कपडे, माणूसपण इत्यादी

Submitted by नीधप on 30 March, 2021 - 00:41

"हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या प्रश्नाशी सामना झाला आहे.

ह्याच प्रश्नाला संस्कृतीची फोडणी घालून नुकतेच उत्तराखंडाच्या मुख्यमंत्र्यांनी असेच एक विधान केले. फाडलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे गुडघे आणि त्यामुळे कातरून गेलेली आपली थोर संस्कृती अश्या एकमेकांशी संबंध नसलेले मुद्दे त्या विधानात होते. गुडघे उघडे ठेवणे हे पाश्चिमात्यांचे अनुकरण आणि अंग झाकण्याची आपली संस्कृती असेही त्यांचे म्हणणे होते. मुळात अंग झाकण्याचा अवास्तव सोस हे प्रकरणच आपल्या अनुकरणप्रियतेचे निदर्शक आहे. दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या कालखंडातला हा पाश्चिमात्यांचा सोस सरळ सरळ उचलून आपली संस्कृती म्हणून खपवतो आहोत हे मुख्यमंत्री महोदय सोयीस्कररीत्या विसरून गेलेले आहेत.

‘फाडलेल्या जीन्स मधून संस्कृती कातरून पडते’ हे एकच विधान नाही. या वाटेवरची विधाने सतत चालू आहेत. आणि ती सभ्यता किंवा सभ्यतेचे मापक म्हणून खपून जातायत. माणसांची प्रतवारी केली जातेय त्यावरून. अमुक प्रकारचे कपडे ही आपली संस्कृती नाही असे कुणी ना कुणीतरी रोज अतिशय अपमानास्पदरित्या सांगत राहतेच. कुणाला राहीबाई पोफळेंच्या कार्यापेक्षा त्यांनी पुरस्कार स्वीकारताना डोक्यावर पदर घेणे याचेच फक्त कौतुक वाटते. कुणाला मंगलयानाच्या बातमीतल्या फोटोत सर्व वैज्ञानिक स्त्रिया त्या वैज्ञानिक आहेत याच्यापेक्षा त्या साडी, मंगळसूत्र, कुंकू वगैरे पेहरावात आहेत हे बघून भरून येते.

पण हे बरेचसे स्त्रियांसाठी असते. केवळ स्त्रियांच्यावर असलेली धार्मिक वा सामाजिक ड्रेसकोडची सक्ती ही वरकरणी स्त्रियांची सुरक्षितता वगैरेसाठी असते असे म्हणले जाते. आणि स्त्रीच्या शरीराच्या झाकलेल्या क्षेत्रफळानुसार स्त्रीचे वर्गीकरण केले जाते. याच्या मुळाशी स्त्रीचे वस्तूकरण किंवा मालमत्ताकरण हे पितृसत्ताक मूल्यच आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच ठराविक चौकटीच्या बाहेरचे काही जामानिम्यात असेल तर त्या व्यक्तीला असभ्यतेचे लेबल लावले जाणे हे बालिश आणि अमानुष आहे. हे ही विसरून चालणार नाही.

हे का आणि कसे झाले? शरीरावर ल्यायच्या गोष्टी या निव्वळ उपयुक्तता किंवा शरीर सजवणे या उद्देशांच्या पलीकडे जाऊन माणूसपणापेक्षा मोठ्या कधी झाल्या? अंगावर परिधान करायच्या वस्तूंमध्ये वैविध्य येत गेले तसे माणसांचेही कप्पे पडत गेले. कपडे ही दृश्य संवादाची भाषा होत गेली. परिधान केलेली प्रत्येक गोष्ट एखादे चिन्हस्वरूप वापरली वा बघितली जाऊ लागली. सगळ्या जाम्यानिम्यावरून व्यक्तीबद्दल मत तयार केले जाऊ लागले.

आणि मग हीच प्रक्रिया वळवून ठराविक ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल काय मत व्हायला हवे हे ठरवत म्हणजेच "हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" या प्रश्नाच्या भोवती फेऱ्या मारत मारतच कपडे व इतर परिधानाच्या गोष्टींचे संकेत बनवले गेले. या प्रश्नाला समाजाच्या वेगवेगळ्या उतरंडीचे असंख्य कंगोरे, पैलू, पापुद्रे सुटून मग हळूहळू त्या संकेतांचे नियम बनले.

वेगवेगळे मुद्दे धरून हे नियम घडवलेले असतात, घडत असतात. बदलतही असतात. नियम आहेत म्हणजे ते पाळलेच पाहिजेत अशी अपेक्षा असते. पाळले न गेल्यास त्याचे परिणामही भोगावे लागणारच अशी धारणा होणे साहजिक आहे. पण हे इतकं साधं, सोपं, सरळ, एकरेषीय नसतं.

