नकोसा पाऊस
वेळी अवेळी पाऊस
जरी कोसळे मनात
काय अंकुरावे तेथ
सारी उलथापालथ
वीज लकाकत जाते
उठे नको तो थरार
मेघ दणाणून कानी
दडे खोलवर पार
होता थेंबांचा जोजार
किती लपवावे आत
ओलावाच नुरताना
कासाविसी धुमसत
काय म्हणावे भोगाला
अकाळीच बरसात
डोळा लागू देत धारा
वाहू देत घुसमट
दैनंदिन जीवनात (नेहमीचे +आभासी )वावरताना अनेकदा एखादा प्रसंग अथवा एखादी व्यक्ती आपल्याला त्रासदायक ठरते. होणारा त्रास / त्रागा त्याठिकाणी व्यक्त होऊ शकत नाही. ती घुसमट व्यक्त होण्यासाठी हे वाहते पान.
घुसमट...घुसमट...
काय असते हि घुसमट?का असते?
मला नेहमी असं वाटत की हिला आपण नेहमी अपयशाच्या आणि नैराश्याच्या कुशीमध्येच झुलताना का पाहतो?
आतल्या आत श्वास चालू असताना गुदमरण असत ते म्हणजेच ही घुसमट!!
ह्यामुळेच माणूस निराश होतो.खचतो.आत्मविश्वास ढळतो आणि मग आत्मसन्मान गमावतो.स्वतःच्या नजरेत पडतो.आरशातले स्वतःचे प्रतिबिंब ढगाळलेल्या आभाळासारखे भासत असते. स्वतःचे शब्द जड होऊ लागतात आणि विचार मेंदूला काट्यासारखेच टोचत असतात...
इतकं सगळं होत असत,ह्या घुसमटीमुळे!
ह्या..ह्या..ह्या घुसमटीमुळे!!!
कधी कधी काहीच सुचेनासं होतं हल्ली.…
भावनांचा कल्लोळ अन
शब्दांची घुसमट असह्य होते...
खोटया संवेदनांच्या लख्ख प्रकाशाने
होरपळणाऱ्या मनाला संवेदनाहीन अंधाराची ओढ लागते....
मग वाटतं बंद करून टाकावीत मनाची दारं,
अगदी कायमचीच...
श्वासही थांबवावा...
कोंडलेल्या भावना आणि गुदमरलेले शब्द
मोकळे तरी होतील...
कायमचे. ....
मग अगदी सोपं होईल
रित्या मनाची तिरडी बांधणं....
अगदीच सोपं.....
-- मानसी.