. जेजुरी, तुळजापुरात संबळ, हलगीचा आवाज कानावर पडला, की अंग आपसूकच डोलायला लागायंच. वारं अंग सोडायचं तेव्हा धाडदिशी शरीर फेकून द्यायचं. प्रचंड वेगानं मी दूरवर फेकला जायचो. घरी किती वेळा जमिनीवर कोसळलो असेन याचा हिशेब नाही. सगळ्यात भयंकर म्हणजे, जेजुरीत वार्‍याच्या अंगी तुफान ऊर्जा यायची. अंग सोडताना त्याच बेभानपणे शरीरापासून ते वेगळं होत गडावरच्या काळ्याकभिन्न दगडवर, पितळी कासवावर आदळायचं. कोसळल्यावर कधी अख्खं शरीर सुन्न पडायचं, तर कधी मेंदूकडून संवेदना नष्ट होतायंत अस वाटायचं. या अघोरी प्रकारांतून मी बाहेर पडलो. आता आईला बाहेर काढू असं ठरवलं. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला प्रकार आईला अनेकदा समजावून सांगितला. देवाच्या पाया पडणं, पूजा, आरती यात काहीच गैर नाही. मात्र, हे अंगात येणं वगैरे यातून तू बाहेर पडायला हवं, असं तिला सांगू लागलो. तिच्या मनात साचलेले वर्षानुवर्षाचे अंगात येण्याचे संस्कार तिला यातून बाहेर पडू देईनात. खूप चिवटपणे ते तिच्या आत खोलवर रुतून बसले होते. तिच्याशी माझे खूप कडाक्याचे वाद होऊ लागले - “तू हे देव मानणं सोडलसं म्हणून घरात आजारपणं वाढलं. कशातच यश नाही.’’ वगैरे युक्तिवाद ती करायची. माझं टाळकं सटकायचं. “देव ही आनंददायी संकल्पना आहे. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही.’’ हे त्यावर माझं उत्तर होतं. “अंगात येणंबिणं सोडून तू ध्यान कर. त्यातून तुला मानसिक शांती मिळेल. हळूहळू अंगात येण्याचे प्रकार कमी होतील.’’ असं पोटतिडकीनं सांगायचो. टीव्हीवर दाभोलकरांची मुलाखत किंवा काही प्रबोधनाचा विचार असणारा कार्यकम वा चर्चा लागली, की टीव्हीचा आवाज मुद्दाम मोठा करायचो. श्रद्धा-अंधश्रद्धेसंबंधीचा माझा रोजचा ओरडा, आमची वाढणारी भांडणं याचा सकारामत्क परिणाम व्हायला लागला. आई समजुतदारपणे माझं ऐकू लागली. त्यानंतर एके दिवशी माझा मामा तिला पंढरपूरला घेऊन गेला. तिथं तिनं वारकरी पंथ स्वीकारला. माझी आई पूर्ण अशिक्षित आहे. मात्र, एकेक शब्द जोडून ती तोडकंमोडकं वाचण्याचा प्रयत्न करत होती. या वाचनाचा खूप मोठा फायदा झाला. पंढरीतून तिनं ज्ञानेश्वरी आणली होती. ती रोज सकाळी वाचू लागली. ज्ञानेश्वरीचं माधुर्य तिला कळू लागलं होतं. माझ्याकडे असलेली भगवद्गीता तिला वाचायला दिली. ज्ञानेश्वरीचे आणि गीतेचे पाठ रोज घरात होऊ लागले. तिचं आध्यामिक वाचन फळाला यायला लागलं. पूर्वी प्रत्येक पौर्णिमेस येणारं तिच्या अंगात येणारं वारं हळूहळू कमी झालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, २००२च्या सुमारास आम्ही वडाळ्याहून कांदिवलीला राहायला गेलो. तिचा गुरूमहाराजांचा भक्तिसंप्रदाय वडाळ्यातच राहिला. त्यामुळे तिची जेजुरी, तुळजापूरची वार्षिक तीर्थयात्रा बंद झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे, झोपडपट्टीतून चांगल्या वसाहतीत राहायला गेलो होतो. आसपास सुशिक्षित माणसांची वस्ती होती. इकडच्या लोकांना अंगात येण्याचा प्रकार आवडणार नाही. हे लोक आपल्या घराला देव-देवस्कीवाले, अंधश्रद्धाळू म्हणतील हे मी आईला पटवून देऊ शकलो. तिनंही ते मान्य केलं. रोजचं अंगात वारं यायचं कमी झालं. नवरात्रीत घटस्थापनेला आणि अष्टमीच्या होमाला वारं यायचं मात्र बंद झालं नाही.

