सहज काहितरी

लॉंग ड्राईव्ह

Submitted by मुग्धमानसी on 9 May, 2013 - 03:59

तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
रस्त्यावरती एकाचवेळी धावत असतं बरंच काही...
एक गाडी, चार चाकं, दोन मनं...
एक नशिब, लक्षावधी विचार अन्... काही अल्वार स्वप्नं...

तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
स्टिअरिंग व्हीलवर आवळलेली त्याची दणकट मूठ
आव्हान देतेसे वाटते समोर पसरलेल्या सगळ्याच वाटांना...
आणि उघड्या खिडकिच्या कडेवर विसावलेली तिची नाजूक बोटं
भूल घालत रहातात त्याच्या आकाशभर पसरू पहाणार्‍या वितभर कर्तृत्वाला

मध्येच पहातो तो तिच्या डोळ्यांत... शोधतो काहितरी... त्याला हवंसं...
पण तिची नजर लांब आभाळात... शोधत असते काही नवंसं...

शब्दखुणा: 

अव्यक्त...

Submitted by मुग्धमानसी on 21 March, 2013 - 02:38

रुमचा दरवाज धाडकन् उघडून स्नेहा आत शिरली अन् रुममधली भयाण शांतता तिच्यातल्या मुर्तिमंत कल्लोळाला भेटून क्षणभर भांबावून गेली! उघड्या दारात तीही क्षणभर थबकलीच. अशी शांतता तशी तिला काही नवीन नव्हती. पण तरिही ती थबकायचीच! आणि तोही. बिछान्यावर पडल्यापडल्याच सागरनेही किंचित दचकून तिच्याकडे पाहिले. पण क्षणभरातच सगळं स्थिरावलं. रूमचं दार लावून ती आत शिरली आणि पर्स तिथल्या टेबलवर फेकून बाथरूममध्ये गेली. सागरची नजर पुन्हा भिंतीवरल्या टिव्हीत गुंतली. कुणीतरी टकल्या आकड्यांच्या भाषेत बोलत होता... स्टॉक मार्केट, शेरर्स वगैरे वगैरे.... भयाण.... खरंच भयाण!

निरोप...

Submitted by मुग्धमानसी on 12 February, 2013 - 02:07

तुझा निरोप आला तेंव्हा मी पावसात चिंब भिजलेले होते!
तसेच ओलेते कपडे... निथळणारं अंग... आणि चिंब ओले केस...

तुझा प्रश्न जरा हळवासा...
’बरेच दिवस निरोप नाही... विसरलीस का मला?’ - अशाच काहिश्या अर्थाचा.

मी प्रसन्न हसले!

ओले केस पंचाने खसखसून पुसताना मनात आलं...
मला खरंच भिजवलं होतं पावसानं... की...
कि तुझ्या आठवानं?

आपल्या खुपश्या प्रश्नांची उत्तरं नसतातच एकमेकांकडे...
पण उत्तरादाखल धाडलेला माझा हा निःशब्दाचा निरोप... कधी पोचेल का तुझ्यापर्यंत?

शब्दखुणा: 

मला खुप आवडते त्याचे जगणे...

Submitted by मुग्धमानसी on 23 January, 2013 - 00:49

मला खुप आवडते त्याचे जगणे...

तो जगतो म्हणजे कधीही फक्त जिवंत नसतो... फक्त श्वास घेत नसतो...
तो खरोखर जगतो!
त्याच्याही जगण्याला आकार-उकार, काना-मात्रा, वेलांट्या वगैरे सगळं आहे. तुम्हाला आम्हाला असतं तसं.
त्याच्याही जगण्याला आहेच की दुःखाची किनार, सुखाची झालर... वगैरे वगैरे..

पण तरिही त्याचं जगणं उन्हात चमकणार्‍या भरजरी वस्त्रासारखे सुंदर वाटते...
आणि माझं जगणं त्याच्या जगण्यापुढे एखादा मलमलीचा तुकडा सावलीत वाळत घातल्यासारखं... स्वच्छ, शुभ्र,... पण तरिही त्याला भरजरीची सर नाही!

कुठून आणत असेल तो ही उर्जा?
कुठून शिकला असेल तो हे... जगणे?

शब्दखुणा: 

एक गाणं...

Submitted by मुग्धमानसी on 22 January, 2013 - 23:42

मी क्षणा क्षणावर कोरत जाते एक गाणं...
शब्द कुणीतरी कानात सांगत जातं. चालही कुणीतरी आधीच ठरवलेली.
ताल, सूर, लय, ठेका... माझ्या मालकीचं काहीच नाही!
मी फक्त लिहीत जाते...
एक एक क्षण... भिरभिरत निसटणारा...
शिताफीनं पकडते अन् कोवळ्या नाजूक नखांनी एक एक शब्द त्यावर कोरत जाते.
काही क्षण निसटून जातात...
काही क्षण तुटतात, फाटतात, मिटतात, नासतात..
एवढं नुकसान गृहीत धरलंच पाहीजे नाही का?
पण तरिही... न थकता...
मी माझं गाणं पुरं करायच्या मागे लागते.
किंवा कुणीतरी त्याचं गाणं माझ्यामार्फत पुरं करायच्या मागे लागतो.
सुंदर आहे! खरोखर फार सुंदर आहे!!

