सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .
सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!
सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .
एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!
८ फेब्रुवारीला दुसरं शतक केल्यानंतर काही दिवसांची गॅप पडली. छोट्या राईडससुद्धा कराव्याशा वाटल्या नाहीत. त्या काळात मला छोट्या पण नियमित राईडसचं महत्त्व माहिती नव्हतं. त्यामुळे विचार करायचो तो मोठ्या राईडसचाच. कित्येक दिवस डे- ड्रिमिंग चालायचं. लवकरच पुढच्या राईडची योजना बनवली. समुद्राचं खूप मोठं आकर्षण मनात आहे. त्यामुळे विचार करतोय की, समुद्र किना-यापर्यंत सायकल चालवेन. पुण्यातून कोंकणातील दिवे आगारपर्यंत जाण्याची योजना बनवली. एकूण प्रवास १६० किलोमीटरचा होईल. आधी १२१ आणि ११२ किलोमीटर चालवल्यामुळे १६० किलोमीटर चालवण्याचा विश्वास वाटत आहे. आणि ह्या राईडमध्ये मी घाट उतरून कोंकणात जाईन. त्यामुळे सुमारे २० किलोमीटरचा उतारही मिळेल. इंटरनेटवरून सगळी माहिती घेऊन तयार झालो.
२३ फेब्रुवारी २०१४. ह्या वेळी पहाटे ५.३० वाजता बाहेर पडून सायकल सुरू केली. पहिल्यांदाच इंडिकेटर लाईटचा वापर करतोय. सायकलवर बाटली ठेवण्यासाठी एक छोटा स्टँडसुद्धा लावला आहे. पहाटेची मस्त थंडी! थोडं अंतर गेल्यावरच बाटली पडली. मग ती सॅकमध्येच ठेवलं. अंधारातच एनएच ४ वर सायकलिंग सुरू केलं. एक इंडिकेटर आणि एक टॉर्च सोबत आहेत. पण लवकरच ते पुरेसे नाहीत, हे कळालं. त्यामुळे सुमारे दिड तास अंधारातच सायकल चालवली. हायवेवर चालवताना अडचण येतेय, पण पुढच्या व मागच्या वाहनांचा प्रकाशही आहे. बारा किलोमीटरनंतर हायवे सोडला तेव्हा अवघड वाटलं. कारण आता प्रकाश अगदी कमी आहे आणि मध्येच वेगात जाणारी वाहनं येत आहेत. त्यामुळे डोळ्यांना दोन क्षण काहीच दिसत नाही. हळु हळु उजाडायला सुरुवात झाली. एक पाचव्या ग्रेडचा घाट अंधारातच पार झाला.
चांगलं उजाडलं तेव्हा बरं वाटलं. धुकं ओढून पहुडलेले डोंगरही दृग्गोचर झाले. अंधारामध्ये मिस झालेला सुंदर नजारा आता दिसायला लागला. इथून पुढे सुंदर नजा-यांची मेजवानी मिळणार! आता पहिले नाश्त्याचं हॉटेल बघायचं आहे. वाटेत हॉटेल अनेक लागत आहेत, पण सकाळचे साडेसातच वाजले आहेत, त्यामुळे ते बंद आहेत. तितक्यात अजून एक चढ लागला. पिरंगुटच्या आधीचा घाट. इथून सिंहगडही दूरवरून दिसतोय. दोन तास झाल्यामुळे आता पाय मोकळे झाले आहेत. त्यामुळे चढावर अडचण आली नाही. दोन तासांमध्ये सुमारे चोवीस किलोमीटर झाले आहेत आणि भरपूर घाम आला आहे. पाणीसुद्धा भरून घ्यायचं आहे. पिरंगुटमध्ये हॉटेल मिळालं. इथे नाश्ता केला आणि लगेच पुढे निघालो.
पिरंगुटनंतर मोठं गाव एकच लागतं- पौड. त्यानंतर पुढे वस्ती विरळ होत जाईल. पिरंगुटनंतर लगेच पुन: एक चढ आला. पण थकलो नसल्यामुळे तो सहज पार झाला. सायकलमधली हवा बहुतेक कमी झाली आहे. पंक्चरची भिती वाटली. पौड हेच ह्या रस्त्यावरचं मोठं गाव. त्यानंतरचं मोठं गाव सुमारे साठ- सत्तर किलोमीटर नंतरच येईल. सुदैवाने इथे एक सायकलचं दुकान मिळालं. दुकान आहे, पण घर उघडं होतं. त्यामुळे पंक्चर चेक करता आलं. पंक्चर नव्हतं, फक्त हवा कमी झाली होती. लगेच पुढे निघालो.