आठवड्यातून एकदा येणारं वारं बंद झाल्यानं नवरात्रीत येणार्‍या वार्‍यास मीही आता विरोध करत नाही. गेल्या अनेक वर्षांत वारं यायचं आता बर्‍यापैकी बंद झालं असलं, तरी ते बंद झाल्याचा मानसिक आघात मात्र तिच्यावर प्रचंड झाला आहे. आजही ती अधूनमधून, माझं देवस्थानं तुझ्यामुळे बंद झाल्याचं दु:ख मला बोलून दाखवते. नको त्या खुळचट कल्पना बाळगण्यापेक्षा तिची चीडचीड, त्रागा सहन करणं इतकचं माझ्या हातात आहे. हे वारं म्हणजे तिचं जगणं होतं. वार्‍यामुळे तिच्याकडे अनेक लोक आपले अडलेनडले प्रश्न घेऊन यायचे. हळदी-कुंकवाचा शिक्का देऊन ती हे प्रश्न सोडवायची. तिच्या वार्‍यामुळे लोकांच्या समस्या सुटतात असा तिचा व येणार्‍या लोकांचा ठाम विश्वास होता.

असो. देवावर श्रद्धा असणं काही वाईट नाही. मात्र, श्रद्धेच्या नावाखाली चालणारं मानसिक, शारीरिक, आर्थिक शोषण हे कधीही घातकच. माझ्याबाबत तो प्रकार झाला नसला, तरी हे अंगात येण्याचं आणखी किती काळ चाललं असतं? त्यातून माझ्याकडून बुवाबाजी, फसवेगिरी झाली नसती, हे मला छातीठोकपणे सांगता येणार नाही. मात्र एक गोष्ट खरी, की विवेकाला फासावर लटकवून मी निघालो होतो. ज्या क्षणी माझा विवेक जागा झाला त्या क्षणी या अघोरी प्रकारातून बाहेर पडलो. त्याचं श्रेय आध्यात्मिक वाचन आणि दाभोलकरांच्या, मानवांच्या विवेकवादी विचाराला द्यायला हवं. त्यामुळे विचारांच्या कक्षा रुंदावल्या. अन्यथा काय झालं असतं या जगण्याचं? विचार मनात आला तरी भितीनं अंग थरारतं!

आपल्या कुळांचा उद्धार करून घेण्यासाठी गोंधळ, जागरण करून देवीचा आणि खंडोबाचा कुळाचार केला जातो. या कुळाचारादरम्यान दिवटी पेटवली जाते. ही दिवटी म्हणजे फक्त परंपरेचा अभिमान नव्हे, तर अज्ञानाचा अंधकार दूर सारून ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आयुष्यात येवो, असा तिचा व्यापक अर्थ आहे. अंधश्रद्धेत डुचमळणार्‍या मला हा ज्ञानाचा विवेकाचा प्रकाश दिसला. सगळ्यांनाच तो दिसला तर विवेकाला फासावर लटकवण्याची वेळ येणार नाही!

***

पूर्वप्रसिद्धी - 'इत्यादी' दिवाळी २०१३

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. नितीन चव्हाण व श्री. आशीष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) यांचे मन:पूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

अगदी प्रांजळ लेखन.

ही दिवटी म्हणजे फक्त परंपरेचा अभिमान नव्हे, तर अज्ञानाचा अंधकार दूर सारून ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आयुष्यात येवो, असा तिचा व्यापक अर्थ आहे. अंधश्रद्धेत डुचमळणार्‍या मला हा ज्ञानाचा विवेकाचा प्रकाश दिसला. सगळ्यांनाच तो दिसला तर विवेकाला फासावर लटकवण्याची वेळ येणार नाही! >> अनुमोदन

चिनूक्स हा लेख नवरात्रात द्यायला हवा होता. त्यादिवसात अंगात येण्याचे प्रकार जरा जास्तच होतात.

लेख आवडला. लहानपणी देवळात वारे येणे पाहिले होते पण लेखकाने आपल्या मनावर संयम ठेवून, चांगली संगत घेवून , आणि भरपूर वाचन - विचार करून प्रयत्नपूर्वक उपाय केला हे वाचून खुप बरे वाटले.

