जीवनाला फुलायचं असतं
आनंद झुल्यावर झुलायचं असतं
फुलताना फुलाला जसे काटे टोचतात
वा-याच्या मंद झुळकी तशा फुंकरही घालतात
आला जन्म काट्याचा, उगा धूर काढू नये
फुल होऊन दरवळायचं स्वप्न कधी सोडू नये
झोपाळा म्हटलं की वर खाली होणार
जगताना गोल गोल चक्करही येणार
थोडावेळ घट्ट डोळे मिटुन बसा
पोटात गोळा आला खो खो हसा
उगाच कोडी गणिती आयुष्याची मांडू नये
कोंबडी आधी का अंड म्हणत भांडू नये
तर्काचा किस पाडला तर गरगरेल
असं का तसं का म्हणेपर्यंत आयुष्य सरेल
© दत्तात्रय साळुंके
येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो
दैवाच्या खेळात कुणीच पारखा नसतो.
रात्र होता चांदण्यांची भेट होते
कधी - कधी अंधाराची वाट येते
म्हणून नसत थांबायचं
आपलं आपण चालायचं.
टोचता काटे वेदना होतात ना?
पण काट्यातसुद्धा फुलं फुलतात ना?
फुलासारखं फुललं पाहिजे
वादळ सोसून जगलं पाहिजे
कधीतरी दाटून येणार दुःखाचं धुकं
कधीतरी पेटून उठणार पोटातली भूक
म्हणून नसतं खचायचं
आपण आपलं चालायचं.
सुदूर तार्याच्या गर्भीचे
ऊर्जा वादळ लवथवणारे
उधळून देते विस्फोटातून
विकीरणांचे पिसाट वारे
दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
निराकार, निर्मम, नि:संगी
स्थळकाळाचे चित्र रेखिते
आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
क्षुद्रत्वाचे भव्यत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते
कालौघाचा अदम्य रेटा
थोपविण्याचे प्रयत्न माझे
थिटेच ठरती, रोमरोमी पण
कालजयाचा पडघम वाजे
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.
बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फूललेली ही फुले केसात तू माळून जा.
माळता केसात सुमने गगन हे गंधाळले
गंध केसातील सारा या इथे उधळून जा.
एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये
एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.
पुसटश्या पायवाटी
सांजवेळी येता कोणी
पाचोळ्याच्या आवाजाने
हले खोल काळे पाणी
डोकावून कळेल का?
काळोखाची खरी मिती
सावल्यांच्या मागेपुढे
गूढ पेरलेली भीती
रेंगाळून जड वारा
जाणिवांच्या काठावर
हळूहळू पोखरतो
मनातले तळघर
भयानक अशी वेळ
नाही दिस नाही रात्र
गळतात पानांसंगे
थकलेली गात्र गात्र
येती आणि हरवती
इथे पावलांचे ठसे
लुप्त झाले डोहात या
जाणे किती कवडसे
द्वैत
फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी
टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी.
जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती
किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती
फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी.
किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता
कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता
पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी.
देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान
असे उठले होते वादळ उजाड हा माळरान
सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.
ऐकते तुझी कविता कोणीही नसतांना
छळते मला ते शब्द एकांत असतांना
घाव घालते तुझे शब्द काळजावर
जेव्हा जेव्हा तुझी कविता वाचतांना
किती लिहिशील माझ्यावर आता
स्वतःवर कधी कधी लिहीतांना
एकांत तुझ्या लेखणीतले सांग मला
खुपते मला मी आनंदाने वागतांना
शब्दा शब्दांचे थांबव खेळ आता
सहन होत नाही तुला वेदना होतांना
असाह्य होत आहे मनातल्या जखमा
अश्या कागदी तुकड्यावर मांडतांना
असे सुवासिक शब्द गुंफले तू ओळीत
जसे माझ्या केसांत मोगरा माळतांना
कशाला करतो फुलासम शब्दांची उधळण
अजूनही टोचतात काटे पायी चालतांना
मीच माझा सखे
राहिलो ना आता
चंद्र ता-यांतही
शोधतो मी तुला
त्या तिथे दुरवर
त्या आभाळाकडे
सात रंगांसवे
मागतो मी तुला
रेशमी भास हे
रेशमी चाहुली
बावरी प्रीत ही
बावरे गीत ही
रास रंगात या
जाणिवा गोठल्या
अन् मनाला अशी
लागली आस ही
सावल्या या खुळ्या
गुज हे सांगती
मोकळी वाट ही
चिंब ओलावली
नाव ही कोणती
त्या किना-यावरी
शिरशिरी येऊनी
तीही धुंदावली.....
Prathamesh
लाखाच्या या मता आला शंभराचा भाव
भूलथापा... हव्यासानं लुटला हा गाव.
कुणी म्हणे देतो वोट
द्यावी एक नोट
कुणी इथं दारूसाठी
फिरे पाठी पाठी
इमान हे होई थिटे जिथे वसे हाव
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.
आपलीच भरी झोळी
खुंटला विकास
अंधाराचं राज आलं
लोपला प्रकाश
हपापल्या वादळाने गिळली हि नाव.
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.
सत्तेची ही चढे नशा
उफाळला माज
गावच्या या डोईवर
विनाशाचा ताज
विकासाच्या मुळावर घालुनिया घाव
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.