शब्दखुणा: 

नेमकं तेव्हाच.....

Submitted by मुग्धमानसी on 3 January, 2013 - 00:29

नेमका तेव्हाच संचारतो काळोख दिवसाच्या अंगात!
नेमका तेव्हाच एकमताने ठराव पास होतो ढगात... कि आता बरसायचं आहे...
अगदी तेव्हाच लख्ख कोरडं रहायचा निश्चय केलेल्या मला... चिंब चिंब भिजवायचं आहे!

हळवेपणाची कात टाकून खंबीर व्हायचं ठरवते... नेमकी तेव्हाच कातरवेळ होते
मग आकाशात रंग... गार गार वारे...
पानांची सळसळ... अंगावर शहारे...
बुडणारा सूर्य... गळणारं पान...
परतणारे पक्षी... सुटलेलं भान...
तशातच नेमकी कुठलीशी आठवण...
आणि मघाच्या निश्चयाची सपशेल बोळवण!!

भास हे भासच असतात.
झोपल्यानंतर होऊ लागले तर त्याला स्वप्न म्हणतात...
आणि जागेपणी होऊ लागले तर त्याला तंद्री म्हणतात...

शब्दखुणा: 

हरवलेल्या पाऊलखुणा...

Submitted by मुग्धमानसी on 2 January, 2013 - 01:20

इथं... इथं एक झाड होतं...
हिरव्या पानांचं... लाल लाल फुलांचं...
--- जळून गेलं! मागचा वणवा जरा मोठाच होता!

आणि... आणि इथला झरा...?
झुळूझुळू बोलक्या पाण्याचा...
---आटलाय आता. उन्हं फारच कडक!

मी विचारत राहीले, आणि तू सांगत राहीलास...
आपणच एकत्र चाललेच्या रस्त्यावर, आपल्या पाऊलखुणा मी शोधत राहीले...
आणि तू न थकता देत राहिलास... त्यांच्या पुसलं जाण्याची निमित्त्य!

पण मी कुठं विचारलाय तुला कसला जाब?
मी कुठं म्हटलंय तुला कि माझ्यासोबत जरा थांब...
तुझे साथी वेगळेच.... ते राहिलेत आता लांब!
खरा तू तिथंच आहेस... त्यांच्यासोबत... त्यांच्यासाठी...

शब्दखुणा: 

फक्त तू नव्हतास!

Submitted by मुग्धमानसी on 18 December, 2012 - 04:17

फक्त तू नव्हतास!

दारापुढे अंगण होतं.. अंगणात जाई होती.
टपोर्‍या शुभ्र फुलांमध्ये गंधाची मजेदार जाळी होती.
जाळित अडकून पडलेले ते दंवाचे टपोरे थेंब...
...आणि थेंबांत तरंगणारं निळंशार आकाश!
त्या आकाशावर हळुवार तरंग उमटवणारा तो तुझाच स्वर होता....
फक्त तू नव्हतास!

दाराला उंबरा होता... आणि उंबर्‍याला ओठंगुन मी... कधीची!
स्तब्ध, निर्जिव पायांमध्ये मैलोगणती प्रवासाचा थकवा घेऊन...
पावलांखाली गुलाबाच्या काही मखमली ओल्या पाकळ्या घेऊन...
माझ्या दारात तु लावलेला तो गुलाब... आणि माझ्या नखातली माती!
मातीत उमटलेले तुझ्या पायांचे ठसे आणि ठशांवर कोरलेले काही अनुत्तरित प्रश्न!

शब्दखुणा: 

रात्र....

Submitted by मुग्धमानसी on 17 December, 2012 - 01:43

रात्रीची भिती वाटते म्हणे सगळ्यांना...
पण मला मात्र भारी कौतुक वाटतं तिचं.
तिचं एकटेपण, तिची रंगहीनता, तिची भयाणता...
आणि या सगळ्यावर तिचं मात करुन उरणं!!

या रात्रीकडुन बरंच काही शिकायला मिळतं!!

दिवसावर सगळेच प्रेम करतात! कारण दिवसावर केलेलं प्रेम लख्ख प्रकाशात उजळलेलं असतं.
सुर्याच्या उदात्ततेशी, उत्तुंगतेशी निगडित असतं.
दिवसाच्या सोबतीला असतात कित्येक जीव,,, पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचा गलबलाट, लक्षावधी सजीवांचे लक्षावधी आवाज, आकार आणि जिवंत जाग्या भावना!!!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - सहज काहितरी