"माझ्या मर्यादा समजून घे..." - तू म्हणालास... आणि बास!
माझ्या सगळ्याच प्रश्नांना तू तुझ्या मते उत्तर दिलेलं होतंस.
ते प्रश्न तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच.
खरंतर बरं झालं. तसंही ते प्रश्न तुझ्यापर्यंत पोचण्याची शक्यता नव्हतीच.
ते ओठांतून निघाले अन् हवेत विरून गेले. डोळ्यांतून निसटले अन् मातीत मिसळून गेले. स्पर्शातून झरले अन् भलत्याच आगीत जळून खाक झाले.....!
सगळेच या पाच भूतांनी मिळून गिळून टाकायचे आहे म्हणा... पण माझ्याच शब्दांनी माझ्याशी असे वागावे?
असो.
तुझ्या मर्यादा!
ती जाते तेंव्हा मागे काय रहातं?
ती जाते तेंव्हा... निश्चल होऊन थिजून रहातो चार भिंतींत गुदमरलेला तिचा वावर...
घुसमटलेला... तरिही दरवळणारा... चुरगाळल्यावर सुगंध देणार्या बकुळीच्या फुलांसारखा.
दरवाजांच्या, कपाटांच्या मुठींना चिकटून बसलेले तिचे काही ओले-सुके स्पर्श किलकिल्या केविलवाण्या नजरेने तिला शोधत रहातात.
भांड्य़ांना, डब्यांना वाट्या-चमच्यांना मिठी मारुन बसलेला तिचा तिखटामिठाचा आंबटगोड दरवळ... स्वतःलाच हूंगत माग काढत रहातो तिच्या हरवलेल्या अस्तित्वाचा.
उंबर्यावरल्या रांगोळीची पांढरी रेघन्-रेघ आतूरल्या नजेरेने तिच्या वाटेकडे पहात रहाते... तुळस भरल्या घरी मावळून जाते...