हळु हळु ऊन्हाचा कडाका वाढतोय. फेब्रुवारी महिना म्हणजे 'संधी काल' आहे. पहाटे कडक थंडी असते आणि पूर्ण दिवसभर कडक ऊन. घड्याळाचा काटा पुढे जातोय तसं ऊन वाढत आहे. भरपूर पाणी पिऊनही त्रास कमी होत नाहीय. ह्या रस्त्यावर दुसरी अडचण म्हणजे खाण्याचे पर्याय फार कमी आहेत. गावंही छोटी लागतात. बरंच अंतर पुढे गेल्यावर माले गाव आलं जिथे थोडा नाश्ता मिळाला. आत्तापर्यंत सुमारे साठ किलोमीटर झाले आहेत. थोडा थकवा सुरू झाला आहे. कडक ऊन्हामुळे अजून त्रास होतोय. आता वारंवार थांबावं लागत आहे.
पण नजारे अतिशय सुंदर आहेत! छोटा निर्जन रस्ता, त्याच्याजवळ शेती, डोंगर आणि नदी! मुळा नदी ह्या रस्त्याला समांतर वाहते. मुळशी गावाजवळ असलेलं धरण दिसू लागलं. आता हा रस्ता धरणाला वळसा घालून पुढे जाईल. रस्ता तसा समतलच आहे. मध्ये मध्ये चढ- उतार येतोय. मुळशीनंतर एका जागी तीव्र चढ लागला आणि सायकलची चेन पडली. ह्या चढावर सायकल चालवणं कठिण झालं. चढ फार तीव्र नाही, पण साठपेक्षा जास्त किलोमीटर पूर्ण झाल्यामुळे थकवाही वाढतोय आणि ऊर्जा स्तर कमी होत जातोय. त्यामुळे हा छोटा घाट पायी पायी चढावा लागला. सतत घाम येतोय आणि शरीर थकत आहे. इथून उत्साह कमी व्हायला सुरुवात झाली! पण तरीही पुढे जात राहिलो. ह्या प्रवासाचं गंतव्य स्थान- किना-यावरील दिवे आगारच्या एका रेसॉर्टचा बोर्ड दिसला, त्यामुळे थोडी प्रेरणा मिळाली. एका ठिकाणी लॉरीमध्ये सायकल ठेवून परत जाणारा सायकलिस्टही दिसला.
मुळशीनंतर रस्ता अगदी निर्जन भागातून जातो. ह्या टप्प्यावर मैलाचे दगडही लागत नाहीत. काही वेळ अनिश्चितता वाटली की मी नक्की कुठे आलोय. मोबाईलच्या जीपीएसवर चेक केलं तेव्हा कळालं की, मी ताम्हिणी घाटाच्या जवळ आलोय. अजून थोडंच अंतर आणि मग ताम्हिणी घाट येईल जिथून उतार मिळेल. थांबत थांबत पुढे जात राहिलो. आता सकाळचे अकरा वाजले आहेत. 'फक्त अकरा', पण मी पहाटे साडेपाचपासून सायकलवर असल्यामुळे ते 'अकरा!!' वाटत आहेत. खूप वेळाने ताम्हिणी गाव आलं. पण हे काय! इथे काहीही नाहीय. एक टपरीसारखं हॉटेलही नाहीय. चहासुद्धा नाही! कसंबसं फक्त पाणी मिळालं. आता मनोबल वेगाने कोसळत आहे. त्यातच आणखी एक गोष्ट- अजून उतार आलेलाच नाही. किंबहुना रास्ता हलक्या चढ- उताराचा आहे!
हा टप्पा ह्या राईडमधला सगळ्याट कठिण टप्पा आहे. मैलाचे दगड नेमकी माहिती देत नसल्याने किती पुढे आलोय, हेही नीट कळत नाहीय. शरीरात ऊर्जा झपाट्याने कमी होते आहे. सायकलिंगचा वेगही थोडा कमी झाला आहे. अर्थात् आधीच्या घाटानंतर मोठा चढ लागलेला नाहीय. तसंच जात राहिलो आणि पुढे एक गाव लागलं. इथे स्टोअरसुद्धा आहे. चला, बिस्किट- चिप्स मिळतील. पाणीसुद्धा मिळेल. मोबाईलला नेटवर्क नाहीय, बूथवरून घरी बोललो. फक्त सत्तर किलोमीटरच आलोय, पण वाटतंय असं की, मी खूप दिवसांपासून सायकलिंग करतोय! बिस्किट खात असताना एक बस येऊन थांबली. मनात इच्छा आली की, एक मित्र उतरला तर किती बरं होईल! हळु हळु मन सायकल चालवण्याच्या विपरित होतं आहे- यु टर्न घेण्याकडे वाटचाल करत आहे!
