श्याम मनोहर यांच्या लिखाणाचं गारूड माझ्यावर नक्की कधीपासून झालं ते काही नीट सांगता येणार नाही. कारण त्यांची पुस्तके माझ्या प्रत्यक्ष हातात येण्याच्याही खूप आधीपासून मला त्यांचे लेखन आकर्षित करत होते. वाचनाच्या बाबतीत साधारण एकसारखीच आवड असण्यार्या मित्रांच्या तोंडून ’श्याम मनोहर’ वाचच तू एकदा. प्रेमात पडशील. असं वारंवार सांगितलं जात होतं आणि तेही त्यांच्या शैलीविषयीच्या कुतुहलवर्धक उदाहरणांसह आणि वारेमाप कौतुकासह! पुस्तकांची नावे ऐकूनच अचंभित वाटायचे. काहीतरी अचाट अनुभूती या पुस्तकांत असणार हे नक्कीच जाणवले होते.
श्याम मनोहरांची पुस्तके मिळवण्यासाठी वाचनालयात अनेक फेर्या झाल्या. वाचनालयाच्या ज्या शाखेची मी सदस्य आहे, तिथे शाम मनोहरांचे फक्त एकच पुस्तक उपलब्ध होते - ’उस्तुकतेने मी झोपलो’. ते पुस्तक एकदा वाचले. मग पुन्हा एकदा. मग अजून एकदा. प्रत्येक वाचनात मला नव्याने काहीनी काही उलगडत होतेच! तेंव्हापासून त्यांच्या लेखनाच्या खरोखरच प्रेमात पडले! पण त्यांची पुस्तके मिळवणे वाटले तितके सोपे नव्हते. वाचनालयाला त्यांची पुस्तके मुख्य शाखेतून मागवून माझ्यापर्यंत पोचवावी लागायची. त्यात कितीतरी आठवडे जायचे. विकत घ्यावी तर बाजारातही त्यांची पुस्तके उपलब्ध नव्हती. त्यांची ’कळ’ ही कादंबरी मिळवण्यासाठी जंग जंग पछाडले! शेवटी वाचनालयातून मिळाले. वाचल्यावर लक्षात आले.... हा तर संग्रही ठेवावा असा खजिना आहे!
शाम मनोहरांच्या लिखाणाविषयी, त्यांच्या अनोख्या लेखनशैलीविषयी मी काही बोलावं म्हणजे फारच उथळपणा होईल. म्हणजे खरंतर त्यांच्याच लिखाणाचा विषय होईल! त्यांची सगळीच पुस्तकं आणि विशेषत: ’कळ’ वाचणं हा एक विलक्षण अनुभव आहे. स्वत:च स्वत:ला अनेक अंगांनी सामोरं जाण्याचा, स्वत:ला पाहण्याचा, निरखण्याचा, ओळखण्याचा. त्यांच्या ’ब्लॅक ह्यूमर’ म्हणता येईल अश्या काहीशा टोकदार विनोदी उपहासात्मक लिखाणानी एका बाजूला हसू येतं आणि दुसर्याच क्षणी आपण आपल्यावरच हसत असल्याचं बोचरेपणानं जाणवतं आणि आपण चक्क खजिल होतो! आपल्या आजूबाजूला आणि आपल्या आतही खरंतर किती दांभिकपणा सहजपणे ठासून भरलेला आहे आणि तो वागवण्याला आपण किती सरावून गेलो आहोत हे फार वेगळ्या पद्धतीने जाणवून देणारं हे लिखाण आहे. विसंगती ठासून भरलेल्या मध्यमवर्गीय बुद्धिवादी समाजात वावरताना माणसांच्या वागण्यात, बोलण्यात, कृती करण्यात, विचार करण्यात, विचार बोलून दाखवण्यात, भूमिका घेण्यात आणि ती मांडण्यात जो एक भंपकपणा सतत पार्श्वभूमीला असतो - तो श्याम मनोहरांनी थेट नेमकेपणाने मांडलाय. जणू एका उंचीवरून ते आपल्या सगळ्यांकडे तटस्थ नजरेने बघताहेत आणि आपल्या दैनंदिन जगण्याची गोष्ट लिहिताहेत! आणि आपल्यालाच आरसा दाखवल्यागत ते आपल्याच गोष्टी वाचायला देताहेत!
