सोंग सजवण्याची कला - ८. चलता है
बाकीचे लेख
१. बजेटच नाही http://www.maayboli.com/node/21581
२. अमेरिकेतील शिक्षण http://www.maayboli.com/node/21592
३. डिझायनिंगची पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/21595
४. तिकडची नाटकं http://www.maayboli.com/node/21602
५. माझा श्वास http://www.maayboli.com/node/21618
६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे. http://www.maayboli.com/node/21629
७. इकडचं नाट्य http://www.maayboli.com/node/21640
--------------------------------------------------
एखादा सीन शूट होणार असतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर असतं. रात्रीची निजानीज होण्याची वेळ असते. घरातले सगळेजण साधारण आता उठून लग्नाला जातील अश्या कपड्यांमधे असतात. ते दिग्दर्शकाला सांगायला जावं तर दिग्दर्शक म्हणतो चलता है, फ्रेम चकाचक दिखना चाहीये.
व्यक्तिरेखा पन्नाशीची खडतर आयुष्य काढलेली आणि कंटाळलेली, पिचलेली अशी बाई असते. पण सिनेमात मात्र ती केशरी गुलाबी अश्या रंगाच्या साड्या नेसते.
व्यक्तिरेखा तोंडाने एक बोलत असते आणि कपडे वेगळेच सांगत असतात. पण डिझायनर म्हणतो चलता है... कौन इतना दिखता है!
आणि माझी मैत्रिण विचारते ’प्रत्येक चित्रपटात दिग्दर्शक किंवा निर्माता कॉश्च्युम्सचा विचार करत असेल का?'
निर्माता कॉश्च्युम्सबद्दल विचार करताना मुळात बजेट या मुद्द्यावर येतो. सिनेमाचं बजेट कमी करायचं असेल तर पहिली कात्री कॉश्च्युमच्या खर्चावर चालवली जाते. नटांचे नातेवाईक आणि त्यांची पंचतारांकीत उस्तवार ही अनेकदा निर्मात्याला कॉश्च्युम्सच्या खर्चापेक्षा महत्वाची वाटत असते.
एका ठिकाणी असंच झालं. कॉश्च्युम्सच्या गरजेच्या बजेटच्या एक चतुर्थांश मधे कॉश्च्युम्स बसव असं एका निर्मिती प्रमुख म्हणवणार्या माणसाने सांगितलं. ’अरे भाजीवाल्याकडून भाजी घेतानाही इतकं बार्गेनिंग करत नाही आपण!’ असं मनात म्हणत मी तिथून निघाले. अजून दुसर्या एका ठिकाणी १८८०-१८९० च्या काळातल्या एका कथेवरचा होऊ घातलेला चित्रपट माझ्याकडे डिझायनिंगसाठी एक निर्मिती सल्लागार घेऊन आला. जुन्या ओळखीची आठवण देत मला कमी पैशात काम करण्याची विनंती करू लागला. ऐतिहासिक काळ उभा करायचा तर कपड्यांचं बजेट जास्त असायला हवं हे त्याच्या गावीही नाही. जुन्या ओळखीखातर मी स्वतःचे पैसे घेतले नाहीत तरी कापड दुकानदार, शिंपी, बाकी सगळा कॉश्च्युमचा ताफा फुकटात काम करणार नाही. १०० रू मीटरचं कापड २ रू मीटरने मिळत नाही हे त्यांना पटायलाच तयार नाही. यावर निर्माता म्हणे मॉबमधे गावातल्या लोकांचे आहेत तेच कपडे वापरायचे. पण १८८० पासून २००५ या १२५ वर्षांच्या काळात गावातले कपडेही बदललेत हे त्याला मान्य नव्हतंच. मग दिग्दर्शक म्हणे की तसंही दुष्काळाची वेळ आहे म्हणजे लोक कमीच कपडे घालणार. डोक्याला फेटे नसतीलच. हे तर्कशास्त्र माझ्यासाठी अनाकलनीय होतं. दुष्काळ सुरू झाल्यावर माणसे नवीन कपडे घेणार नाहीत, त्यांना आहेत ते कपडे धुवायला पाणी मिळणार नाही त्यामुळे कपडे खूप मळके आणि जुने असतील पण दुष्काळ सुरू झाला म्हणून अंगावरचे कपडे कसे काढून टाकतील? फेटा रोजच्या वापरात तसाही नसतो पण पागोटी आणि मुंडाशी तर असतातच ना आणि काहीही झालं तरी दुष्काळाच्या परिस्थितीतही १८८० चा काळ लक्षात घेता गावातला माणूस गावात फिरताना किंवा प्रतिष्ठीत व्यक्तीसमोर उघड्या डोक्याने कसा जाईल? असं आपलं माझं लॉजिक. शेवटी 'नीरजा बदलली आता. मोठी समजायला लागली स्वतःला!' अश्या तात्पर्यावर समोरच्याने चर्चा संपवली.
