वेटोळे
तर मी एकदा असाच चालत होतो, भटकत होतो, दगडधोंडे तुडवत, पायवाट मळवत, तहानभुक भागवत, ऊन्हा-पावसाला भिजवत, अंधाराला कवटाळत, जगत होतो.
माझ्या कपाळी अपयशाचा टिळा लावला होता.
प्रश्न जगण्याचा होता. जगुन जगुन थकण्याचा होता. गुडघे घासून मरण्याचा होता.
तो प्रश्न घेऊन मी आत जंगलात खोलवर गेलो. उंच टेकाडं चढून पाहीली. दलदलीत चिखल माखून घेतला. काटेरी गवतात झोपुन गेलो. झऱ्याच्या पाण्यात गारठून गेलो. हे असह्य झालं.
तुडुंब भरलेली माझी धोपटी रिकामी होत गेली, दुनिया भणंग झाली, मन ऊदास झाले, झाडाझाडांच्या सावलीत, डोंगर दऱ्यांच्या कपारीत, नदीकिनारच्या मातीत, स्वप्ने मरुन गेली.