मित्रहो! गेले काही दिवस एका प्रश्नाने मनात घर केले आहे.मी हा प्रश्न बर्याच जणांना विचारला पण पटेलसे उत्तर कुठेच मिळाले नाही.
वरच्या फोटोत दिसणार्या व्यक्ती श्री रतन टाटा आणि श्री मुकेश अंबानी हे भारतातील अब्जाधीश उद्योगपती आहेत.फोटोत ते तिरुपतीच्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी आल्याचे दिसत आहे.निदान ते मंदिर प्रांगणात आहेत इतके तरी नक्कीच.
तर प्रश्न असा आहे की हे दोघे अब्जाधीश पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? (मंदिर कोणत्या देवाचं आहे हा प्रश्न इथे महत्वाचा नाहीये.ते कोणत्याही देवाच्या मांदिरात गेले तरी फरक पडत नाही.)
मध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.
काल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का?
स्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.
मोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.