पण ही निव्वळ आपलीच गोष्ट नाही! आपल्यात जे असायला हवं, जे असणं अपेक्षित आहे - पण नाही - त्याचीही ही गोष्ट आहे! त्याऐवजी ज्या भलत्याच संकल्पनांनी आपला मेंदू कसा काबिज केलाय त्याची ही गोष्ट आहे. आपल्यातले काही मोजके बुद्धिवंत, कलाकार, प्रज्ञावंत माणसे... ज्यांनी आपले आयुष्य सुंदर आणि सोयीस्कर बनवले त्यांच्याप्रती आपण ठरवलेल्या आपल्या भूमिकेचीही ही गोष्ट आहे! उदाहरणार्थ -
आपल्याकडे नट-नट्या, सिनेमे, राजकारणी, क्रिकेटपटू, सामाजिक कार्य करणारे, कलावंत, सैनिक वगैरेंबद्दल भरपूर बोललं सांगितलं जातं. धर्म, देव, अध्यात्म यांच्याविषयी तर भरमसाठ ज्ञानगंगा वाहत असते चहूकडून. मात्र आपल्याकडे विज्ञानाविषयी बोललं जात नाही. शास्त्रज्ञांविषयी सांगितलं जात नाही. अभियंत्यांविषयी, संशोधकांविषयी, अभ्यासकांविषयी बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. त्यांची नावेही कुणाला माहीत नसतात. शाळेतून विजेचा शोध कुणी लावला, टेलिफोनचा शोध कुणी लावला वगैरे छापिल दोन-चार मोजकी नावे पाठ करून घेतली जातात. त्यांचा संघर्ष, त्यांचे कुतुहल, त्यांचे किस्से सांगितले जात नाहीत. आपण आपल्या मुलांना धर्माच्या तथाकथित इतिहासातल्या शेंडाबुडखा नसलेल्या कित्येक चमत्कारांच्या गोष्टी सांगतो... परिकथा, दंतकथा सांगतो. पण ज्यांनी खरोखर विज्ञानाच्या आधारे आधुनिक चमत्कार घडवून आणले त्यांच्या गोष्टी आपण मुलांना सांगत नाही. त्या संपूर्ण सत्य असल्याचे माहीत असूनही! त्यांना सांगत नाही की आपल्या डोक्यावर फिरणार्या पंख्यापासून आपल्याला ने-आण करण्यार्या गाडीपर्यंत, नळातून येणार्या पाण्यापासून शाळेच्या छापलेल्या पुस्तकांपर्य़ंत हे सारे कुणी निर्माण केले... कसे केले.... कशी होती ती माणसे! कारण आपल्यालाच ते नसते माहीत! हा आपला दांभिकपणा! श्याम मनोहर हा आपल्या लक्षात आणून देतात तेही फार बोचर्या जाणिवेसह!