त्या एकाकी गावातून पुढे रस्ता आणखी निर्जन भागात जातोय. इथे जंगलच दिसतं आहे. आता मोठे डोंगर अगदी जवळ आले आहेत. पण हा रस्ता खाली कधी उतरणार? परिसर अतिशय रम्य आहे. माणसाला कितीही गर्व होवो, तो स्वत:ला निसर्गापेक्षा कितीही श्रेष्ठ मानो, निसर्ग इतका विराट आहे कि, मानव त्याच्यापुढे मुंगीइतका क्षुद्र आहे. उंच डोंगर आणि तिथलं जंगल! जंगलासारखा परिसर असल्यामुळे रस्त्यावर माकडंही आहेत. हे सर्व ठीक आहे, पण. . उतार आहे कुठे?
दूरवर हळु हळु डोंगरांची रांग संपताना दिसतेय. नक्कीच पुढे एका बिंदुपाशी डोंगर रांग संपेल आणि तिथून मोठा उतार मिळेल जो सरळ खाली कोंकणात घेऊन जाईल. पण कधी? शरीर झपाट्याने थकत जातंय. एक रस्ता लोणावळाकडे जाणारा मिळाला. थोड्या वेळासाठी वाटलं की, डोंगर रांग संपली आणि आता उतार आलाच. पण नाही. रस्ता अजूनही समतलच आहे. आता कसंबसं स्वत:ला ओढतो आहे. लवकरात लवकर हॉटेल मिळायला हवं नाही तर माझी स्थिती अजून बिकट होईल.
लोणावळाकडे जाणारा रस्ता
बराच वेळ चालत राहिल्यानंतर शेवटी एक हॉटेल मिळालं. चला, उतार तर नाही, पण हॉटेल मिळालं. दुपारचे "फक्त" साडेबारा वाजले आहेत. पण शरीराने आता परतीचा निर्णय घेतला आहे. इथूनच- आदरवाडीमधून- लिफ्ट घेऊन परत फिरावं असं वाटत आहे. आधी काही खातो, मग बघतो. इथे आमलेट मिळालं. बराच वेळ विश्रांती घेतली. नक्की किती अंतर चाललो आहे, हे मॅप बघितल्यावरच कळेल. पण ७५- ८० किलोमीटर नक्की आलो असणार. पण आता पुढे जाण्याचा विचारही करवत नाहीय. दहा- पंधरा किलोमीटर उतार धरला तरी पुढचा रस्ता प्रचंड कठिण जाईल. त्यामुळे इथूनच परत फिरतो. लिफ्टसाठी जीप/ लॉरी असं काही मिळेल. खूप वेळानंतर एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे लवकरच बस जाईल, ही माहिती मिळाली. एकदम बरं वाटलं. अर्थात् मनामध्ये शंकाकुशंका होत्याच की, ती बस इथे थांबेल का? बसचा कंडक्टर सायकल ठेवू देईल. . . ? आदरवाडी गावात हा स्टॉप आहे. तिथेही पायी पायीच गेलो. स्टॉपवर ग्रामस्थ भेटले. बोलून थोडं बरं वाटलं. थोड्या वेळाने बस आली. सायकल वर ठेवताना कंडक्टरने बरीच मदत केली. त्यानेच वर चढून सायकल ठेवली. पण हे सर्व होताना मन खूप नर्वस आहे. परतीचा प्रवास सुरू झाला. पण मन स्वत:ला दोष देतं आहे. अरे रे! "क्या से क्या हो गया!!" कुठे १६० किलोमीटरचं लक्ष्य आणि फक्त ८० किलोमीटरमध्येच माघार!!?? पण जे झालं ते असं. शरीराने आदेश दिला व तो ऐकावा लागला.
