येणारा प्रत्येक दिवस...

Submitted by deepak_pawar on 19 November, 2022 - 04:25

येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो
दैवाच्या खेळात कुणीच पारखा नसतो.

रात्र होता चांदण्यांची भेट होते
कधी - कधी अंधाराची वाट येते
म्हणून नसत थांबायचं
आपलं आपण चालायचं.

टोचता काटे वेदना होतात ना?
पण काट्यातसुद्धा फुलं फुलतात ना?
फुलासारखं फुललं पाहिजे
वादळ सोसून जगलं पाहिजे

कधीतरी दाटून येणार दुःखाचं धुकं
कधीतरी पेटून उठणार पोटातली भूक
म्हणून नसतं खचायचं
आपण आपलं चालायचं.

सुखाची किरणं तेव्हा सुद्धा उगवू लागतील
दुःखाचं धुकं हळूहळू उसवू लागतील
शेतातून उगवू लागतील धान्यांची कणसं
पोटभर जेऊ लागतील भुकेली माणसं.

सारं काही असतं आयुष्यात घडायचं
आपण मात्र पाखरासारखं उंच उंच उडायचं.
कधी कधी आपण आभाळाला शिवणार
कधीतरी आपण जमिनीवर पडणार.

जीवन म्हटलं म्हणजे असंच होणार
सुख येणार दुःख जाणार, दुःख येणार सुख जाणार.

एक मात्र करायचं
माणूस बनून जगायचं.

कारण...
येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो
दैवाच्या खेळात कुणीच पारखा नसतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users