"हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या प्रश्नाशी सामना झाला आहे.
२० मे २०१८ च्या आपला महानगरमध्ये आलेला माझा लेख
----------------------------------------------------
“आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून मैत्रिणीच्या लग्नात घालण्यासाठी खास फाडलेल्या जीन्स खरेदी केल्यात.”
“ऍडमिशन झाली. रोज कॉलजमध्ये जायला खास बनारसी साड्या घेतल्यात.”
“कॉन्फरन्समध्ये भाषण आहे. मेंदीवालीला बोलवायला हवं. दोन्ही हात आणि पायभरून मेंदी काढून घेणारे मी. ”
बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं. वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.