तीन छोटे क्लाइंबस
रूट मॅप
नंतर चांदणी चौकात बसमधून सायकल खाली उतरवली. रस्त्यावरच्या एका माणसानेसुद्धा मदत केली. सायकल चढवणं आणि मग उतरवणं कठिण वाटलं. पण झालं एकदाचं. आता इथून बारा किलोमीटर परत सायकल चालवेन. हा शेवटचा टप्पा सोपा गेला. कधी एकदा घरी पोहचतो, असं डेस्परेशन झालं, पण अंतर कमी असल्यामुळे चालवत गेलो. अंधार होण्यापूर्वी घरी पोहचलो. पूर्ण शरीरभर वेदना आणि थकवा आहे. घरातल्या सुरक्षिततेमध्ये पोहचल्यावर आनंद वाटला. बराच वेळ आराम केला. नंतर ह्या प्रवासाचं अंतर बघितलं. तेव्हा कळालं की, मी दुपारी एक वाजायच्या आत ८१ किलोमीटर सायकल चालवली होती. पहाटे साडेपाच पासून साडेसहा- सात तासांमध्ये ८१ किलोमीटर. मध्ये कमीत कमी दिड- दोन तास थांबलो असेन. एव्हरेज स्पीड बारा किलोमीटर आणि मूव्हिंग स्पीड सुमारे पंधरा किलोमीटर असं सायकलिंग झालं. अर्ध्या दिवसात ८१ किलोमीटर अंतर पूर्ण केलं. दिवसाचे किमान पाच- सहा तास बाकी होते. हा विचार केला तर चांगलंच सायकलिंग झालं. आणि शेवटी पुन: बारा किलोमीटर सायकल चालवता आली. म्हणजे एकूण ९३ झाले. १६० चं लक्ष्य होतं, ९३ किलोमीटर चालवू शकलो. अगदीच वाईट नाही. ही एक चमत्कारिक राईड झाली ज्याचा काहीही आगा- पीछा नव्हता. ८ फेब्रुवारीला शतक केल्यानंतर मध्ये एकही राईड न करता थेट २३ फेब्रुवारीची ही राईड! अगदीच वेडेपणा! अर्धशतक आणि शतक तर झाले होते, ह्यावेळी नर्व्हस नाइंटीचासुद्धा आस्वाद घेतला!
पुढील भाग ११: नव्या रस्त्यांवरील राईडस
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
फोटो मस्त !!! छान भटकंती
फोटो मस्त !!!
छान भटकंती झालीये, आणि लेखनातूनही छान उमटली आहे.
मस्त! मालिका छान चाललीय.
मस्त! मालिका छान चाललीय. तुम्हाला शुभेच्छा.:स्मित:
वाचतोय
वाचतोय
भाऊ तुम्ही लाई डेंजर आहात..
भाऊ तुम्ही लाई डेंजर आहात..
वाचनाबद्दल व
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!
मार्गी,तुमचं हे सायकल लिखाण
मार्गी,तुमचं हे सायकल लिखाण अगदी पहिल्या भागापासून वाचतेय मी. अगदी प्रामाणिक लिहीता तुम्ही पण तरीही प्रत्येक भाग वाचल्यावर मला काहीतरी खटकतं. मी सायकलिंग केलेलं नाहीये व अजूनही करत नाही त्या बद्दल काही बोलणंही चुकीचं आहे त्यामुळे इथेच थांबते.
तुमचं हे लिखाण पुर्वीचं आहे पण आता काय आहे परिस्थिती?
आडो ...माझ्याही मनात हेच आलं
आडो ...माझ्याही मनात हेच आलं होतं....
तुमचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, पण सायकलिंग कसे करू नये याचा वास्तुपाठ दिल्यासारखे वाटते कधीकधी.....
चुकांमधूनच ते शिकले असावेत असा अंदाज आहे. पण दैव चांगले की चुका फार महागात पडल्या नाहीत
धन्यवाद आउटडोअर्स जी आणि
धन्यवाद आउटडोअर्स जी आणि आशुचँपजी!
@आउटडोअर्स जी, राईडस जुन्या आहेत. त्यावेळच्या नोंदी, डायरी व फोटोजवरून लिहिलेलं लिखाण मात्र ताजं आहे. आणि जसं सायकलिंग करत गेलो, शिकत गेलो, त्या क्रमाने सर्व लिहिलं आहे. आणि अधून मधून नंतर जे शिकलो त्या संदर्भात रिफ्लेक्शनही आहे. आणि जितक्या चुका करत गेलो, तितकंच शिकतही गेलो. ते नंतर हळु हळु येईलच.