काही ठिकाणी जिथे बजेटचा विचार करायची गरज नसते तिथे कॉश्च्युम्सच्या बाबतीत नट खुश म्हणजे दिग्दर्शक खुश आणि निर्माता खुश. कथा, व्यक्तिरेखा इत्यादी गेल्या उडत. आणि सगळा चकचकाट बघून, आपल्या आवडत्या नटनटीला नवीन आणि ट्रेण्डी अवतारात पाहून पंखे आणि अनुकरणवादी खुश असा सगळा खुशीचा मामला असतो.
तर काही ठिकाणी दिग्दर्शकाला तपशीलात काम करणारे लोकच नको असतात. असंच एका चित्रपटाचं कॉश्च्युम डिझाइन मी करत होते. इथल्या लोकांसाठी फिल्म बनवत नाही मी असं म्हणत दिग्दर्शक एक मसाला फिल्म इंग्रजीतून बनवत होता. चित्रपटाच्या दृश्यात्मकतेकडे नीट लक्ष द्यायचंय अश्या वाक्यांमुळे मला या दिग्दर्शकाबद्दल खूपच आशा निर्माण झाली होती. मी आपलं प्रत्येक व्यक्तिरेखेला एक ठराविक रंगसंगती, प्रत्येकाचा एक ठराविक लुक जो व्यक्तिरेखेच्या ग्राफबरोबर बदलत जाईल असलं काय काय ठरवलं. भरपूर स्केचेस, भरपूर पेपरवर्क केलं. ती फाइल बघून दिग्दर्शकाने ओके दिला. मी खुश की ’वा चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करतोय आपण. मी अजून उत्साहात त्याला सिनेमॅटोग्राफरच्या लायटींग पॅटर्न, रंगसंगती, टेक्श्चर बद्दल विचारायला गेले. तेव्हा उत्तर काहीच आलं नाही. मग जेव्हा सगळे कपडे बनून आले तेव्हा एकेका व्यक्तिरेखेची ठराविक रंगसंगती बघून दिग्दर्शकाचा पापड मोडला.
"ये क्या डीझाइन है! सारे कलर्स आने चाहीये ना कपडोंमे?"
"सर, कॅरेक्टर का कलर पॅलेट हमने तय किया था." इति मी.
"तो क्या हुआ? सारे कलर्स नही आये तो व्हिज्युअल अच्छा नही दिखेगा. सारे कलर्स आने चाहीये. बाकी इतना किसीको समझता नही है. वो सब चल जाता है!" ’अरे काय रंगपंचमी आहे काय मी मनातल्या मनात चरफडले.
अशी आपल्या चित्रपटक्षेत्राला या चलता है ची लागण झालेली आहे. बारीकसारीक तपशील तर सोडूनच द्या पण ठळक ठळक गोष्टी सुद्धा ’चलता है!’ म्हणत दुर्लक्षिल्या जातात. त्यामुळे तंत्रज्ञ कितीही चांगला असला तरी दिग्दर्शकाला प्रत्येक तंत्राच्या ताकदीचा अंदाजच नसेल तर त्या चांगल्या तंत्रज्ञाचंही लोणचं घातलं जातं. आणि मग कधीतरी मोगल काळातील सीन असतो. व्यक्तिरेखा सम्राज्ञीची असते. पण झिरझिरीत ओढणी लेवून आल्याने ती मुजरेवाली ’कनिज’ दिसत असते. तिच्या बरोबरीच्या सख्यांच्या ओढण्या सिंथेटिक कापडांच्या दिसत असतात. त्या सगळ्यांच्या कपड्याला लावलेल्या सेफ्टिपिना दिसत असतात. सिंथेटिक कापड आणि सेफ्टिपिना दोन्ही मोगल काळात अस्तित्वात नव्हतं हे जगजाहीर असतं. तरी माझी मैत्रिण म्हणते हिंदी सिनेमात इतकं कशाला बघायचं आपण? तेवढं तर चालतंच ना!
आपण एकुणातच तडजोड करणारी माणसं. गोष्टी चालवून घेण्याची अतोनात सवय आपल्याला. त्यामुळे प्रेक्षकच ’चलता है’ म्हणतात. मग काही प्रश्नच नसतो. कधी कधी वाटतं मला की चुकून एखाद्या दिवशी प्रेक्षकांनी हे चालवून घेणं सोडलं तर काय होईल? तेव्हा तरी आम्ही ’चलता है!’ सोडून देऊन आपली पद्धत बदलण्याचा प्रयत्न करू? की प्रेक्षकांना मूर्ख बनवतच राहू? असो.