’कळ’ मध्ये एक संपूर्ण प्रकरण (प्रकरण म्हणता येणार नाही खरंतर. पुस्तकाची आखणीच तशी नाही. असो.) साधारण तीसेक पाने निव्वळ शात्रज्ञांच्या गोष्टी आहेत. फारच गंमतीशीरपणे सांगितलेल्या. त्यात हॉरॉक्स, अलेंबर्ट, न्यूटन, हायझेनबर्ग, डि ब्रोगली, बोर, श्रोडिंजर अशी अनेक दिग्गज माणसे आहेत. आपल्या (हो आपल्याच) पाकिस्तानचा अब्दुस सलाम देखिल आहे. या बुद्धिमान लोकांच्या असामान्यत्वाच्या गोष्टी आहेत. दोन विचारवंत एखाद्या शात्रीय मतभेदाच्या मुद्द्यावर रात्रंदिवस कसे भांडतात, डोकी लढवतात, वाद घालतात, न थकता डिबेट करतात, भूमिका स्पष्ट करत राहतात, दुसर्याचीही समजून घेत राहतात, संतापतातही (पण आयाबहिणी काढत नाहीत) त्याची गोष्ट आहे! क्वांटम मॅकेनिक्स, वेव्ह मॅकेनिक्स, फिजिक्स वगैरे भानगडींशी आता दूरान्वयेही संबंध राहिलेला नसतानाही हे प्रकरण वाचताना क्लिष्ट वाटत नाही. सहज कळत जाते. आपण त्या शास्त्रज्ञांना भेटून येतो. त्यांच्यात रमतो. आणि खास श्याम मनोहर स्टाईलने सरतेशेवटी धाडकन् जमिनीवर आपटतो! हे असे आपटणेही खासच.
कळ बद्दल, मनोहरांच्या सार्याच पुस्तकांबद्दल, त्यात वापरल्या गेलेल्या चित्रविचित्र प्रतिकांबद्दल, त्यातून ध्वनित होणार्या बोचर्या सत्याबद्दल, वरवर सोप्प्या वाटणार्या मनोहरांच्या भाषेतल्या ’between the lines' गंमतीबद्दल... खूप काही लिहिता येईल. पण अनुभूती ज्याची त्याने स्वत:च घ्यायची असते. माझ्यापुरते एवढेच की श्याम मनोहरांची काही पुस्तके अखेर विकत घेऊन आता मी स्वत:ला श्रीमंत समजते आहे. माझे पुस्तकांचे कपाट आता फार सुंदर दिसू लागले आहे.
-मुग्धमानसी
वाह!!! काय मस्त परिचय करुन
वाह!!! काय मस्त परिचय करुन दिलात.
श्याम मनोहरांच्या बाबतीत
श्याम मनोहरांच्या बाबतीत माझंही असंच काहीसं आहे.
त्यांचं टोचून बोलणं जाम आवडतं.
सुरूवातीला 'बिनमौजेच्या गोष्टी' वाचलं आणि मग सपाटाच लावला.
'कळ' तेव्हाही आऊट ऑफ प्रिंटच होती. त्यामुळे
सगळ्यात शेवटी वाचली. . बाकी, तो 'गॅरेजवाला' आठवला की अजूनही मंद मंद हसू येतं.
मला वाटत होतं, मी शाम
मला वाटत होतं, मी शाम मनोहरांच्या बहुतेक कादंबर्या वाचल्या आहेत. कळसुद्धा. पण मला वरचा शास्त्रज्ञांबद्दलचा भाग वाचल्याचं आठवत नाहीए. तसंच फेसबुकवर तुम्ही जे फोटो टाकलेत, त्यातली काही वाचली नाहीएत, असं वाटतंय. पुन्हा वाचायला हवीत
लेख आवडलाच. त्यांची तीनचार पुस्तकं वाचल्यावर त्यांना त्या त्या लेखनातून नेमकं काय सांगायचंय याचा अंदाज येऊ लागला. प्रेम आणि खूप खूप नंतर मध्ये बुद्धिमान इ. शब्द कसे हलक्यात वापरले जातात याबद्दल वारंवार उल्लेख येत राहतो . नवखेपणी हे काय निरर्थक उगाचच तेच तेच बोलताहेत असं वाटतं. आणि मग ते भल्या मोठ्या अगदी अजस्र फळ्यावर ठळक अक्षरांत लिहिलेलं दिसतं.
तसंच अगदी रूटिन गोष्टींचं वर्णन भरलेलं असतं. इतर कोणाच्या लेखनात असं वर्णन आलं तर ते ओलांडून पुढे जातो. पण इथे तसं करता येत नाही. हा त्यांच्या शैलीचा परिणाम की इथेही काही असेल जे सुटेल असं वाटणं, हे माहीत नाही.