लेख आवडला. अगदी मनापासून प्रांजळपणे लिहिलाय.
अष्टमीला असं घागरी फुंकून अंगात आलेलं अनेकदा पाहिलंय, ते इतके दिवस थोतांड किंवा आपलीच भक्ती कशी भारी हे दाखवायची चढाओढ वाटायचं. तो भावनांचा उद्रेक काही बाबतीत खराही असू शकतो हे माहितच न्हवतं. \
देव मनातून न काढता दाभोलकर म्हणायचे तसं विवेकाने वागल्याचं उदाहरण आहे हे. आईला समजून घेऊन लेसर एव्हिलला अ‍ॅक्सेप्ट करून केलेली व्यावहारिक तडजोडही आवडली.

भयानक!

लहानपणी एक दोन काकवा नवरात्रात पाहिलेल्या. तेव्हा खूपच भिती वाटायची. मोकळे केस, तो भंडारा, हातात घागर, नाहितर कापूर जिभेवर जाळत.... नाहितर दिवा नाहितर मशाल हातात... वगैरे वगैरे अगदीच विनोदी वाटायला लागले ते अवतार मग मोठे झाल्यावर.
मोठे झाल्यावर तशी मी नास्तिकच असल्याने , हे सर्व थोतांड आणि मानसिक रोग आहे हे ही पटलं.
कित्येकदा हि माणसं एडीडी ची शिकार असतात. हे बरीच पुस्तकं वाचून कळलं.

लेख आवडला. एखादी गोष्ट स्विकारण्यासाठी स्वतःला बदलणे हीच एक मोठी achievement आहे. नितिन चव्हाणांचे याबद्दल कौतुक,

लेख आवडला. एखादी गोष्ट स्विकारण्यासाठी स्वतःला बदलणे हीच एक मोठी achievement आहे. नितिन चव्हाणांचे याबद्दल कौतुक,>>>+१

खरंच खूप सुंदर लेख आहे. जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांसारखे व्यक्ती पुन्हा होणे नाही.

"अन्निसवाल्यांच्या" भुमिका व नजरेतुन लेख वाचला नाही.
त्यामुळे बर्‍याच गोष्टी आकलल्या, काहि पूर्विच माहित असलेल्या/अनुभवलेल्या बाबींचे समर्थनही झाले.
अर्थात कित्येक प्रश्न अनुत्तरीत राहिले असले तरी लेखाचा उद्देश तो नसल्याने, त्याबाबत लिहिणे नाही.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

छान लेख आहे. स्वतःच्याच आजारावर संयमाने मिळवलेला विजय कौतुकास्पद आहे.

पोरसवदा वयं होतं. शाळेला दांड्या मारून बाहेर भटकायला जाम आवडायचं>> लेखात एक तृटी आढळली. १९९१ ला २०-२१ वय असेल असे लिहुन नन्तर १९९२ ला पोरसवदा वय होते लिहीले आहे.

अतिशय सुंदर लेख.लेखकाचे फार कौतुक वाटले.हा प्रवास आजिबातच सोपा नव्हता.
या पूर्वी अंगात येण्याबद्दल शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले लेखन वाचले होते.
पहिल्यांदाच खुद्द ज्यांच्या अंगात येत असे अशा कुणी इतक्या तटस्थपणे शब्दबद्ध केलेले अनुभव वाचले.
तरीही काही प्रश्न पडले , जसे की इतकी अतिमानवी शक्ती कुठून येते? आवाजातल्या बदलांमागे काय कारणे असावीत?

भारी लिखाण.
'वारं' येणं हा मानसिक आजार आहे, याला जितकी प्रसिद्धि मिळेल तितकंच त्याचं उदात्तिकरण कमी होईल. आणि, << पहिल्यांदाच खुद्द ज्यांच्या अंगात येत असे अशा कुणी >> हें सांगणं तर अधिकच प्रभावी ठरेल.
धन्यवाद, चिनूक्स.

>>>> तरीही काही प्रश्न पडले , जसे की इतकी अतिमानवी शक्ती कुठून येते? आवाजातल्या बदलांमागे काय कारणे असावीत? <<<< संदर्भाकरता घेतले.

>>> 'वारं' येणं हा मानसिक आजार आहे, <<< हे अमान्य

यावर बरेच काही लिहिता येईल, स्वानुभवाचे बोलही सांगता येतिल.
लेखातील वर्णन बरोबर आहे, व त्याचबरोबर मानसिक कणखरता दाखवली तर असली "वारी" वार्‍यालाही उभी रहात नाहीत हे देखिल खरे आहे (खूप पूर्वीच स्वानुभवले आहे), पण म्हणजे ते "वारे येणे" हा "मानसिक रोग" आहे हे सिद्ध तर होत नाहीच.

