कुणीतरी फार निरखून बघतंय मला...
जणु एखाद्या चित्राला कुणी जाणकार रसिक पाहतो आहे!
माझ्या एका एका रेषेला तो नजरेने मापतो आहे...
माझ्या रंगांचं गहिरेपण मोजतो आहे...
पण मी तर जिवंत आहे... बघु शकते... विचार करु शकते...
माझ्यावर अनादिकाळापासून टिकून राहिलेली ती नजर मला जाणवू शकते...
त्याचं हलकंसं हसू मी ऐकू शकते...
हे अनोळखी डोळ्यांनो... कदाचित आवडलंय हे चित्र तुम्हाला... माझ्यावर खुश दिसताय तुम्ही!
पण न जाणे का.... मी खुश नाही...!!!
असं वाटतंय जणू फार फार महत्वाचं काहीतरी फार फार मागे राहून गेलंय...
किंवा जणू मीच नकळत चालता चालता फार लांब येऊन पोचलेय आणि ते ठिकाण... जिथं मला पोचायचं होतं... ते कधीच मागे पडलंय.
विश्वास बसत नाही... इतकी वर्ष झाली! किंवा विश्वास बसत नाही... 'इतकीच' वर्ष झाली!! असं वाटतंय जणू एक जन्म उलटून गेला!!
मागच्या जन्मातलं आता काहीच आठवत नाही.
जे आठवतंय ते इतके धूसर... कधीकाळी वाचलेल्या एखाढ्या छानश्या कादंबरीतलं एखादं बिन महत्त्वाचं पात्र आठवावं तसं!
विश्वास बसत नाही!!
पण विश्वास ठेवायला हवा. मी ठेवला... त्यांनी ठेवला... म्हणून तर आज मी इथे आहे! नाहीतर...