अभिमान... का?

Submitted by मुग्धमानसी on 19 March, 2013 - 04:03

अभिमान... का?

माझी संस्कृती मला जन्मल्यापासून काही गोष्टींचा अभिमान बाळगायला शिकवते. जन्मल्यानंतरच्या कुठल्याही क्षणी ती मला ’का?’ हा प्रश्न विचारण्याची संधीच देत नाही. हा प्रश्न माझ्या डोक्यात, विचारांत, मनात कधीही येणारच नाही याची दक्षता स्वतः ही संस्कृतीच घेते. चुकून मी हा प्रश्न कधी विचारलाच तर मला एकतर वेड्यात तरी काढले जाते किंवा ’त्यांच्या’तून बाहेर काढले जाण्याची भीती तरी दाखवली जाते. आणि मग मीही हे सर्व अभिमान उराशी मरेस्तोवर जपते. कारण हे अभिमान बाळगल्याने माझे नुकसान काहिच नसते... उलट मला जगण्यासाठी हवे असलेले संस्कृतीचे, सभ्यतेचे एक सुरक्षित आवरण मला मिळत रहाते. जोपर्यंत मी या या समाजाच्या ’अरे’ ला ’कारे’ करत नाही तोपर्यंत हा समाज मला अत्यंत मायेने आणि प्रेमाने जपतो... मला सुरक्षित ठेवतो... असे आपले मला वाटत रहाते! आणि असे वाटत रहाणे... समाजातल्या प्रत्येक घटकाला... हे समाजाच्या एकसंधतेसाठी (?) फार फार महत्त्वाचे!

मी जिथे जन्म घेतला त्या कुळाचा अभिमान बाळगते. माझ्या आडनावाचा अभिमान बाळगते. मग त्यानंतर माझे पुर्वज, माझी जात, माझी भाषा, माझं गाव, माझं राज्य, माझा देश... हे सगळं करत करत विस्तारत विस्तारत या सर्वांच्या पलिकडे जाण्याआधी जन्मच संपण्याची वेळ येते! मग पुन्हा जन्म... पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. पण मग कधीकधी माझ्या मनात शंका (चुकून) येतेच... ज्या गोष्टिंचा मला या क्षणी अभिमान आहे, त्या गोष्टी घडवून आणण्यात किंवा मला मिळण्यात माझे सहकार्य, सहभाग, कर्तुत्व किती? तर शुन्य!!! तरिही मला ते सर्व ’माझे’ वाटते! मला ते सर्व मिळाले हे माझे भाग्य आहे असे वाटते. म्हणजे प्रश्न असा उभा रहातो, की एखाद्या संस्कृतीचा अशाप्रकारे अभिमान बाळगणारे अनेक जण मिळून त्या संस्कृतीला महान बनवतात कि संस्कृती मुळात महानच असते आणि ती तिच्यात जन्म घेणार्या प्रत्येकाला ती बाय-डिफ़ॉल्ट महान बनवते? हा प्रश्न पुन्हा मला ’कोंबडी आधी कि अंडे?’ या प्रश्नासारखाच बुचकळ्यात पाडतो.

यातील ’संस्कृती मुळात महानच असते आणि ती तिच्यात जन्म घेणार्या प्रत्येकाला ती बाय-डिफ़ॉल्ट महान बनवते’ हे एक सर्वमान्य गृहीतक असावे. पण याला आधार काय? आणि महान म्ह्णजे काय? तर इतर सर्वांपेक्षा वरचढ. म्हणजे तुलना आलीच. पण वेगवेगळ्या संस्कृतीत जन्माला येणार्या प्रत्येकापाशी हा ’महानतेचा’ अभिमान असतो. अशावेळी एखाद्याने तटस्थ राहून पहायचे ठरवले तर त्याने कशाला महान समजावे? समजा काही क्षणांसाठी मी हा ’महान’ आणि ’महानेतर’ भेदभाव दूर ठेवला... तरी... एखादी गोष्ट माझ्यासाठी चांगली किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार मला कधी मिळतो? (माझ्या मते) जेंव्हा मी त्या गोष्टीची इष्टता-अनिष्टता प्रत्यक्ष पडताळून पहाते तेंव्हा! म्हणजे, पंचपक्वांनांमधील मला बासुंदी जास्त आवडते हे मला सर्व पदार्थ चाखल्याखेरीज कसे कळणार? मला अमुक एक माणूस अजिबात आवडत नाही असे आपण दहा माणसांच्या बाबतीतले अनेको बरे-वाईट अनुभव घेतल्यावरच ठरवतो ना? मग भले त्या माणसाने प्रत्यक्ष आपले काही नुकसान केलेले असो किंवा नसो... भाताची परिक्षा करण्याआधी आपण किमान शित तरी चाचपलेले असतेच ना?

