'धग’ - कादंबरी - पुस्तक परिचय

Submitted by मुग्धमानसी on 4 May, 2023 - 03:44

पुस्तक: ’धग’
लेखक: उध्दव ज. शेळके

’धग’ बद्दल आजवर खूप काही बोलले सांगितले लिहिले गेलेले आहे हे खरंच. उद्धव शेळकेंना ’कादंबरीकार’ म्हणून उदंड किर्ती मिळवून देणारी ही एक अत्यंत उत्कृष्ट कादंबरी आहे हे सिद्ध झालेलेच आहे. मी अजून वेगळे काय सांगणार? तरिही हे पुस्तक वाचायला सुरूवात केल्यापासून वाचून संपल्यानंतरही काही काळ ज्या अनुभूतीतून मी विलक्षण प्रवास केला त्यावर लिहिल्यावाचून राहवत नाही. किमान माझा वाचन अनुभव आणि माझ्या या कादंबरीबद्दलच्या तिच्या प्रभावाखाली मी अजूनही असतानाच्या ताज्या भावना कुठेतरी नोंदलेल्या रहाव्यात म्हणून हा लेखन प्रपंच!

प्रामाणिकपणे सांगायचं तर ग्रामिण शैलीत लिहिल्या गेलेल्या, ग्रामिण प्रादेशिक बोली भाषेचा सढळ वापर असलेल्या, ग्रामिण ढंगाची जीवनशैली, विचारसरणी यांचे वर्णन असलेल्या बर्‍याच कादंबर्‍या, पुस्तके, कथा, कविता आजवर वाचनात आल्या. महात्मा फुल्यांपासून शंकर पाटिल, द.मा. मिरासदार, आनंद यादव, रा. रं. बोराडे, व्यंकटेश माडगूळकर, बा.सी. मर्ढेकर, श्री.ना. पेंडसे, ग.त्र्यं. माडखोलकर, र.वा. दिघे, विभावरी शिरूरकर, हमीद दलवाई, ना.धों. महानोर अशी अनेक नावे घेता येतील. ही मला जशी आठवली तशी नावे आहेत. अजूनही अश्या अनेक साहित्यिकांनी महाराष्ट्रातील कोकणापासून विदर्भापर्यंतची ग्रामिण संस्कृती आपल्या साहित्यातून अत्यंत प्रभावीपणे सर्वांसमोर आणली. बहिणाबाई चौधरींनी आपल्या साध्या सरळ भाबड्या शब्दांत गावाकडच्या मातीतलं अस्सल तत्त्वचिंतन कवितांतून अजरामर करून ठेवलं. मराठीला उज्ज्वल समृद्ध तत्वद्न्यानाचा वारसा बहाल केलेल्या आपल्या संतांनीही ही ग्रामिण संस्कृती त्यांच्या साहित्यातून निरनिराळ्या पद्धतीनं नोंदवून ठेवली. ग्रामिण जीवन आणि त्यातही मुख्यत्त्वाने ग्रामिण ’स्त्री’जीवनाचेही चित्रण आजवर असंख्य साहित्यकृतीतून प्रभावीपणे झालेले आहेच. यात भामचंद्र नेमाडेंचे ’हिंदू’ सुद्धा यात गणले गेलेच पाहिजे! माझी वाचनसीमा त्यामानाने फारच तोकडी आहे... पण तरीही थोडे धाडस करून म्हणावेसे वाटते की उध्दव शेळके लिखित ’धग’ ही कादंबरी ग्रामिण जीवनावर आधारीत आणि त्यातही ’स्त्री’ ही केंद्रस्थानी असलेली माझ्या वाचनात आलेली आजवरची अत्यंत श्रेष्ठ कादंबरी आहे!

कादंबरीच्या कथेबद्दल मी काही बोलणार सांगणार नाही. त्याची गरजही मला वाटत नाही. 1960 साली पहिल्यांदा प्रसिद्ध झालेली कादंबरी मराठी साहित्यात प्रचंड गाजली! या कादंबरीतला संवादांचा अस्सल ’वर्‍हाडी’ बाज पहिल्यांदा समजायला जरा अवघड होतो... पण नंतर सहज समजू लगतो... त्याही नंतर आवडू लागतो... भाषेचे माधुर्य आणि रांगडेपणा एकत्र मिळून आपल्यावर प्रभाव पाडतात आनि खिळवूनही ठेवतात आणि अखेरला आपण त्या भाषेच्या, त्या लहेजाच्या, चक्क प्रेमातही पडतो! माझ्यासारख्या पहिल्यापासून शहरी वातावरणात राहिल्या, वाढलेल्या व्यक्तीला ती वेगळ्याच पातळीवर नांदणारी दु:खं आपलीशी वाटतात! स्वत: भोगल्यागत त्रास देतात. ’कॅथार्सिस’ चा अनुभव देतात. वर्हाडी बोली काय कोंकणी बोली काय पुणेरी-नागपुरी-बंबैय्या बोली काय.... दु:ख, नैराश्य, एकलेपणाची बोली एकच --- हे नव्यानं जाणवून देतं ’धग’!

