गोत्र माझे भागवत
गोत्र माझे भागवत
आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला
दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास
भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश
तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून
विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात
वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....