तरिही काही जण असतात म्हणा... जे ’दारू वाईट’ म्हणतात... तिचा एक थेंबही आयुष्यभर चाखलेला नसताना. किंवा ’मांसाहार करणे चुकीचे’ म्हणतात... त्याची अजिबात चव माहित नसताना. पण ते काही अपवाद! काहितरी ’वाईट’ आहे किंवा ’चुकीचं’ आहे... असं वाटतं... म्हणून ते न करणं हे वेगळं. आणि मला ’व्यक्तिशः आवडत नाही’ म्हणून न करणं वेगळं. मला काय आवडतं, काय नाही, हे ठरवण्याचा नैतिक अधिकार मला ती गोष्ट प्रत्यक्ष अजमावून पाहिल्याशिवाय मिळतच नाही असा माझा मुद्दा आहे!

तर मुळ मुद्दा असा आहे कि माझी आवड निवड ठरवण्याआधी सुद्धा जर मला दहा गोष्टी अजमावून पहाण्याची संधी मिळत असेल, तर ’काय महान’ हे ठरवताना मला ती संधी का मिळत नाही? किंवा तशी संधी मिळालेली नसतानाच ’एखादी गोष्ट माझ्यासाठी महान’ हे कसे ठरते? तुम्ही म्हणता म्हणून? पुनर्जन्म वगैरे भानगडी असतात कि नसतात हे ठावूक नाही मला... पण माझे दहा जन्म झालेले असतील, त्या सर्वांचे स्मरण मला असेल, तर मी हे ठरवणे की ’त्यातिल सातवा जन्म खरोखर महान होता’... हे संयुक्तिक ठरेल. किंवा निरनिराळ्या धर्मांचा, त्यांच्या विचारांचा, अनुभव घेऊन मी हे ठरवणे कि त्या सर्वांतला अमुक-अमुक धर्म मला महान वाटला... हे ठिक वाटते! अनेक देशांत राहून, तिथला प्रत्यक्ष अनुभव घेऊन ठरवणे की या या देशात जन्माला येणे मला आवडेल... मला अभिमान वाटेल... तर ते योग्य आहे... असं माझी बुद्धिमत्ता मला सांगते. पण तसे काहीही न होता प्रत्यक्षात होते ते असे कि कुणीतरी जन्मल्याबरोबर माझ्या कानात सांगते की हे तुझे नाव, हि तुझी जात, हे तुझे कुळ आणि हे तुझे गाव... हिच तुझी ओळख!.... इथवर ठिक आहे हो... ओळख तर लागतेच कि प्रत्येकाला! पण त्याहीपुढे जाऊन हेही बिंबवले जाते माझ्यावर कि हे सर्व तुला फार फार भाग्याने मिळालेले आहे... महान आहे... आणि याचा तुला यापुढे आयुष्यभर ’अभिमान’ बाळगायचा आहे!.... हे फार झाले... नाही?

माझी संस्कृती मला सांगते तू माणूस आहेस, इथपासून ते अमुक अमुक व्यक्तिशी तुझा विवाह झाला आहे... इथपर्यंत सर्वच्या सर्व गोष्टी तुझ्या बाबतीत ’स्पेशली’ घडल्या आहेत... कारण तू भाग्यवान आहेस! त्यामुळे या सर्व गोष्टींचा ’अभिमान’ तू बाळगलाच पाहिजेस! स्त्रियांनी पतीला परमेश्वर मानून त्याच्याशी एकनिष्ठ रहावे असे हीच संस्कृती सांगते. पण अनेक माणसांबाबत अनेक अनुभव घेतल्यानंतर कोण चांगले आणि कोण वाईट हे तिला कळत असेल, तर पती हा ’परमेश्वर’ एवढा उच्च दर्जा देण्याएवढा चांगला माणूस तरी आहे का हे ठरवण्याचा अधिकार त्या संबंधित स्त्रिला का असू नये? तो परमेश्वर आहे.. का? तर फक्त तो माझा पती आहे म्हणून? कि तो ’माझा’ पती आहे म्हणून?