ड्रेसकोडमध्ये कपडे कसे असावेत याचे नुसते सूचन केलेले असते. ते सभ्य असावेत किंवा तत्सम असे नुसते संकेत असतात. अश्यावेळी अनेक अर्थ संभवतात आणि संघर्ष होतो. अशीच एक घटना याच आठवड्यात घडली. गुजरात विधानसभेत जीन्स व टीशर्ट घालून आल्याबद्दल आमदार विमल चुडासामा यांना बाहेर काढले गेले. वास्तविक पाहता विधानसभेचा काहीही लिखित ड्रेसकोड नाही. ‘मला याच कपड्यात बघून मतदारांनी निवडून दिले त्यामुळे मी त्याच कपड्यात असणे योग्य आहे.’ असा युक्तिवाद चुडासामा यांनी केला. तो मान्य झाला नाही.

जगभरात विविध देशांच्या संसदेत गेल्या काही वर्षांमध्ये एक राजकीय विधान म्हणून किंवा निषेध म्हणून पाश्चिमात्य किंवा मूळ युरोपियन असलेल्या ड्रेसकोडला आव्हान दिले जाते आहे. भारतीय राजकीय पोशाखांच्या संदर्भात बघायचे तर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच १९३१ साली इंग्लंडच्या राजाला भेटायला जाताना सभ्यतेच्या सर्व कल्पनांना धुडकावून लावून गांधीजी खादीचे धोतर आणि शाल लेवून गेले होते. सभ्यतेच्या कल्पना आणि वावर याबाबत काटेकोर असणाऱ्या इंग्रजांच्या जगात यावरून गदारोळ उठला नसता तरच नवल. गांधीजींनी अतिशय हुशारीने केलेले हे राजकीय विधान होते. जाडेभरडे, अर्धे कपडे घालणाऱ्या जनतेने तश्याच प्रकारचे कपडे घालून इंग्लंडच्या राजाला भेटायला गेलेल्या माणसाला आपला, आपल्यातला आणि म्हणून आपला नेता मानणे हे साहजिकच. खादीच्या चळवळीच्या परिणामस्वरूप स्वातंत्र्यानंतर कैक वर्षे भारतीय राजकीय पोशाख खादीचे भारतीय वळणाचे कपडे असाच राह्यला. हे भारतीयत्व मानलं गेलं होतं. विविधतेत एकता या तत्त्वाचे हे थोडे भाबडे स्वरूप म्हणता येईल. उदारीकरणानंतर आणि मग नवीन शतकात राजकारणात आलेल्यांना खादीचे ऐतिहासिक महत्व माहिती असले तरी ते स्वतःच्या जगण्याचा भाग म्हणून बघता येणे अशक्य होते. ते ज्यांचे नेते म्हणून आले त्यांनाही त्यांच्यासारखाच वाटणारा जीन्स टीशर्टवाला नेता आपला वाटणे हे ओघानेच आले.

जगभरात कुठेही जीन्स व टीशर्ट या गोष्टींना फॉर्मल म्हणून मान्यता नाही हे खरे असले तरी फॉर्मल या गोष्टीच्या व्याख्या धूसर नक्की होतायत. त्यामुळे अश्या मान्यतांचा बाऊ आपण न करणे हेच योग्य ठरेल.

पण यामुळे कपड्यांवरून माणसाचा अंदाज बांधणे थांबणार नाही. शेवटी कपडे हे दृश्य संवादाचे एक साधन आहे. कपड्यांना बघून समोरच्या माणसाबद्दल आडाखे बांधणे ही मानवी प्रवृत्ती आहे. आजवर बघितलेल्या माणसांच्यावर आधारित हे आडाखे बांधणे प्रत्येकाच्या नकळत होतच असते. होतच राहणार. पण या सगळ्यापेक्षा माणूस आणि माणूसपण मोठं आहे, असायला हवं ही जाणीव मात्र पक्की ठेवायला हवी.

- नी

---------

हा लेख दैनिक लोकमतमध्ये २३ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध झाला होता. ही त्याची लिंक

कोणी, कसे कपडे घालावे, हे कोण ठरवणार?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आणि सडेतोड लेख आहे. पण आता रोजचे मरे त्याला कोण रडे प्रकार आहे. काहीच वाटेनासै झाले आहे.

लेखात वर्तमानपत्रातील असते तशी छापील भाषा आहे असे वाटत होते. उलगडा शेवटी झाला.

