श्याम मनोहर - कळ आणि इतर
श्याम मनोहर यांच्या लिखाणाचं गारूड माझ्यावर नक्की कधीपासून झालं ते काही नीट सांगता येणार नाही. कारण त्यांची पुस्तके माझ्या प्रत्यक्ष हातात येण्याच्याही खूप आधीपासून मला त्यांचे लेखन आकर्षित करत होते. वाचनाच्या बाबतीत साधारण एकसारखीच आवड असण्यार्या मित्रांच्या तोंडून ’श्याम मनोहर’ वाचच तू एकदा. प्रेमात पडशील. असं वारंवार सांगितलं जात होतं आणि तेही त्यांच्या शैलीविषयीच्या कुतुहलवर्धक उदाहरणांसह आणि वारेमाप कौतुकासह! पुस्तकांची नावे ऐकूनच अचंभित वाटायचे. काहीतरी अचाट अनुभूती या पुस्तकांत असणार हे नक्कीच जाणवले होते.