हा या मालिकेचा समारोपाचा लेख. प्रेक्षक तडजोड करायचं आणि आम्ही ’चलता है!’ म्हणणं लवकरच सोडून देऊ एवढ्या आशेवर समाप्त करतेय. आठ लेखांच्या या मालिकेच्या शेवटी काही जणांना तरी या ’सोंग सजवण्याच्या कलेचं’ म्हणणं कळलं तरी माझं लिहिणं सुफळ संपूर्ण झालं. शेवटी काय रांधणार्याच्या कौशल्याबरोबरच जेवणार्याचं हवंनको तेवढंच महत्वाचं असतं नाही का? बघा विचार करून....
---नीरजा पटवर्धन
पुढचे आठ कधी येणार लेख. सत्यं
पुढचे आठ कधी येणार लेख.
सत्यं शिवं सुंदरं हा पण एक अ.अ. सिनेमा आहे कॉस्च्यूम च्या साठी.
लेख एकदम मस्त. (मी फक्त ३
लेख एकदम मस्त. (मी फक्त ३ वाचले, बाकीचे वाचायचे आहेत.)
या सगळ्या लेखात छापलेल्या चित्रांमधले पोशाख तु केले आहेस काय?
कधीकाळी दुरदर्शनवर परिकथांवर आधारित इंग्रजी चित्रपट दाखवलेले. मी ते चित्रपट मुद्दाम त्यातल्या कपड्यांसाठी बघायचे. लहानपणी परिकथा वाचलेल्या, त्यातली परदेशी चित्रे पाहुन असले कपडेही कोणी घालत असतील का असे वाटायचे. ते कपडे प्रत्यक्षात पाहुन अगदी मस्त वाटायचे.
आताही चित्रपट पाहताना, विशेषतः पिरियड फिल्म पाहताना कपडे मुद्दाम पाहते. बाकी इतर सध्याचे चित्रपट पाहताना चित्रपटाला कॉश्चुम डिजायनर आहे का ते कळत नाही पण हिरो हिरविनीला त्यांचा स्वतःचा ड्रेस डिजायनर आहे हे मात्र अगदी लगेच लक्षात येते कधीकधी आजुबाजुचे वातावरण आणि कपडे यांची थोडीफार संगती घातलीय असे वाटते....
>>आपण एकुणातच तडजोड करणारी
>>आपण एकुणातच तडजोड करणारी माणसं. गोष्टी चालवून घेण्याची अतोनात सवय आपल्याला.
एकाहून एक सरस अनुभव आहेत. आपल्या देशाचे ब्रीदवाक्य बदलून त्या चार सिंहांच्या खाली चलता है लिहायला पाहिजे.
परदेशात सगळ्याच बाजूंनी किती खोल विचार करतात हे त्यांच्या मुलाखती पाहिल्यावर जाणवते. जुरासिक पार्कचे कलादिग्दर्शन करायला तब्बल तीन वर्षे लागली. पण असे बोलून दाखवायची सवय नाही कारण लगेच तुम्हाला देशाभिमान नाही असा निष्कर्ष.
लेखमाला आवडली. बर्याच रोचक गोष्टी कळल्या. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
<<सिनेमाचं बजेट कमी करायचं
<<सिनेमाचं बजेट कमी करायचं असेल तर पहिली कात्री कॉश्च्युमच्या खर्चावर चालवली जाते.>> खरय
या सगळ्या लेखात छापलेल्या
या सगळ्या लेखात छापलेल्या चित्रांमधले पोशाख तु केले आहेस काय?<<
तिसर्या लेखातल्या चित्रातील काही कॉश्च्यूम्स मी डिझाइन केले नाहीयेत नुसते बनवलेत युनिव्हर्सिटीच्या किंवा सॅन्टा फे ऑपेराच्या शॉपमधे. ते वगळता बाकी सर्व लेखातील फोटोमधले सगळे कॉश्च्युम्स मीच डिझाइन केले आहेत.
छान लेखमाला. खुप उत्सुकतेने
छान लेखमाला. खुप उत्सुकतेने वाचले सगळे लेख. एका वेगळ्याच जगाची ओळख झाली.
सगळी लेखमाला मस्त आहे. अजुन
सगळी लेखमाला मस्त आहे.
अजुन पण आवडेल तुझ्या अनुभवांविषयी वाचायला
खुप छान. पण अजून माहीती हवी.