ढोबळपणेच सांगते की ’धग’ ही गोष्ट आहे एका ’स्त्री’ची... जी अगदी तिच्या अंताला एका ’पुरुषा’पाशी येऊन संपते. संपत नाही खरंतर... नव्यानं नव्या आरंभासह, नव्या कॅन्व्हासवर पण त्याच त्या प्राचिन अर्वाचिन दु:खातून नव्यानं सुरू होते... आकार घेते. तो पुरुषही कोण? .... तो तिनं घडवलेला. तिच्यातूनच निर्माण झालेला आणि ती ज्या आगीतून आयुष्यभर चालत राहीली त्या आगीची धग फार जवळून पाहीलेला, सोसलेला, ’तो’ - तिची गोष्ट किमान अर्धवट का होईना... जगलेला! आणि तिच्यासोबत कण कण मरताना तिच्यातलीच चिव॒ट आशा तेवढी स्वत:त बाणून तिच्याकडूनच रक्तात उतरलेल्या जिद्दिनं आणि हट्टानं जगण्याची गोष्ट पुढं रेटत नेणारा ’तो’! शेवटापाशी किंचित धबकल्यागत वाटूत जातं की कथा खरंतर तिची होती की त्याची? पण पुस्तक बंद केल्यावर काही क्षणांतच लक्षात येतं की सार्‍या कथेत ’ती’च होती... असते.... आणि राहते... ’नायिका’!

त्या स्त्रीचं नाव आहे ’कौतिक’! - हे नाव फारच कल्पक वाटलं मला! जगण्याच्या सगळ्या धडपडीतून धाडसानं, लवचिकतेनं वाट काढत खंबीरपणे नेटाने हट्टाने जगत राहणारी ’कौतिक’ - नावाप्रमाणे विश्वातल्या सार्‍याच्या सार्‍या कौतुकाला पात्र - मात्र उभ्या प्रत्यक्ष आयुष्यात कौतुकाचा एकही शब्दही न मिळालेली, त्याची आसही नसणारी आणि फिकीरही न बाळगणारी कौतिक! ’धग’ च्या नायिकेला याहून उत्तम नाव असूच शकलं नसतं कदाचित.

कौतिक काही इतर बायांपेक्षा वेगळी नाही. चारचौघिंसारखीच एक साधारण बाई जी आपल्या ’प्रस्थापित’ नवर्‍याची कुठल्याही परिस्थितीत नेटानं साथ देते, त्याला मोडू देत नाही... हरू देत नाही. संसारासाठी ती वाट्टेल त्या थराला जाऊन राबते, कष्ट करते. घरादाराला ह्ट्टानं घट्ट बांधून ठेऊ बघते. मुलांसाठी तळमळते, त्यांनी नीट चांगले व्यवस्थित आयुष्य जगावं म्हणून धडपडते, त्यांना चुकीच्या मार्गानं जाताना माहून तीळ तीळ तुटते, हळहळते... पण आतून फुटणारा तिच्या मायेचा नैसर्गिक झराही एका टोकाच्या क्षणी तिला संबंध तोडण्यापासून रोखत नाही... असं दाखवते... धैर्यानं!