मला वाटते, अभिमानाची ही व्याख्या काही स्वार्थी विचारांतुनच जन्माला आली असावी. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो, तो पुरवणारा ’अहं’ या अभिमानातुन जन्माला येतो! मी कुणीतरी विशेष आहे, इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे... ही भावना माझ्या आतून मला प्रचंड उर्जा पुरवत असावी. मला जगण्यासाठी ज्या भौतिक गरजा भासतात त्या पुरवण्याचे काम ज्या समाजातुन होते, त्याच समाजाने माझ्या या भावनिक गरजा ओळखून त्यांच्या पुर्ततेची सोय व्हावी म्हणून माझ्या मनात खोलवर ही ’अभिमाना’ची फसवी संकल्पना जाणीवपुर्वक रुजवून ठेवली आहे... अशा निष्कर्षाप्रत मी सध्यातरी पोचले आहे! मीही माणूस आहे आणि स्वार्थीसुद्धा... त्यातुन माझ्या विचारक्षमतेचा मला अभिमानही आहेच की....!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर मुळ मुद्दा असा आहे कि माझी आवड निवड ठरवण्याआधी सुद्धा जर मला दहा गोष्टी अजमावून पहाण्याची संधी मिळत असेल, तर ’काय महान’ हे ठरवताना मला ती संधी का मिळत नाही?
त्यात अभिमान किंवा संस्कृतीचा फारसा संबंध नाही. काही गोष्टींचे दुष्परिणाम होतात. नुसते सांगून मुले ऐकत नाहीत म्हणून, देव, धर्म, संस्कृती, समाज, कायदा इ. सांगून त्या गोष्टींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न असतो.

पण भारतात तरी निदान अशी अजमावून पहाण्याची संधी मिळत असावी
म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी मला तरी बरेचदा बर्‍याच गोष्टी करून बघायची संधी मिळाली. (त्यातून काहीहि शिकलो नाही ही बाब वेगळी) पण आता चार वर्षाच्या मुलाने म्हंटले मी दारू किंवा सिगारेट पिऊन बघतो, तर त्या मुलाला किंवा मुलीला धोका आहे, म्हणून त्यांचे पालक नि समाज नाही म्हणतो. जर ती मुले शिकली, वयाने मोठी झाली, त्यांना दोन्ही बाजू समजल्या नि तरीहि करून बघायची इच्छा झाली तर करता येईल.

कधी कधी सिगारेट किंवा दारू यांचे नकळत व्यसन लागण्याची शक्यता असते. .

पण निदान आपले आई, वडील, गुरुजी, डॉक्टर हे आपल्या हिताचेच सांगतात असा विश्वास असेल तर त्यांनी नुसते सांगितले म्हणून सुद्धा ऐकणे चांगले. मग कारण काही का असेना.

अंधानुकरण नको असा मुद्दा असावा आणि तसा तो असल्यास पटला. गतानुगतिकः चे दुखणे आपल्याकडे खूप जुने आहे. 'का' हा प्रश्नच चुकिचा ठरतो. एका विशिष्ट मर्यादेनंतर एखाद्याच्या perceived / assumed मोठेपणाखातर, कुठलाही प्रश्न न विचारता केवळ त्याचं ऐकणे हे अप्रस्तुत वाटतं.

कुठ्ल्याही गोष्टीचा अभिमान हा स्वतंत्र विचारातून किंवा अनुभवातुन वाटणं हे, 'तो वाटलाच पाहिजे' ह्या बळजबरीतून वाटण्यापेक्षा जास्त संयुक्तिक वाटतं

मुग्धमानसी,

>> मला जगण्यासाठी ज्या भौतिक गरजा भासतात त्या पुरवण्याचे काम ज्या समाजातुन होते, त्याच समाजाने
>> माझ्या या भावनिक गरजा ओळखून त्यांच्या पुर्ततेची सोय व्हावी म्हणून माझ्या मनात खोलवर ही
>> ’अभिमाना’ची फसवी संकल्पना जाणीवपुर्वक रुजवून ठेवली आहे

हे काही कळलं नाही. तुम्ही तुमच्या गरजांन्वये समाजावर अवलंबून असालही कदाचित, पण समाजाला त्याची जाणीव नाहीये. तुमची अशी काहीशी अवस्था झालीये का? : http://www.maayboli.com/node/41209

आ.न.,
-गा.पै.

आनंदयात्री, बेफिकीर, विनायक, नताशा: प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद! विचारांतला गोंधळच मांडता मांडता निस्तरायचा हा प्रयत्न होता. माझ्या परिने मी तो बर्‍यापैकी निस्तरला... भावना व्यवस्थित पोचल्या नाहित हा माझ्या लेखनातील दोष असावा!

नाना: माझ्या मते मी तात्पर्य शेवटच्या परिच्छेदात काढले आहे!

झक्की: नुसते सांगून मुले ऐकत नाहीत म्हणून, देव, धर्म, संस्कृती, समाज, कायदा इ. सांगून त्या गोष्टींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न असतो. >>> मला अगदी मान्य आहे! अगदी योग्य मुद्दा मांडलात! म्हणूनच ही अभिमानाची संकल्पना आपल्यात समाजाने रुजवली... ती आपल्याच फायद्यासाठी... हे समजून घेता आले पाहिजे!