खुप छान. पण अजून माहीती हवी.
अमा, मंजिरी, अखी, आता पुढे
अमा, मंजिरी, अखी,
आता पुढे लेख नाही. तुम्ही प्रश्न विचारा मी उत्तरं देईन.
सही झाली आहे लेखमाला. आवडली.
सही झाली आहे लेखमाला. आवडली. खूप माहिती नसलेल्या गोष्टी कळल्या. ज्या कितीतरी ऑब्व्हियस असूनही कधी विचार केला नव्हता अशाही. धन्यवाद!
कॉश्च्यूम्स डिझाइन करताना मग
कॉश्च्यूम्स डिझाइन करताना मग इतीहासाचा पण अभ्यास करावा लागतो ना? मग त्यातिल कपड्यांचा विचार तुम्ही कसा करता?
>> १ भाग मी मिसला होता उत्तर मिळाले
छान झाल्ये लेखमाला
छान झाल्ये लेखमाला
मनाजोगते काम करायला मिळत नाही
मनाजोगते काम करायला मिळत नाही आणि मनाविरुद्ध काम करायची तडजोड तर करायची नाही, यातला सुवर्णमध्य कसा साधायचा ? मला वाटतं हा बहुतेक कलाकारांचा प्रॉब्लेम असतो. त्यातून बरेच चांगले कलाकार प्रवाहपतीत होताना दिसतात. पडद्यामागच्या कलाकारांचे उदाहरण नाही देता येत, पण विक्रम गोखले, रोहिणी हट्टंगडी वगैरे ज्या प्रकारच्या भुमिका करतात त्या बघवत नाहीत.
आमच्या नीरजाबाईंना मात्र मनाजोगते काम करायला मिळू दे, अशी मनापासून शुभेच्छा !
छान
छान
सुरेख लेखमाला नीरजा.
सुरेख लेखमाला नीरजा.
आवडले वाचायला. या लेखा मधे हे
आवडले वाचायला.
या लेखा मधे हे दोन फोटो का निवडले आहेस? कशातले (कुठल्या नाटक, सिनेमा मधले) आहेत हे फोटो?
मस्त आहे लेखमाला.
मस्त आहे लेखमाला. आवडली.
श्वास मधले अमृता सुभाष चे कपडे खरेच छान होते. तेव्हाही ते खुप आवडले होते.
मस्त माहिती! माझा मेहुणा
मस्त माहिती!
माझा मेहुणा मागच्याच वर्षी FTII मधुन साउंड इंजिनिअर झाला. त्याच्या कडुनही अशा (त्याच्या क्षेत्रातल्या) बर्याच बारिकसारिक गोष्टी कळाल्या. खरच सामान्य प्रेक्षकाला या पडद्या मागच्या कलाकारांशी काही घेणंदेणंच नसत नट-नटी-दिग्दर्शक-गायक-संगित दिग्दर्शक यांना जास्तच डो़क्यावर चढवून ठेवलय.
सुंदर लेखमाला. विसंगत
सुंदर लेखमाला. विसंगत वेशभूषेमुळे चित्रपट पाहताना रसभंग झाल्याचं अनेक वेळा घडत आलंय. नेमकं काय चुकलंय हे सांगता आलं नाही तरी काहीतरी चुकलंय हे संवेदनशील प्रेक्षकाला नक्कीच जाणवतं. 'चलता है' अॅटिट्यूड घातकच आहे. पण केवळ ही बाब जमली नाही म्हणून प्रेक्षक चित्रपट बघायचा सोडणार नाहीत आणि कुठल्यातरी एक-दोन गोष्टींच्या बळावर ( अभिनेते,कथा, गाणी इत्यादी ) चित्रपट चालतोच आहे म्हणून निर्माते / दिग्दर्शक गुणवत्तेबाबत आग्रही राहणार नाहीत ( काही अपवाद वगळता ) असं हे दुष्टचक्र आहे. ते भविष्यात तरी भेदलं जावं ह्यासाठी शुभेच्छा !
बाकी 'देवदास' म्हणजे 'लॅव्हिश इज व्हल्गर ...' चं उदाहरण वाटलं. पैसे आहेत म्हणून ते भसाभसा ओतून प्रत्येक फ्रेम चकचकीत करण्याचा अट्टहास !
या लेखा मधे हे दोन फोटो का
या लेखा मधे हे दोन फोटो का निवडले आहेस? कशातले (कुठल्या नाटक, सिनेमा मधले) आहेत हे फोटो?<<
निर्मल पांडे असलेला फोटो जो आहे तो विक्रमादित्य नावाचा एक पिरियड डेली सोप चालू होणार होता, त्याच्या पायलट मधला आहे. ते माझं मुंबईतलं पहिलं प्रोजेक्ट.
