काही स्वयंसेवी (हौशी) लोकांच्या ग्रूप सोबत आदिवासी एरियात जाण्याचे योजले आहे. एक प्रयोग म्हणून आणि एक इच्छा म्हणूनही. अजून बरेच हेतू आहेत जे मलाही माहीत नाही. पण मला जायचे आहे म्हणून केवळ मी जाणार आहे.
तर... तिथल्या आदिवासी बायकांनी मला जे काही शिकवायचे आहे ते त्या शिकवतीलच... आणि माझ्या अल्प बुद्धिला ते झेपावे अशी अपेक्षा आहेच. पण एवढ्या लांब जाऊन आपणही त्यांना काही बुद्धिचातुर्याच्या गोष्टी सांगून ’प्रवाहात’ वगैरे आणायचे करावे अशी त्या ग्रूपची इच्छा दिसते आहे. त्या दिशेने विचार करता फार गहन प्रश्न समोर ठाकले. त्यांची उत्तरे तुम्हा सर्वांच्या मदतीने मिळाली तर बरे होईल.
तरी मी काही सगळंच सांगत नाही तुला.
कितीही बोललो आपण तरी...
काही थोडं उरतंच!
काही मुद्दाम राखलेलं,
काही नकळत राहिलेलं,
काही 'यात काय सांगायचंय'
अन काही 'हे नकोच!'
.....असं चाललेलं.
या न बोललेल्याचं कोवळं धुकं
तू नसतानाच्या लांबलचक संध्याकाळी
सावळे ओले बाष्प होऊन
नजरेवर बसतं
थोड्याची अल्लाद वाफ होते.
थोड्याचे टपटप थेंब
तळाशी साठून
एक गढूळलंसं तळं होतं!
मग कुठल्याश्या उन्हाळ्यात
त्याचीही वाफ होऊन
तुझ्या- माझ्या आकाशात ते निरर्थ तरंगत राहतं.
बडी धीरे जली रैना.... धुआं धुआं नैना....
"माझं लेखन एका आरशासारखं आहे. आता तुमचाच चेहरा विद्रूप असेल आणि तुम्ही आरशाला दोष द्याल तर..... मी काय करू शकतो?"
...........
काला रे... सैंय्या काला रे...
तन काला रे... मन काला रे...
काली जबां की काली गारी..
काले दिन की काली शामें
सैंय्या करते जी कोल बजारी....
तुम्हाला माहितेय नैराश्य म्हणजे काय असतं? म्हणजे ते हवं ते काम हवं तसं न झाल्याने येणारं तात्कालिक नैराश्य नाही बरंका.... तिन्ही त्रिकाळ वळवळत्या असंख्य गांडूळांसारखं तुमच्या अंतर्ममनात सतत हुळहुळत पसरत रांगत जाणारं नैराश्य. कण कण तुमच्या आत झिरपत तुम्हाला भुसभुशित करणारं नैराश्य. थोड्याश्या खतपाण्यानं स्वत:ची संख्या दुप्पट करणारी ही गांडूळं आपल्या आत सतत अगदी प्रत्येक क्षणी हसता रडता, उठता बसता, येता जाता, असता नसता तुमच्या अस्तित्वाचं अविभाज्य अंगं असल्यागत वळवळत राहिलेली अनुभवलीये कधी? अगदी सुखाच्या परमोच्च क्षणीदेखील ती तुम्हाला काहीच साजरं करू देत नाहीत.
कधी कधी आपण एकटेच घराबाहेर पडतो फ़िरायला. मॉर्निंग वॉक म्हणा किंवा पायी नुस्तीच चक्कर मारायला. एखाद्या निवांत शांत ठिकाणी! तिथे आपल्यासारखेच अनेक जण पाय मोकळे करत असतात. आपण फ़िरत असताना आपल्या पुढून येऊन मागे जाणारे किंवा मागून येऊन पुढे जाणारे अनेक जण आपण तिथे नसल्याचप्रमाणे आपापल्या सोबत्यांशी चाललेल्या गप्पांमध्ये रंगून गेलेले असतात. आपल्याला चालता चालता अश्या आत्ममग्न गप्पांचे अनेक छोटे-मोठे तुकडे ऐकू येतात. मुद्दाम कान देऊन ऐकलं नाही तरी काही वाक्यं, काही शब्द, काही प्रश्न, काही उसासे... आपसुक येऊन कानावर पडतात. कधी आपल्याला खुद्कन् हसू येतं तर कधी अगदिच "कैच्याकै" वाटतं.
तो वेडा होता. सगळे तसंच म्हणायचे.
वेडाच असणार. कारण त्याचे कपडे मळलेले असायचे. फाटलेले सुद्धा.
त्याची दाढी राठ वाढलेली आणि केस सुद्धा लांब आणि राठ. आंघोळ नसणारच करत कधी.
शहाणी माणसं असं थोडीच राहतात? छान छान कपडे घालून, पावडर लावून शाळेत जातात, ऑफिसला जातात...
तो मात्र कुठेच जायचा नाही. तिथंच असायचा. एका कडेला. दोन रस्ते मिळतात तिथंच. फाट्यावर.
त्यानं कुठून कुठून जमा केलेल्या फाटक्या तुटक्या उशा, चादरी, तक्के... त्याची त्यानं त्याच्यापुरती एक छान बैठक तयार केली होती.
तिच्यावर तो दिवसभर बसून असायचा. राजासारखा! मला तर ते त्याचं सिंहासन वाटायचं!
ही अशी उदासिन मध्यंतरं यापुढे टाळुयात आपण!
वेळ खुप कमी आहे आणि करण्यासारखं, भोगण्यासारखं खुप जास्त!
माझ्या असण्या-नसण्यावर तुझ्या विचारांची प्रक्रीया अवलंबुन नाही. तुझ्या डोक्यातली विचारांची प्रयोगशाळा अशीच निरंतर कार्यरत राहणार. माझ्या नसण्याने किंवा गप्प असण्याने ती काही थांबणार नाही.
पण विचार म्हणजे पाणी....! विश्वाचा फेरा केला तरी पाणी शेवटी पाण्याकडेच परततं... आणि जन्माला येण्यारा प्रत्येक विचारही अंती एका विचाराशीच जाऊन मिळतो! दरम्यानचे सगळे उतार, कडेलोट, खळगे, बांध, बाष्पीभवनं, कोसळणं, मुरणं वगैरे वगैरे... फक्त एक प्रवास! पाण्यापासून पाण्याकडे.... विचारांपासून विचारांकडे!
कैच्याकै आहे सगळंच.
फुलं, पानं, फांद्या, रस्ते, घरं.... सगळंच कसं दमट, ओलसर...
सादळलेला एक-एक अणू, अन् प्रत्येक काच थोडी धुसर!
हवा कोंदट, माती भिजकट, वारा हलकट!
मृद्गंध अगदिच बिचारा वगैरे... दबकून लपलेला मातीच्याच श्वासांत...
अन् त्यावर वरचढ झालेला आंबट कचर्यााचा वास कुजकट!
कणाकणात... क्षणाक्षणात... बाहेर आणि आतही...
उगाच भरून राहिलाय तो केंव्हाचा.
अधांतरी तरंगतो आहे. बरसत नाही. झिरपत नाही.
सगळ्याच नियमांना कंटाळल्यासारखा... स्वत:लाच वैतागल्यासारखा...
प्रवाहीपणाचं एकूणच गृहीतक चक्क चक्क फेटाळल्यासारखा...
उदास असल्यासारखा अन् तेही मान्य असल्यासारखा!
तो साचून राहिला आहे.