हिरवी बाजीगरी
हिरवी बाजीगरी
पाऊस सरता ऊन्हे कोवळी रेशीम धाग्यांपरी
दंवबिंदूंची झालर उमटे हिरव्या पात्यांवरी
नेत्रसुखद रंगांची उधळण कडे पठारांवरी
भिरभिरणारी अातषबाजी चित्र करी साजिरी
शीळ मधुर पक्ष्याची अलगद येता कानांवरी
सुंदरतेला नाद लाभला दूर दूर अंबरी
वाटा भिजल्या, हिरव्यारंगी कातळही गहिवरी
मुक्त मनाने श्रावण परते काळजात हुरहुरी
हिरव्यारंगी रंगवूनी मन देत उभारी खरी
सतेज करते पुन्हा सृष्टीला हिरवी बाजीगरी