छान लेख, ड्रेसकोड, संस्कृती रक्षण वगैरे चा अर्थाअर्थी संबंध तसाही नसतो.

मुंबईतल्या क्लब मध्ये एक मनुष्य टेनिस खेळून झाल्यावर परमिटरूम मध्ये शिरत होता, त्याला अर्थात अडवले, परमिटरूम मध्ये हाफ पॅन्ट अलौड नाही म्हणून,
संध्याकाळी तोच मनुष्य ,वेष्टि नेसून गेला (पांढरी, सोनेरी बॉर्डर वाली साऊथ इंडियन लुंगी) , आणि नॅशनल ड्रेस म्हणून परमिटरूम मध्ये एन्ट्री मिळाली. आत गेल्यावर हाफ पॅन्ट च्या वरताण लुंगी गुंडाळून फिरला आणि वरती कैसा उल्लू बनाया म्हणून क्लब सेक्रेटरी ला शिव्या घातल्या Lol

I am sure, जिकडे बायकांनी साड्याच नेसाव्यात वगैरे आग्रह धरतात त्यांना एक साडी क्या कोहराम मचा सकती है ची कल्पना नसते Proud

> > जिकडे बायकांनी साड्याच नेसाव्यात वगैरे आग्रह धरतात त्यांना एक साडी क्या कोहराम मचा सकती है ची कल्पना नसते < <
छे छे बरोब्बर माहिती असतं. उगाच नसतो आग्रह! Wink

अमेरीकेचे एक आवडते ते म्हणजे दिसण्याबद्दल लोक खूप नॉनजजमेंटल आहेत. थुलथुलीत ललना, ढेरपोटे पुरुष, काटकुळे लोक सगळे जण हवे ते कपडे घालतात. त्यात कोणालाही वावगं किंवा आपल्या डोळ्यांवर अत्याचार होतोय वगैरे वाटत नाही. अतिशय इंडिव्हिज्युअ‍ॅलिस्टिक समाज आहे. केशरचना, केसांना रंगविणे, नटणे, टॅटूज, कानात नाकात रिंगा काहीही करा. अर्थात नग्नता किंवा बीभत्सता पाहीलेली नाही. ती चालवून घेतली जात नाही.

साडी आणि कोहराम वर एक आपलं ( उगीच) मत,

श्रीदेवीची पावसातली बरीच नृत्य साडीत उगाच नाहीयेत...
——-
कुठेतरी वाचलेलं,
भारतीय पेहराव साडी किती दर्शनीय (?, रीवीलिंग) आहे , पोट व पाठ दिसतच की... असे एक परदेशी अभ्यासक म्हणालेले.
.
—-
बाकी सिमलाच्या मंत्र्यांच्या विचारांना सलाम.. कहा से आते है? हा एक नवीन डायलॉग त्यांना समर्पित. त्यांनी फाटक्या जीन्सवर कमेंट केली म्हणून नाही तर पुन्हा, आपले कुजकट पुरुषप्रधान विचार दाखव्ले आजच्या काळात सुद्धा म्हणून...

लेख आवडला.
बायकांना हवे ते कपडे घालायचं स्वातंत्र्य मिळायला हवं.

शाळकरी मुलींनाही बुरखा घालायला लावला जातो यावर युरोपियन देशात कायद्यानेच आता बंदी आणली जात आहे. हे बरोबर की चूक म्हणावं?

साडी रिविलींग आहेच की. एकीकडे अंगभर कपडे हवेत म्हणायचं आणि एकीकडे साडीच नेसली पाहिजे असा आग्रह धरायचा असा गोंधळ असतो संस्कृतीसंरक्षकांचा. बर त्या साडीचाच आग्रह धरायचा तर त्यातच म्हणजे पारंपरिक वीण आणि डिझाइन्स यात इराणी/मुघल तर ब्लाऊज, सहावारी नेसण वगैरेत किती ब्रिटिश/ युरोपियन प्रभावाच्या गोष्टी आहेत याचा पत्ताच नसतो त्यांना.
असो!

सनव, शालेय पातळीवर, आस्थापनांच्यात चेहरा लपवायला शक्यतो परवानगी नसणे हे योग्य वाटते. मग तो बुरखा असेल किंवा हातभर काढलेला घुंघट असेल.
परंतू या नुसत्या मनाई हुकुमांची परिणती स्त्रियांना घरात अडकवण्यातही होऊ शकते. त्यामुळे बुरखेवाल्या खालाला किंवा घुंघटवाल्या बाईसाला चेहरा झाकणे यात कौतुकास्पद, सामाजिक सुरक्षिततेसाठी वगैरे काहीही नसून पितृसत्तेने केलेला स्त्रीचा अपमान आहे हे समजावून सांगणे मला जास्त महत्वाचे वाटते. एकदा तिला कळला हा कावा की ती आपणहूनच देईल फेकून.