त्यांच्या एका कादंबरीत इंटरनेटवरून एक रेसिपी डाउनलोड करून की प्रिंट करून ती बनवतानाचं इत्धंभूत वर्णन आहे. अगदी त्यासाठी लागणारे जिन्नस (चिकन?) कसं आणलं, इ.
छान लिहिलंय. कळ या मनोहरंच्या
छान लिहिलंय. कळ या मनोहरांच्या सर्वात महत्वाच्या पुस्तकावर अक्षरश 'कळ' इतकं लिहिता येईल. इतर पुस्तकांबद्दलही वाचायला आवडेल.
बुद्धिमान इ. शब्द कसे हलक्यात वापरले जातात
>>>
अगदी. याहीपलीकडे आपले शब्द, आपलं वागणं, जगणं आणि एकंदरच असणं हे आपण किती हलक्यात घेतो हे ते वारंवार सांगतात. आपल्या या हलक्यात घेण्यातही एक प्रकारचा दंभ असतो, आणि मग सुरू होते जन्मापासून मरणापर्यंत एकापाठोपाठ एक अशा विसंगतींची भलीमोठी आगगाडी. आपली मतं, ज्ञान, चौकसबुद्धी, जाणीवा, संवेदना हे सारंच असं वरवरचं आहे आणि आणि कशालाच काही खोली नाही, हे श्याम मनोहर वाचता वाचता लक्षात येतं, आणि आपण हादरतो. रोजच्या जगण्यावागण्यातले आपले भंपकपणे ते ठायीठायी दाखवत राहतात, अणि मग हे सारं प्रकरण वरकरणी दिसणार्या, पुस्तकाच्या पानांत भरलेल्या, वरवर निरर्थक वाटणार्या अकारण तपशीलांचं आणि सरधोपट-सपक-अळणी-नीरस प्रसंगांचं आवरण भेदत थेट अस्तित्त्ववादाच्या आसपास कुठेतरी जाऊन ठेपतं.
'मी आयुष्यभर एकच पुस्तक लिहितो आहे', असं श्याम मनोहर म्हणतात. त्यांची पुस्तकं वाचलेल्याने नीट विचार केला, तर त्यांचं हे वाक्य 'तुम्हाला समजेपर्यंत मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत राहणार आहे!' असं ऐकू येतं. त्यांच्या लिखाणात उपहास आहे, खंत आहे, विषादही आहे. मात्र हे सारं आपल्याला अपमानित करून सोडण्याइतकं तीव्र नाही, तर सौम्य आहे. कधी तर अतिशय प्रेमाने, तुमच्या पाठीवर हात ठेऊन ते आपल्याला आरसा दाखवतात असं वाटतं.
मनोहरांचं लिखाण समजणं अवघड नाही, मात्र ते जरा एखाद्या वाईनची टेस्ट डेव्हलप होण्यासारखं आहे. चिकाटीने त्यांची पुस्तकं वाचत राहिलं तर एक पट उभा राहतो, आणि त्यांना काय म्हणायचं आहे, ते हळुहळू समजायला लागतं. मटामध्ये मागल्या वर्षी त्यांचा कॉलम सुरू झाला तेव्हा मला फार आनंद झाला होता, आणि मटाचं कौतुकही वाटलं होतं. या कॉलमची चर्चा होईल असं वाटलं, मात्र तसं कुठे झाल्याचं दिसलं नाही. लब्धप्रतिष्ठितांसारखं 'आपल्याला नाही बुवा असलं काही कळत!" असं सहज म्हणता येतं. पण मग प्रकरण पुन्हा एलकुंचवारांच्या 'सामान्यत्वाचा अहंकार' (आणि अरभाटाच्या 'अजून खूप बाकी आहे') या लेखापाशी येऊन थांबतं. मनोहरही हेच तर म्हणतात- "अहंकार कसला करताय? आरशात बघितलं तर विसंगती आणि भंपक हिपोक्रसी आहे सारी."