@आशुचँपजी, बरोबर. मी ज्या चुका करत गेलो, सायकलिंग करताना जे सर्व अनुभव आले, ते जसंच्या तसं मांडतोय. त्यामुळे काही गोष्टी कशा चुकीच्या करू नये, हेसुद्धा नक्कीच त्यात येतं आहे! आणि पुढे ब-याच गोष्टी बदलल्या, नवीन गोष्टी समजत गेल्या. ते येईलच. धन्यवाद.
आयला, एकट्याने ताम्हीणी
आयला, एकट्याने ताम्हीणी रस्त्याला जायचा बेत ? .... बापरे. तो घाट फसवा आहे. इतर घाटांसारखा वर चढलो, अन मग उतार सुरू असे नाहीये. शिवाय निर्जन. मला नै बोवा असे डेअरिंग जमणार...
तरी बर, तुम्हाला परतीकरता बस मिळाली.
आऊटडोअर्स, नॉर्मली काय होते, की माणूस आपल्या "यशाच्या" बाबी तितक्याच लोकांसमोर मांडतो, व सगळे असे गुडी गुडी वाचायची/ऐकायची आपल्याला सवय लागलेली असते. पण या यशाला तितक्याच अपयशाच्या/अपेक्षाभंगाच्या काळ्या किनारीही असतात, हे आपल्या गावीही नसते कारण ते सांगायची "पद्धतच" नाही. इथे मात्र लेखक, जे झाले तसे मांडतो आहे. त्यामुळेच कदाचित काहीतरी खटकल्यासारखे वाटणे साहजिक आहे.
लक्षात घ्या, की पीटी उषा हे नाव तिच्या "पळणे" या कौशल्याकरता परिचित आहे, पण सर्वात प्रथम ती पाउल टाकायला शिकली असेल, धडपडली असेल, ठेचकाळली असेल, दमली असेल, तर त्याचे वर्णन कुठे आल आहे?
हीच बाब ऐतिहासिक व्यक्तिरेखांबद्दलही, त्यांच्या केवळ यशस्वी पराक्रमांच्या कथा तेव्हड्या ऐकायला मिळतात, जसे की शिवाजी राजांनी उंचनिंच अफजलखानाचा कोथळा काढला, अरे हो, पण त्या आधी त्यांनी काहीच परिश्रम/सराव्/व्यायाम केला नसेल? त्याचे वर्णन आम्हाला माहितच नसते.
हीच बाब यशस्वी करोडपति उद्योगपतिंबाबत... आजचे यश तेव्हडे वर्णन करकरुन स्तुतिसुमने उधळून सांगितली /ऐकली/चर्वित्चरण केली जातात पण या पायरीपर्यंत पोहोचायचे आधी किती कष्ट, शारिरीक/मानसिक/ किती धोरणिपणा, किती एकाग्रता, किती ध्येयासक्ति (डिटर्मिनेशन? ) भोगावी लागली याची वर्णने कुठे असतात?
त्यामुळे होते काय की यशस्वी व्यक्ति "आभाळातुन रेडीमेड" पडत असते असे काहीसे भासु लागते.
अन कुठे वास्तवाशी संबंधित मजकुर्/वर्णन आले तर आम्हांस (माझ्यासहित) ते खटकु लागते.
कारण आमची मानसिकताच अशी बनली आहे की "वास्तव कटु सत्य" आम्ही पचवुच शकत नाही, इतकेच नव्हे, तर कोणत्याही प्रकारच्या यशामागे असलेल्या परिश्रम/ पुन्हा पुन्हा फसणारे प्रयत्न / अभ्यास यांची जाणिव/शिकवण आम्हांस नसते. आमच्या शिक्षण पद्धतीमधे ती नाही, आमच्या अनुभवातही, "पुढच्यास ठेच तर मागचा तरी शहाणा व्हावा" या हेतुन स्वतःचे अपयश उघड करुन सांगणारा कोणीच भेटत नाही. . किंबहुना, आमची प्रत्येकाचीच स्वतःचे अपयश झाकुन ठेवुन "यश तितकेच" उघड करण्याकडे प्रवृत्ती असते. मानवी स्वभाव आहे हा.
असो.
सहज सुचले म्हणुन मांडले इतकेच. चू.भु.द्या.घ्या....
मार्गी छान लिहिताय!
मार्गी छान लिहिताय!