आपण याबद्दल बोलतोय आणि जग कुठे आलेय? किंवा मानवाने कुठे आणून ठेवलेय ते ही विचारात घ्यायला हवे.
उन, धूळ, प्रदूषण वगैरेंपासून सुरक्षित वाटावे म्हणून चेहरा झाकणे ही गरज झालेली आहे. सध्या तर कोविडमुळे चेहरा अर्धा तरी झाकणे ही समस्त मानवजातीची गरज झालेली आहे.
मास्क घालण्यामुळे गेल्या वर्षभरात श्वसनाच्या इतर अनेक तक्रारींचे प्रमाण घटले असे काही डॉक्टर्सचे म्हणणे आहे. (मी डेटा अभ्यासलेला नाही. कुणी तपशील पुरवल्यास स्वागत आहे!) वैयक्तिक अनुभव म्हणायचा तर ट्रॅफिक, लोकल वगैरे ठिकाणी मास्क घालून वावरणे हे माझ्यासारख्या सायनसचा त्रास आणि धुळीची ऍलर्जी असलेल्या बाईला बरेच सुखावह झाले. तोंडभर स्कार्फ गुंडाळून स्कूटर चालवणे, बिन एसीच्या गाडीतून प्रवास करणे याची सवय होतीच.
म्हणजे काय थोडक्यात संदर्भ चौकटीच बदलून गेल्यात.
तस्मात चेहरा झाकणे या संदर्भात लाख दुखोंकी एक दवा प्रकारचे उत्तर देता येणार नाही.

..हे मुख्यमंत्री महोदय सोयीस्कररीत्या विसरून गेलेले आहेत.>> खरेच वाटते असे तुम्हाला?

लेख आवडला.
बुरखा व मास्क बद्दलची पोस्ट समजली नाही मात्र! बुरखा/घूंघट इ चेहरा झाकणारे वस्त्र व सध्याचे मास्क (मुखपट्टी) यांची 'चौकट' वेगवेगळी आहे. महासाथ चालू असतानाचे नियम नाक व तोंड झाकायचे आहेत. महासाथ संपल्यावर ४-५ वर्षाने म्हणा मास्क वापरा ही नियमावली नसेल. मास्क म्हणून कुणी प्लॅस्टीकचे पारदर्शक प्रकार वापरले तरी चालतं. किंबहुना अनेक कार्यालयात मूक-बधिर लोकांना 'लिप रिडींग' उर्फ ओष्ठवाचन जमावे म्हणून पारदर्शक मुखपट्टी वापरायला सांगतात. बुरखा/घूंघट इ मध्ये असं चालत नाही- शतकानुशतके चेहरा झाकलेला हवा मग त्याला वैद्यकीय आधार/ महासाथ असो, नसो... चेहरा झाकलेला हवा.

ड्रेसकोडचे नाही माहिती पण यूरोपातील काही न्यूडबीचवर समुद्रस्नानाचा अनुभव घेतला आहे. फारच लिब्रेटिंग अनुभव होता. भारतीय दिसणारी मंडळी फारच कमी सापडली तिथे. भारतात अशी काही सोय झाल्यास बरे होईल.

सी, चौकट वेगवेगळी आता आहे. या पद्धती अस्तित्वात आल्या, रुळल्या त्याचे मुख्य कारण गरज हेच होते सुरवातीला. मग त्याला धर्म बिर्म चिकटले.
त्यामुळे चेहरा झाकणे या गोष्टीला एकत्र केलेय.
4-5 वर्षांनी नसेल गरज हे ही बरोबर.
म्हणूनच एकच उत्तर देता येणार नाही.

माझ्या प्रश्नाला दिलेला सविस्तर प्रतिसाद आवडला, धन्यवाद.

बुरखा पद्धती सुरुवातीला गरज म्हणून आली असावी हा मुद्दा तुम्ही लिहिण्याआधी माझ्या लक्षात आला नव्हता. तसे अरब देशातले पुरुषही विशिष्ट पायघोळ पेहराव, headgear असा ड्रेस करतात. That makes sense.

परंतु इथे अमेरिकेत 5 वर्षांची मुलगी पूर्ण बुरख्यात आणि तिचे वडील मात्र जीन्स टीशर्ट अशा अमेरिकन कपड्यात असंही पाहिलं आहे. तिथे मात्र कडक कायदे+समुपदेशन हा पर्याय योग्य वाटतो.