कौतिक एक आपल्या आजूबाजूला गावा-शहरा-खेड्यांतूनही अजूनही सामान्यपणे आढळणारी एक बायको आहे. आई आहे. शेतमजूर आहे. शेजारीण आहे. मैत्रिण आहे! नीट विचार केला तर ती मुळीच कुणीही विशेष नाही! ती अगदी सामान्य आहे! .... आणि माझ्यामते, हे मुळीच विशेष नसणंच आपल्याला कादंबरी वाचता वाचता फार प्रखरपणे बोचत, टोचत, कातरत जातं. जखमा करत जातं. आपल्या आजूबाजू्ला अश्या असंख्य ’कौतिक’ रोजच्या रोज प्रचंड अटितटीची निकराची नित्याच्या जगण्याची लढाई आत्ता या क्षणीही ए्कट्यानं लढत असतील - ही जाणीव मनाला हादरा देते. अश्या काही आपल्याही आयुष्यात असलेल्या, येऊन गेलेल्या, येऊ घातलेल्या अन् अगदी आपल्यातही दडलेल्या ’कौतिक’ शी वाचता वाचता आपण रिलेट करत जातो आणि कधी शरमतो, कधी भांबावतो, कधी दुखावतो, कधी अभिमानानं फुलतो तर कधी मनापासून रडतोही! कौतिकला कुशीत घ्यावे वाटते. कुरुवाळावेसे वाटते, तिला घट्ट मिठी मारावी वाटते आणि काही सेकंद थांबून खरोखर तिचं मनाच्या गाभ्यातून ’कौतूक’ करावंसं वाटतं! ..... मला वाटतं सर्वसामान्य ’कौतिक’ला असामान्य बनवतं ते हे! बाकी काही नाही.

माझ्यापेक्षा खरंतर फारच वेगळ्या प्रतलावर वावरणारी, बावरणारी, सावरणारी कौतिक मला तरिही माझी फार फार जुनी कुणी ओळखिची जीवश्श्च-कंठश्च मैत्रिण वाटते आणि तिला तिच्या कठीण काळात साथ देऊ न शकल्याची रुखरुख ती माझ्या मनात ठेऊन जाते!
मी तिथं त्या प्रसंगी तिच्याजागी असते तर... गोष्ट कित्येकदा त्याच जागी संपलीही असती! कदाचित्! -

हे हेलपाटायला लावणारं वास्तव बाजूला सारून तिच्यासह माझंही मला कौतिक करावं वाटतं!!! हे कौतिक असतं माणूसपणाचं, बाईपणाचं, जगण्याचं!!

अजूनही ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी हा दु:खाचा सोहळा याचि देही याची डोळा एकदा तरी अनुभवावा. जगण्याच्या शर्यतीत थोडं थांबावं. जगण्याचं ’कौतिक’ करावं. त्यांच्या यांच्या आमच्या तुमच्या माझ्या त्याच्या हरल्याच्या, जिंकल्याच्या, लढल्याच्या, डरल्याच्या, मोडल्याच्या, उत्क्रांत झालेल्याच्या.... सार्‍यांच्याच आयुष्यांचं ’कौतिक’ व्हावं! कादंबरी वाचून संपते तेंव्हा डोळ्यात पाणी असतं. आतून उमटलेली एक प्रामाणिक कणव असते त्या पाण्यात. आपलं अस्सल माणूसपण जागं करण्याची संधी हे पुस्तक आपल्याला देऊन जातं!

अवांतर - ’बालभारती’च्या मला वाटतं नववीच्या पाठ्यपुस्तकात उद्धव शेळकेंचा ’धग’ हा धडा मला होता. या संपूर्ण कादंबरीतला सर्वोच्च कळस म्हणता येईल असा आर्त आणि जीवघेणा प्रसंग त्या धड्यात उचलेलेला होता. त्या धड्यानं त्याही काळी माझ्या मनाला दिलेला चटका अजूनही विसरता विसरत नाही! आणि आज इतक्या वर्षांनी हाती लागलेली संपूर्ण कादंबरी स्मरणात कायमची कोरली गेली. बालभारतीच्या त्याकाळच्या साहित्य निवडीचं पुन्हा एकदा ऋण मनात दाटून आलं. आता बहूदा पुढच्या पिढीला तसे भाग्य लाभणार नाही. गाळून निवडून ’सोयीचा’ अभ्यासक्रम मुलांपर्यंत पोहोचवला जाण्याचा जमाना येतो आहे... त्यामानानं आपलं लहानपण समृद्ध करणारी ’बालभारती’ म्हणजे सुर्णयोगच होता असं म्हणावं लागेल. असो!

-मुग्धमानसी

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय . आवडली पुस्तक ओळख आणि वाचून झाल्यावर मनात उमटलेले तरंग.
अजून वाचलेलं नाहीये. अभ्यासक्रमात होतं हे ही आठवत नाहीये. आता मिळवून वाचेन.
ग्रुप 'वाचू आंनदे' निवडाल का कथा /कादंबरी ऐवजी?