शिवाय वर जे प्रश्न विचारले आहेत, त्यांना अनुत्तरीत ठेवुन वा तर्काला पटतील अशी त्यांची उत्तरे न देता केवळ कोणत्या तरी अगम्य स्पेलिंगच्या नावाचा सिन्ड्रोम आहे असे ठरवुन त्याद्वारे वार येणं हा मानसिक आजार आहे असे जाहीर करणे पटत नाही.

<< लेखातील वर्णन बरोबर आहे, व त्याचबरोबर मानसिक कणखरता दाखवली तर असली "वारी" वार्‍यालाही उभी रहात नाहीत हे देखिल खरे आहे (खूप पूर्वीच स्वानुभवले आहे), पण म्हणजे ते "वारे येणे" हा "मानसिक रोग" आहे हे सिद्ध तर होत नाहीच.>> 'मानसिक रोग' नाही तर मग मानसिक दुर्बलता म्हणायचं का ? लहानपणीं 'वारं' आलेलीं/ येणारीं माणसं पहिली आहेत व तीं नाटक करत नव्हतीं याची खात्री होती. त्यामुळें, ह्या प्रवृतिला निश्चित असं कांहीं तरी नांव असावंच ना. इतर देशांतही असे प्रकार होतात का, हाही प्रश्न मनात डोकावतो.

>>> 'मानसिक रोग' नाही तर मग मानसिक दुर्बलता म्हणायचं का ? लहानपणीं 'वारं' आलेलीं/ येणारीं माणसं पहिली आहेत व तीं नाटक करत नव्हतीं याची खात्री होती. त्यामुळें, ह्या प्रवृतिला निश्चित असं कांहीं तरी नांव असावंच ना. <<<
भाऊ, बरोबर प्रश्न.
दुर्बलता म्हणणे मला अवघड वाटते, पण नेमका शब्दही सुचत नाही.
प्रत्येकाची जशी शारिरीक ठेवन असते त्याप्रमाणेच मानसिक ठेवणही असते. ती नेहेमीच एक दुसर्‍याहुन भिन्न/विभिन्न असतेच शिवाय ती तशीच कायम राहील असेही असत नाही, चंद्रकलेप्रमाणे व मुळे, ती बदलू शकते असे (ज्योतिषशास्त्रीय) गृहितक आहे.
जितक्या सहजपणे एखादी शारिरीकदृष्ट्या बलिष्ठ व्यक्ति शारिरीक दृष्ट्या कनिष्ठ व्यक्तिवर "प्रभाव" टाकेल व स्वतःस हवे ते त्या व्यक्तिकडुन निरनिराळ्यामार्गे करवुन घेईल, तितक्याच सहजपणे, मानसिकदृष्ट्या बलिष्ठ/कणखर/क्रुर/हुकुमशाहिवादी व्यक्ति, दुसर्‍या तुलनेत मानसिक द्रुष्ट्या कमजोर व्यक्तिवर "प्रभाव" टाकेल व स्वतःस हवे ते त्या व्यक्तिकडुन निरनिराळ्यामार्गे करवुन घेईल. हे प्रत्यही अनुभवता येते /येईल आजुबाजुला. हिप्नोटाईज करता येणे हा देखिल एक प्रकार आहे, पण तो देखिल सरसहा सर्वांचे बाबतीत करता येतोच असे नाही कारण व्यक्तिव्यक्तिमधिल मानसिक अस्मिता/ताकद्/स्वयंप्रेरणा/तत्कालिक उत्स्फुर्तता इत्यादी अनेक कारणे.
फरक इतकाच रहातो, की वरील बाबीत दोनही व्यक्ति प्रत्यक्ष दिसत असतात, तर वारे येण्याच्या प्रकारात कनिष्ठ प्रतिची मानसिक ताकद असणार्‍या व्यक्तिवर प्रभाव टाकणारी "बाह्य शक्ति" (दैवी/आसुरी) ज्या अस्तित्वात आहेत असे हिंदू धर्म मानतो, त्या दृष्टी/पंचेंद्रियांना दिसत नाहीत.
व्यक्तिने जर मनाची कणखरता वाढवली, तर अशा बाह्य शक्तिंच्या उपद्रवापासुन्/त्यांचे आहारी जाण्यापासुन ती स्वतःस रोखू शकते.
असे माझे मत.

Pages