आम्ही शंभर पावलो, यकृत, प्रेम
आम्ही शंभर पावलो, यकृत, प्रेम , हृदय, शंभर मी, खूप लोक आलेत, दर्शन, उत्सुकतेने मी झोपलो आदि बरीच पुस्तके अॅमेझॉनवर आहेत. मी घेउन टाकणार आहे. मुग्धमानसी तुमचा परिचय जबरदस्त आहे, कड्यापर्यंत नेतो. साजिरा यांची पोस्ट तर कडेलोटच करते.
मानसी, खुप छान परिचय करून
मानसी, खुप छान परिचय करून दिला आहेस. ज्यांनी मनोहर वाचले नाहीत ते देखील आता त्यांची पुस्तके मिळवून वाचतील (त्यात मीही आलोच) … धन्यवाद
धन्यवाद सगळ्याच
धन्यवाद सगळ्याच प्रतिसादांसाठी. साजिरा तुमचा प्रतिसाद तर फारच कहर आवडला.
मानसी, खुप छान परिचय करून
मानसी, खुप छान परिचय करून दिला आहेस. ज्यांनी मनोहर वाचले नाहीत ते देखील आता त्यांची पुस्तके मिळवून वाचतील (त्यात मीही आलोच) … धन्यवाद
>>>>+१
लेख आवडला. काही वर्षांपूर्वी
लेख आवडला. काही वर्षांपूर्वी मायबोलीवर टण्या ने लिहिलेल्या एका पोस्ट मुळे खूप उत्सुकतेने 'उस्तुकतेने मी झोपलो' हे पुस्तक विकत घेतले होते. पण मनोहरांची लेखन शैली फारशी भावली नाही. खूप प्रयत्न करून अनेक बैठकीत पुस्तक वाचून संपवले पण परत त्यांच्या पुस्तकांच्या वाट्याला जाईल असे वाटत नाही. आमच्या साठी पुलं, सु शी हीच मजल.
>>>>>>>>>>परत त्यांच्या
>>>>>>>>>>परत त्यांच्या पुस्तकांच्या वाट्याला जाईल असे वाटत नाही.
बरे झाले सांगीतलेत. आज मी किंडलवरची सगळी पुस्तके घेणार होते. आता आधी एक घेइन.
पण साजिरा म्हणतात की 'अॅक्वायर्ड टेस्ट' आहे. वोह कैसा जमिंगा?
बरं मानसी तुम्ही पहिलटकरणीकरता (जस्ट किडिंग) नवशिक्या वाचकांकरता कोणते पहीले पुस्तक सजेस्ट कराल?
'प्रेम आणि खूप खूप अंतर' आणी
'प्रेम आणि खूप खूप अंतर' आणि 'मी उत्सुकतेने झोपलो' - २ पुस्तके घेतलेली आहेत.
'मी उत्सुकतेने झोपलो' मधील
'मी उत्सुकतेने झोपलो' मधील पहीली कथा वाचली. आवडली मला त्यांची शैली.
अहो सिलॅबस किंवा सिक्वेन्स
अहो सिलॅबस किंवा सिक्वेन्स म्हणून ट्रीट करण्यासारखं काही नाही त्यात. कुठचंही पुस्तक हातात घेतो तसं सहज म्हणून ह्यांचं एखादं घ्यावं, कुतूहल वाढलं तर वाचत राहावं. प्रकृतीला जमलं नाही तर सोडून द्यावं. हाकानाका
मनोहर महत्वाचे लेखक आहेत- इथवर मत झालं तर बोनस.
कुटुंबव्यवस्था व फुलपाखरु
होय साजिरा. बरोबर बोललात.
कुटुंबव्यवस्था व फुलपाखरु कथाही वाचली. अजुन गंमत लक्षात येत नाहीये पण त्रयस्थ साक्षीभाव आणि मधल्या टिप्पण्या मस्त.