खाली नाझनीन, सुहृद गोडबोले आणि श्रेयस तळपदे आहेत तो हॅन्गमॅन नावाची फिल्म. तीच सारे कलर्स चाहीये फ्रेममे वाली. बरीच मोठी इष्टोरी आहे या फिल्मची. पण असोच.
बाकी 'देवदास' म्हणजे 'लॅव्हिश
बाकी 'देवदास' म्हणजे 'लॅव्हिश इज व्हल्गर ...' चं उदाहरण वाटलं. पैसे आहेत म्हणून ते भसाभसा ओतून प्रत्येक फ्रेम चकचकीत करण्याचा अट्टहास !<<
देवदासच काय हल्लीच्या सगळ्या सिरीयल्स, बरेचसे सिनेमे यात बसतील.
नी, अतिशय सुरेख लेखमाला!
नी, अतिशय सुरेख लेखमाला!
नी, आज एका दमात आठही भाग
नी, आज एका दमात आठही भाग वाचून काढले. मुख्य म्हणजे कुठेच दम लागला नाही! सोप्या शब्दात, ओघवतं वर्णन केलंयस त्यामुळे ही नुसती 'वेशभूषेची माहिती' न वाटता बॅकस्टेजला वावरत असल्यासारखं कुतूहल वाटत आणि शमत गेलं. फोटोंमुळे 'म्हणजे नक्की काय?' चं उत्तर मिळत राहिलं! धन्यवाद!
(No subject)
मस्त..ओघवत्या शैलीत लिहीले
मस्त..ओघवत्या शैलीत लिहीले आहे..अगदी बोलके चित्रण केले आहे..मुगलकालीन कपड्यांत ओढण्याअगदीच विसंगत वाटतात तसेच घरात वावरणारर्या बायका-पुरुषांचे [झकपक]कपडे-दागिने ,डोळाभर अन बाहेर ही लावलेले काजळ,नकोशा वाटणार्या बिंद्या,व कपाळावरचा टिक्का.,स्वयपाकघरातही भाजी चिरताना [पालक] ,कढईतल काहीबाही नुसतेच ढवळताना केस मोकळे सोडलेल्या सुना,देव घरात ही चप्पल घालुन जाणे.,मोठ्ठे भरगच्च डायनिंग टेबल,एक ना दोन अशा कितीतरी गोष्टी सतत सलत असतात..हे काय भारतीय संस्कृतीचे वास्तववादी चित्रण झाले का? डायरेक्टर च्या मते यामुळेच सिरीयल मधे "जान" येत असेल..टी.आर..पी. वाढत असेल..पण तुझ्या सारख्यांचा खरं च किती कोंडमारा होत असेल..याची कल्पना आली..
मस्त... सलग ८ भाग वाचून
मस्त... सलग ८ भाग वाचून काढले.. ओघावले लिखाण. त्याचे मुख्य कारण आपण जे करतोय ते कित्ती योग्य पद्धतीने करतोय (आणि तसेच केले पाहिजे) याचा आत्मविश्वास. अनेक ठिकाणी तुला तांत्रिक बाबींवर तडजोड करावी लागत असेल हे दिसून येतंय पण तुला तुझ्या पद्धतीने काम करायला मिलो हीच इच्छा...
शुभेच्छा...
एका दर्जेदार लेखमालेद्दल
एका दर्जेदार लेखमालेद्दल अभिनंदन व धन्यवाद.
सध्या टीव्हीवर दाखवले जाणारे हॉलीवूड सिनेमेही पाहिले तर, अपवाद वगळतां, बहुतांशी तांत्रिक बाबींशिवाय त्यांत वाखाणण्यासारखं, स्मरणीय कांही असतं असं वाटत नाही. "चलता है" हे चालून जातं कारण " साला सिनेमा तो टायम पासके लिये है, दिमाखको आराम मिलना मंगता है ,बस्स !", हा प्रेक्षकवर्ग सगळीकडेच वाढतो आहे, केवळ भारतातच नाही, असं वाटतं. सिनेमाच्या विविध अंगांचं अगदीच माफक ज्ञान असूनही मला हा फरक तीव्रतेने जाणवतो.
आज सगळे भाग वाचून काढले. बरेच
आज सगळे भाग वाचून काढले. बरेच दिवस आवडत्या भागांमध्ये ठेवले होते. हम आपके है कौन च्या वेळेस हे दिसले होते आणि जाणवत होते पण नक्की काय आहे ते तुमच्या लेख मालेतून कळले.