पण आता चार वर्षाच्या मुलाने म्हंटले मी दारू किंवा सिगारेट पिऊन बघतो, तर त्या मुलाला किंवा मुलीला धोका आहे, म्हणून त्यांचे पालक नि समाज नाही म्हणतो. जर ती मुले शिकली, वयाने मोठी झाली, त्यांना दोन्ही बाजू समजल्या नि तरीहि करून बघायची इच्छा झाली तर करता येईल. >>> मीही तेच म्हणते आहे. काहितरी ’वाईट’ आहे किंवा ’चुकीचं’ आहे... असं वाटतं... म्हणून ते न करणं हे वेगळं. आणि मला ’व्यक्तिशः आवडत नाही’ म्हणून न करणं वेगळं. असे मीही म्हटलेले आहेच.

फेरफटका: धन्यवाद. अंधानुकरण नको हा मुद्दा आहेच. चांगले काय वाईट काय याची पारख करण्याची क्षमता असताना त्याचा वापर न करता केवळ इतर लोक जे म्हणतात ते योग्य मानून चालणे अयोग्यच.

गा. पै.: माझा लेख वाचून तुमचा गैरसमज झालेला दिसतो कि यातून मला समाजाविषयी काही तक्रार करायची आहे. समाज.. संस्कृती... या संस्था कुणीही कितीही नावे ठेवली तरी प्रत्येकाच्या जगण्याच्या अविभाज्य घटक असतात. आणि या संस्थांविषयीचे ऋणच मी माझ्या शेवटच्या परिच्छेदात व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या भौतिकच नव्हे... तर भावनिक गरजा भागवण्यासाठिही या समाजाने किती सोयी करुन ठेवल्या आहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. तो फसला असल्यास क्षमस्व!

'अभिमान बाळगणे' ही वाईट गोष्ट आहे असे मला म्हणायचेच नाहीए... उलट जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा अभिमान उराशी बाळगणे आवश्यकच असते. हा अभिमानच आपल्याला जगण्याची उर्जा पुरवत असतो. मात्र 'अभिमान' या संकल्पनेमागची मूळ बैठक, कारण माहीत नसेल तर त्याचेच रुपांतर दुराभिमानात होण्यालाही वेळ लागणार नाही... जे अयोग्य आणि समाजहितासाठी हानिकारक देखिल ठरु शकते... असे मला म्हणायचे आहे.

मुग्धमानसी,

१.
>> माझ्या भौतिकच नव्हे... तर भावनिक गरजा भागवण्यासाठिही या समाजाने किती सोयी करुन ठेवल्या
>> आहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. तो फसला असल्यास क्षमस्व!

शेवटल्या परिच्छेदातील 'फसव्या' या विशेषणामुळे वाचकाचा गोंधळ उडतो. अभिमान आवश्यक असेल तर तो फसवा कसा काय असा प्रश्न पडला.

२.
>> मात्र 'अभिमान' या संकल्पनेमागची मूळ बैठक, कारण माहीत नसेल तर त्याचेच रुपांतर
>> दुराभिमानात होण्यालाही वेळ लागणार नाही...

अगदी बरोबर. अभिमान यथोचित असावा अशी अपेक्षा आहे. सार्थ अभिमानाचा वृथाभिमान केव्हा होतो यावर आपलं चिंतन झालेलं दिसून येत नाही. निदान लेखातून तरी तसं दिसंत नाही. तर ते चिंतन कराच म्हणतो मी! त्याकरिता शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

गा पै: कधी कधी कुणालातरी फसवणेही आवश्यकच असते नाही का? उदा. भाताच्या रिकाम्या भांडयात पाणी लगेच पाणी ओतावे असे आई सांगते.. त्यामागे खरे कारण असे असते की भात लगेच वाळतो त्यामुळे भांडे घासताना बाईला त्रास होतो. पण असे सरळ सांगितले तर कोण ऐकेल? म्हणून मग आइ सांगते... असे शास्र्त आहे! देवाला भाताचे भांडे कोरडे ठेवलेले चालत नाही... मग मात्र सगळे विश्वास ठेवतात. हे फसवणे नाही का? पण आवश्यकही आहेच की!
आपल्याला अनेको गोष्टींचा जो अभिमान असतो तोही फसवाच! विचार केला तर त्यतील फोलपण जाणवते. पण ही फसवणूक आपल्या हिताचीच नाही का? कारण त्यमुळे आपलाच अहं सुखावला जात असतो ना....